आज भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिवस. जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष असा या संघटनेचा प्रवास भारतीय राजकारणात राहिला आहे. अनेक संकटे, आव्हाने यांना कार्यकर्ता आणि विचारधारा याच्या जोरावर लढा देत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या भाजपच्या राजकीय प्रवासाचा स्थापना दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा...
देशातील सर्वांत मोठे राजकीय संघटन आणि एक परिवार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज ‘स्थापना दिवस’ असून, आपल्या ध्येयपूतची भाजपच्या ध्येयपूर्तीची 45 वर्षे पूर्ण करून हा पक्ष ‘सुवर्ण महोत्सवा’कडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाचा मूळ पाया, तत्कालीन ‘भारतीय जनसंघ’ मानला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमधून तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी, ‘भारतीय जनसंघा’ची स्थापना केली होती. सांस्कृतिक परंपरेच्या आधारे राजकीय, सामाजिक, आर्थिक, लोकशाही राष्ट्र हे उद्दिष्ट घेऊनच तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना पर्याय म्हणून, तथा राष्ट्रवादी विचारसरणीला बळ देण्यासाठी ‘भारतीय जनसंघा’ची स्थापना करण्यात आली. तेव्हा जनसंघाजवळ डॉक्टर श्यामा प्रसाद मुखज यांच्या व्यतिरिक्त कोणतेही राजकीय वलय किंवा मोठे प्रस्थ नव्हते, तसेच राजकीय पार्श्वभूमी असणारा मोठा नेताही नव्हता. तरीसुद्धा जनसंघातील सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी करून, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचाराचा दिवा देशात घरोघरी पोहोचवलाच, तसेच भविष्यातील भारतीय राजकारणाची दिशासुद्धा ठरवली. नंतरच्या काळात जनसंघाची विचारधारा देशात सर्वदूर पसरली आणि अल्पावधीतच जनसंघाला अखिल भारतीय स्वरूपही प्राप्त झाले. कालचा राजकीय संघटन असलेला जनसंघ, आज भाजप म्हणून जागतिक स्तरावर प्रख्यात झाला आहे.
जनसंघ ते जनता पक्ष प्रवास
जनसंघाची देशात यशस्वी वाटचाल सुरू असतानाच, देशामध्ये सर्वत्र आणीबाणीचा काळोखा पसरला होता. काँग्रेसविरोधी विचारसरणीच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे सत्र पूर्ण देशात सुरू होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तथा जनसंघाचे कार्यकर्त्यांना जेलबंद करण्यात आले होते. त्यामुळे देशात काँग्रेसविरोधात असंतोष तथा सामान्य माणसात चीड निर्माण झाली. आणीबाणीचा काळ संपल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन, दिल्लीच्या प्रगती मैदानावर दि. 23 जानेवारी 1977 रोजी जनता पक्षाची स्थापना केली. ‘नांगर खांद्यावर घेतलेला शेतकरी’ निवडणूक चिन्ह होते. जनता पक्षाची स्थापनाच आणीबाणीमधील काँग्रेसच्या जुलुमी विचारधारेच्या विरोधात झाली असल्याने, जनता पाटमध्ये काँग्रेसविरोधी अनेक राजकीय गट सामील झाले होते. भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), समाजवादी पक्ष यांनी एकत्र येऊन ‘जनता पाट’ राजकीय पक्षाची स्थापन झाली. यामध्ये आणीबाणीविरोधात मोठा संघर्ष करणाऱ्या जनसंघाचा वाटा महत्त्वपूर्ण होता. काँग्रेसविरोधात एकत्र आलेल्या जनता पाटला 1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली, जनता पाटचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी जनसंघाचे जवळपास 90 खासदार निवडून आले होते परंतु, जनता पाटमधील सदस्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंध ठेवता येणार नाही, दुहेरी सदस्याच्या मुद्दावरून जनता पाट सरकार कोसळले. सोबतच, जनता पाटसुद्धा फुटली आणि पुढे भारतीय जनता पक्षाचा उदय झाला.
