भारतीय जनता पक्षाची आजवरची वाटचाल ही केवळ सत्ताप्राप्तीची कथा नसून; ती राष्ट्रधर्म, लोकशाही मूल्ये आणि जन-आकांक्षांच्या सुसंवादी अभिव्यक्तीची गाथा आहे. संघटनशक्तीवर आधारलेले कार्य, विचारधारेशी निष्ठावान असणारे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या अखंड समर्पणातूनच या पक्षाने समाजमनात दृढविश्वास निर्माण केला आहे. सेवा, सुशासन आणि विकास यांना केंद्रस्थानी ठेवत, राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक अभिमान यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न यातून प्रत्ययास येतो. बदलत्या राजकीय परिप्रेक्ष्यात जनतेच्या अपेक्षांना प्रतिसाद देत, विकसित व समर्थ भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करणारी ही एक प्रभावी लोकचळवळ म्हणून आज भाजप उभा आहे. भाजपच्या या प्रवासाचा आजच्या स्थापना दिनानिमित्ताने घेतलेला आढावा...
भारतीय जनता पक्षाची स्थापना दि. 6 एप्रिल 1980 रोजी मुंबई येथे झाली. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उभे राहून देशाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी जनतेसमोर ठाम विश्वास व्यक्त करत म्हटले होते की, ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा|’ देशातील हुकूमशाहीच्या विरोधात पर्याय म्हणून उदयास आलेल्या जनता पक्षाच्या सरकारच्या पतनाचा तो काळ होता. त्यावेळी देशभर तीव्र निराशेचे दाट धुके पसरलेले असताना, अशा वेळी भारतीय जनता पक्षाची स्थापना ही राजकीय क्षितिजावर अधोरेखित झालेली एक ऐतिहासिक घटनाच ठरली. हास्य आणि उपेक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या त्या काळातील भाजपविरोधकांसाठी, अवघ्या 46 वर्षांच्या कालखंडात भाजपने आपल्या विस्ताराचा अभूतपूर्व प्रवास साधत, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभे राहणे, हे निःसंशय आश्चर्यचकित करणारेच दृश्य ठरले असेल. 14 कोटींपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यसंख्या, सर्वाधिक खासदार व आमदार, तसेच पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या जनप्रतिनिधींची व्यापक उपस्थिती लाभलेला हा पक्ष, आज देशाच्या विस्तीर्ण भूभागावरील सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करीत आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित असंख्य कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, कुशल व जनमान्य नेतृत्व, गरीब-कल्याणाभिमुख योजना आणि स्पष्ट व सुसंगत धोरणे यांच्या बळावरच भारतीय जनता पक्ष हा 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षांची पूर्तता घडवून आणणारा एक प्रभावी माध्यम ठरला आहे.
पक्षाचे प्रथम संस्थापक अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रारंभ करून, आजवर एकूण 11 अध्यक्षांनी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वपद भूषविले आहे. बारावे अध्यक्ष म्हणून सध्या नितीन नबीन पक्षाचे नेतृत्व सांभाळत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीचे हेच द्योतक आहे की, त्याने राज्ये, तसेच देशाला असे नेतृत्व प्रदान केले, जे राजकीय आकाशात नक्षत्राप्रमाणे तेजोमय भासते. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून प्रतिष्ठित झाले आहेत.
स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय क्षेत्रात विचारधारेच्या अधिष्ठानावर अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले होते. आजच्या राजकीय परिप्रेक्ष्यात विचारधारेवर मोठमोठी भाषणे करणाऱ्या अनेक पक्षांसाठी हर तऱ्हेने सत्ता प्राप्त करणे, हाच एकमेव विचार उरलेला आहे. काँग्रेससह अनेक पक्ष आज डाव्या विचारसरणीने पोषित, शहरी नक्षलवादाच्या विळख्यातच अडकलेले दिसतात. काही राजकीय पक्ष व नेते जिथे वैचारिक दिवाळखोरीचे बळी ठरले आहेत, तिथेच भारतीय जनता पक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखज यांच्या अद्भुत साहसाने आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रतिपादित केलेल्या, तसेच ‘भारतीय जनसंघा’च्या काळापासून स्वीकृत असलेल्या विचारधारेच्या अधिष्ठानावरच सक्रिय आहे. हा विचार भारतासह संपूर्ण जगात अंगीकारला जात आहे. भाजपच्या या वैशिष्ट्याविषयी भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले होते की, “आम्ही राजकीय क्षेत्रात संघटनाधिष्ठित पक्ष आहोत. आमचे संघटन कार्यकर्त्यांवर आधारित असून, कार्यकर्ता विचारांशी बांधील आहे.”
भाजप आपल्या आचरणातही लोकशाही मूल्यांचे काटेकोरपणे पालन करताना दिसतो. किंबहुना, पक्षाच्या आचरणात लोकशाही मूल्यांचे पालन करणारा भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पक्ष ठरतो. दर तीन वर्षांनी नव्या सदस्य-नोंदणीसह, बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटनाची पुनर्रचना करून, नवचैतन्याने सतत कार्यरत राहणारा पक्ष म्हणजे भाजप.
स्वतःच्या संघटनात्मक रचनेत महिलांना, युवकांना, तसेच समाजातील सर्व घटकांना संतुलित स्थान प्रदान करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने आजवर सातत्याने जपली आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये विचारसंपन्नता, आचरणात सेवाभाव आणि समाजाप्रती संवेदनशीलता जागृत करण्यासाठी पक्ष व्यापक प्रशिक्षण महाअभियान राबवित आहे.
