‘‘धुरंधर’मुळे सगळ्यांची जळते...’ कॉमेडियन झाकिर खान काय बोलून गेला

    06-Apr-2026
Total Views |

मुंबई : मार्च महिन्यात १९ तारखेला प्रदर्शित झालेल्या धुरंधर २ (Dhurandhar 2 The Revenge) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या १८ दिवसांत या चित्रपटाने भारतात १००० कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनचा टप्पा गाठत असा विक्रम करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागापेक्षाही या सिक्वेलने मोठी झेप घेत अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.

चित्रपट केवळ कमाईपुरता मर्यादित न राहता सोशल मीडियावरही तुफान चर्चेत आहे. चाहत्यांकडून मीम्स, थिअरीज आणि चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर चर्चा सुरू आहे. दरम्यान, स्टँड-अप कॉमेडियन झाकिर खान (Zakir Khan) यानेही वेगळ्याच अंदाजात या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एका अवॉर्ड शोमध्ये बोलताना झाकिर खानने बॉलिवूडवर हलक्याफुलक्या शैलीत टोला लगावत म्हटलं, “कितीही तुम्ही शुभेच्छा पोस्ट करा, इंटरव्ह्यूमध्ये आवडता चित्रपट म्हणा, पण खरं सांगायचं तर ‘धुरंधर’मुळे सगळ्यांची जळते आहे.” त्यांच्या या वक्तव्याने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

याचबरोबर त्यांनी चित्रपटातील ‘ल्यारी’ सीनवरही मिश्किल टिप्पणी करत म्हटलं, “बॉम्ब फिल्ममध्ये फुटले ल्यारीमध्ये, पण धूर उडाला बांद्रा ते जुहूपर्यंत,” अशा शब्दांत त्यांनी वातावरण रंगवलं.


या चित्रपटात रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारख्या दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळते. दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू, अल्लू अर्जुन आणि एस एस राजामौली यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. सुरुवातीला बॉलिवूडमधील काही कलाकारांनी मौन बाळगल्याने चर्चा रंगली होती, मात्र नंतर आलिया भट्ट, करण जोहर, अनुपम खेर आणि विकी कौशल यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं.

दरम्यान, झाकिर खानने यावर्षी जानेवारीमध्ये हैदराबादमधील शोदरम्यान लाईव्ह टूरमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. अलीकडेच ‘स्पोकन फेस्ट’मध्ये त्याने या ब्रेकमागचं खरं कारण स्पष्ट केलं. “माझ्याकडे गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेलं खूप लेखनाचं काम होतं, ज्याकडे लक्ष देण्यासाठी मी हा ब्रेक घेतला. माझी तब्येत फार खराब नाही आणि इंटरनेटवर पसरलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच त्याने पुन्हा एकदा सांगितलं की, त्याला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नसून तो सध्या त्याच्या लेखनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.