भाजप स्थापना दिन
देशातील राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षाची स्थापना ही एक महत्त्वाची घटना असून, दि. 6 एप्रिल हा पक्षाचा स्थापना दिवस आहे. दि. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची अधिकृत स्थापना होऊन, भारतीय राजकारणात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा नवा विचार प्रस्थापित करणाऱ्या शक्तीचा उदय झाला. भारतीय जनता पक्षाचा उगम ‘भारतीय जनसंघ’ या पक्षातून होऊन, पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन दि. 28-30 डिसेंबर 1980 दरम्यान मुंबईमध्ये झाले होते. पक्षाचे पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ ही प्रसिद्ध भविष्यवाणी, मुंबईमध्येच केली होती. अटल बिहारी यांच्या सोबतच लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन तथा इतर अनेक नेत्यांनी पक्षाला बळकट केले. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवाद, एकात्म मानववाद आणि गांधीवादी समाजवाद तत्त्वज्ञानावर आधारित आहे.
दि. 8 जून 1989 रोजी तेजी पालमपूर अधिवेशनामध्ये ‘श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलन’ हा विषय, भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेमधील मुख्य विषय होऊन भाजपने हिंदुत्व विचाराची प्रखर भूमिका घेतली. पुढे लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘राम रथयात्रा’ व मुरली मनोहर जोशी यांच्या ‘एकता रथयात्रे’ने, देशाचे वातावरण ढवळून निघाले. जनमानसात भाजपची प्रतिमा उंचावत होती, पक्षाला जनाधारसुद्धा मिळत होता.
कार्यकर्ताच संघटनेचा आत्मा
भारतीय जनता पक्षात संघटना एक परिवार आणि कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असून, हेच पक्षाचे बलस्थान मानले जाते. पक्षावर अपार निष्ठा असणाऱ्या निःस्वाथ कार्यकर्त्यांची फौजच भाजपची शक्ती असून, त्या भरवशावरच भाजपचा विजयी अश्व देशाच्या विविध भागांत यशस्वी, विजयी होत आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने फार मोठी मजल मारली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची दाणादाण होऊन जेथे जनसंघाचे 90च्या वर खासदार निवडून आले होते, तेथे 1984 मध्ये केवळ दोनच खासदार निवडून आले. अटल बिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण अडवाणींसारखे दिग्गज त्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ए. के. पटेल मेहसाणा गुजरात व सी. जंगा रेड्डी आंध्र प्रदेश (हनमकोंडा) मधून निवडून आले; परंतु अशा परिस्थितीतही भाजप कार्यकर्ता खचला नाही.त्यांनी वादळांचा सामना करीत मरगळ बाजूला सारून संघर्ष केला, मोर्चे काढले, मेहनत घेतली; पक्षाचा झेंडा, ध्येय-धोरणे आणि विचार जनमानसात पोहोचवला.त्यामुळे 1989 मध्ये भाजपने गतवैभव प्राप्त करून, लोकसभेत जवळपास 85 खासदार निवडून आणले.त्यामुळेच भाजपमध्ये कार्यकर्त्याला संघटनेचा आत्मा व बलस्थान मानले जाते.
भाजपची यशस्वी वाटचाल
भाजपच्या 45 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि ‘सुवर्ण महोत्सवा’कडे जाणारा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा असून, भाजप भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारतीय राजकारणातील गेल्या 45 वर्षांच्या घडामोडींचा मागोवा अथवा सिंहावलोकन केले तर असे लक्षात येते की, देशातील प्रादेशिक राजकीय पक्षांची आज वाताहत झालेली दिसत असून, काँग्रेस आणि प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये अनेकवेळा फाटाफूट झालेली आहे. परंतु, भाजपने कठीण काळात संघर्ष केला. निवडणुकांमध्ये जय-पराजय पचवून, अखंडपणे आपल्या पक्षाची मजबूत बांधणी केली. लोकांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या, गाव-वस्त्या, खेड्यापाड्यांत आपला विचार रुजवला. त्यामुळेच एकेकाळी देशात नगण्य असलेला भाजप, आज अग्रगण्य झालेला आपण पाहात आहोत. भाजप पक्ष आज भारतातीलच नव्हे तर जगात सर्वाधिक सभासद असलेला मोठा राजकीय पक्ष ठरला असून, भाजपच्या नेतृत्वात भारतदेखील सशक्त व विश्वपटलावरील सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. दि. 6 एप्रिल हा भाजपचा ‘स्थापना दिवस’ देशभर साजरा केला जातो. पक्षाचे कार्यकर्ते विविध कार्यक्रम, सभा, समाजसेवा उपक्रम व जनजागृती करून पक्षाच्या इतिहासाची आणि कार्याची माहिती सामान्य माणसाला देत असतात. तसेच देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्पदेखील या दिवशीच घेतला जातो.
- निरंजन डावखरे
(लेखक भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असून, विधान परिषद सदस्य आहेत.)