Trump Political Crisis : अमेरिकेमध्ये ट्रम्प यांना पदच्युत करण्याची मागणी वाढली
खासदारांकडून 25व्या घटनादुरुस्तीमधील ‘कलम 4’चा वापर करण्याचा विचार
06-Apr-2026
Total Views |
वॉशिंग्टन : (Trump Political Crisis) इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद जगावर उमटत असतानाच, अमेरिकेलाही त्याची झळ बसली आहे. या युद्धामुळे अमेरिकेमध्ये 2022 नंतरची सर्वात मोठी वाढ पेट्रोलच्या दरामध्ये झाली असून, जवळपास 4.10 डॉलर्स प्रति गॅलन एवढी किंमत अमेरिकेच्या नागरिकांना मोजावी लागत आहे. त्यामुळे सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये वातावरण दिवसेंदिवस बिघडत असून, ट्रम्प यांना पदवरुन हटवण्यासाठी त्यांच्या विरोधात अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 25 घटनादुरुस्तीतील ‘कलम 4’चा वापर करण्याची मागणी वाढली आहे.(Trump Political Crisis)
सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या युद्धाने उग्र रुप घेतले असून, त्यामुळे संपूर्ण जगालाच संकटाचा सामना करावा लागत आहे. अशावेळी ट्रम्पदेखील त्यांच्या समाज माध्यमांवरून निरनिराळी चिथवणीखोर वक्तव्य करताना दिसत आहेत. ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण होत असून, ट्रम्प यांच्या या वर्तनाबाबत अमेरिकेच्या खासदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात 25 व्या घटनादुरुस्तीमधील ‘कलम 4’चा वापर करण्याचा विचार अमेरिकेतील राजकारणी करत आहेत. या कलमानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या इच्छेविरोधात पदावरून बाजूला करता येते.(Trump Political Crisis)
अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली 25वी घटनादुरुस्ती विविध कारणांमुळे नेतृत्व बदलावर भाष्य करत असून, यामध्ये उपाध्यक्षांनाही पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या घटनादुरुस्तीमध्ये चार कलमे असून, राष्ट्राध्यक्षांच्या बदलीबाबतची तरतूद कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनडी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष बदलाची एकतरी प्रक्रिया असावी, या विचाराने ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती.
25व्या घटनादुरुस्तीचे ‘कलम 4’नुसार राष्ट्राध्यक्ष असलेली व्यक्ती त्या पदासाठी अयोग्य असल्यास, त्यांना बदलण्याचे अधिकार प्रदान करते. त्यासाठी अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्य आणि उपराष्ट्राध्यक्ष यांनी, राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पदाचे अधिकार आणि कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असल्याचे घोषित करणे आवश्यक असते. अशावेळी उपराष्ट्राध्यक्ष काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतात, यामुळे राष्ट्राध्यक्षांना अपील करण्याचा पर्याय उपलब्ध राहतो. मात्र, अमेरिकेच्या राज्यघटनेतील 25व्या घटनादुरुस्तीमधील कलम चार हे सर्वात वादग्रस्त असून, आजवर एकदाही या कलमाचा वापर झालेला नाही.(Trump Political Crisis)
अमेरिकेच्या संसदेकडून कलम दोन आणि तीनचा अनेकदा वापर...
25 व्या घटनादुरुस्तीमधील ‘कलम 2 आणि 3’चा वापर यापूर्वीही करण्यात आला आहे. उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो अॅग्न्यु यांनी राजीनामा दिल्यानंतर, रिचर्ड निक्सन यांनी जेराल्ड फोर्ड यांची नियुक्ती करण्यासाठी कलम 2 चा वापर केला होता. पुढे निक्सन यांच्या राजीनाम्यानंतर जेव्हा फोर्ड राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी नेल्सन रॉकफेलर यांची उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी कलम 2 चाच वापर केला होता. कलम 3 चाही वापर अनेक वेळा करण्यात आला असून, कारण त्यात तात्पुरत्या बदलीसाठीची कार्यपद्धती दिलेली आहे. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी या कलमाचा सन 2002 आणि 2007 असा दोनवेळा वापर केला, तर जो बायडन यांनी प्रकृतीच्या कारणावरून 2021 मध्ये याचा वापर केला होता.(Trump Political Crisis)