आणीबाणीचा विरोध करतानाच्या काळात याच लोकशाही आदर्शांना साकार रूप देण्याचे कार्य पक्षाच्या नेतृत्वाने केले होते. याउलट, इतर अनेक पक्ष हळूहळू परिवारकेंद्री समूहांमध्ये रूपांतरित होत चालले आहेत.
आम्ही राजकीय क्षेत्रात केवळ सत्ताप्राप्तीसाठी नव्हे, तर समाजसेवेसाठी आहोत हे भाजपचे केवळ घोषवाक्य नसून, भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या आचरणातून ते प्रत्यक्षात साकार केले आहे. ‘कोविड’ महामारीच्या काळात भाजपचे कार्यकर्ते स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता, पीडितांच्या सेवेसाठी सक्रिय झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी सुमारे दहा कोटी लोकांना अन्नधान्य, मास्क आणि औषधांचे वितरण करून मानवसेवेचा एक अनुकरणीय असा आदर्शच निर्माण केला. ‘कोविड’ कालखंडात ‘सेवा ही संघटन’ या उपक्रमाच्या माध्यमातून असंख्य रुग्णांचे जीव वाचवण्याचे कार्य भाजप कार्यकर्त्यांनी पार पाडले. कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळीदेखील भाजप सदैव तत्परतेने कार्यरत असतो.
आपल्या ‘सबका साथ, सबका विकास’ या आदर्श वाक्याच्या अधिष्ठानावर सर्वांच्या सेवेसाठी व न्यायप्राप्तीसाठीदेखील भारतीय जनता पक्ष सदैव कटिबद्ध राहिला आहे. महिलांच्या सन्मानासाठी शाहबानो प्रकरणाच्या वेळी दाखवलेली सक्रियता, तिहेरी तलाकविरोधी कायदा, लोकशाही व्यवस्थेत महिलांना यथोचित प्रतिनिधित्व, तसेच सर्वसमावेशक कल्याणकारी योजना ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. संविधानाच्या भावनेचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सन्मान राखत, ‘समान नागरी संहिता’ लागू करण्यासाठी भाजप नेतृत्वाखालील अनेक राज्ये आज सक्रिय झाली आहेत.
देशाला गरज असेल तेव्हा रचनात्मक विरोधकाची भूमिका कशी पार पाडावी, हेदेखील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून शिकण्यासारखे आहे. आजचा विरोधक सत्ताधारी पक्षाला विरोध करण्याच्या अतिरेकी नादामध्ये देशविरोधी भासेल, अशा भूमिकेकडे झुकताना दिसतो आहे. त्याच वेळी 1971चे युद्ध, ‘जिनेव्हा अभियान’ (1994), तसेच आर्थिक सुधारणांसारख्या राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर आदर्श विरोधकाची भूमिका बजावून दाखविण्याचे उत्तम उदाहरण भाजप नेतृत्वाने घालून दिले आहे.
देशाच्या सीमांचे संरक्षण, तसेच अंतर्गत सुरक्षेसारख्या प्रश्नांबाबतही भारतीय जनता पक्ष सदैव सजग राहिला आहे. अण्वस्त्र चाचण्या, स्वदेशी बनावटीची संरक्षण उत्पादने, तसेच सैन्याचे आधुनिकीकरण यांसारख्या बाबींमध्येही भाजपने आपली ठाम व प्रभावी भूमिका सातत्याने देशासमोर मांडली आहे. याच संकल्पपूतसाठी मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता आणि नक्षलवादमुक्तीच्या दिशेने केलेल्या सरकारी प्रयत्नांमुळे देशातील जनतेमध्ये भारत सुरक्षित हातात असल्याचा ठाम विश्वास आजघडीला निर्माण झाला आहे.
‘भारतीय जनसंघा’च्या काळापासूनच भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय एकात्मता, तसेच सीमा-सुरक्षेच्या व्यापक परिप्रेक्ष्याला सुदृढ करण्याचे कार्य सातत्याने करीत आला आहे. ‘कलम 370’ विरुद्धचे आंदोलन, चिनी विस्तारवादाचा विरोध, गोवा व दमण-दीव मुक्तिसंग्राम, बेरुबारी हस्तांतरणाच्या विरोधापासून ते 1975च्या आणीबाणीविरोधी आंदोलनापर्यंतच्या सर्व प्रवाहांत, भाजपच्या विचारधारेचे लोकशाही इतिहासातील योगदान अतुलनीय ठरते. छद्म धर्मनिरपेक्षतेला विरोध करत, सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिरनिर्माणाच्या आंदोलनातील सहभाग आणि त्या निर्मितीच्या पूर्ततेमुळे भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने लोकाभिमुख पक्ष झाला आहे.
भ्रष्टाचारमुक्त विकास, गरीबकल्याण अर्थात, ‘अंत्योदय’सारख्या संकल्पना या भाजपच्या सिद्धांताधिष्ठित व मूल्यनिष्ठ राजकारणाचे प्रकटीकरण आहेत. भारतीय जनता पक्षाने ‘संविधान दिवस’ साजरा करताना देशात संविधानाप्रती निष्ठा दृढ केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलेल्या मूल्यांचा समाजात प्रसार घडवून आणला आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे अभियान सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि देशाच्या एकात्मतेचे पोषण करणारे अभियान ठरले आहे. ज्याठिकाणी इतर पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतीय संस्कृती, विचार यांना कमी लेखण्याचे कार्य करीत आहेत, त्याठिकाणी भाजपच्या नेतृत्वाने देशाचा सांस्कृतिक गौरव वृद्धिंगत करण्याचे कार्य केले आहे.