Donald Trump: "...तर सर्व काही उडवून देऊ", ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा; इराणकडूनही चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी

    06-Apr-2026   
Total Views |

Donald Trump

मुंबई : (Donald Trump)
महत्त्वाचा जागतिक व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत, हा मार्ग खुला न केल्यास निर्णायक आणि विनाशकारी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. इराणला धमकी देत केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आहे. (Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

"जर इराणने लवकरात लवकर करार केला नाही, तर सर्व काही उडवून देण्याचा आणि तेल ताब्यात घेण्याचा मी विचार करत आहे. तुम्हाला त्यांच्या संपूर्ण देशात पूल आणि वीज प्रकल्प कोसळताना दिसतील", असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं असल्याचं वृत्त फॉक्स न्यूजने दिलं आहे. तसेच पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला की, "काही इराणी अधिकारी सध्या चर्चा करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की सोमवारपर्यंत करार होण्याची दाट शक्यता आहे." (Donald Trump)

'होर्मुझ'वरून ट्रम्प यांची इराणला शिवीगाळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देत थेट शिवीगाळ केली आहे. त्यांनी तेहरानमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर समन्वित हल्ले करण्याचा उघड इशारा दिला. या धमकीसोबतच ट्रम्प यांनी वापरलेल्या भाषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुढे ट्रम्प म्हणाले की, "मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे ठरेल. यापेक्षा दुसरं काहीही नसेल. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अथवा तुम्ही नरकात जाल. तुम्ही पाहतच बसा", असा इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना अमेरिका लक्ष्य करणार असल्याचे सूचित केले. (Donald Trump)
 
यावर प्रत्युत्तर देताना इराणनेही कठोर भूमिका घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी स्पष्ट इशारा दिला की, अमेरिकेकडून किंवा त्यांच्या सहयोगींकडून कोणताही हल्ला झाल्यास इराण तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल. सध्याच्या घडीला इराणी सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, इराणचे सांस्कृतिक मंत्री सईद रझा सालिह-अमिरी यांनी ट्रम्प यांची धमकी फेटाळून लावली आहे. ट्रम्प हे 'अस्थिर, भ्रमावस्थेतील व्यक्ती असल्याची टीका त्यांनी केली. (Donald Trump)



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\