सूर्याचा जुळा तारा!

    05-Apr-2026
Total Views |

आकाशातील आपल्या स्थानाबद्दल विचार करताना आपल्याला अनेकदा असे वाटते की, सूर्य आणि त्याची ग्रहपरिवार असलेली आपली सौरमाला विश्वात जणू काही स्थिरपणे एका जागी स्थित आहे. परंतु, आधुनिक खगोलशास्त्रीय संशोधनाने दाखवून दिले आहे की, तारे, सौरमाला आणि आकाशगंगेची रचना सतत बदलत असते. अलीकडील संशोधनानुसार, आपल्या सूर्याचा जन्म ज्या भागात झाला, तो भाग आजच्या स्थानापेक्षा खूप वेगळा होता आणि सूर्य एकटाच येथे आलेला नाही. उलट, सूर्य अनेक ‌‘जुळ्या ताऱ्यां‌’च्या समूहासोबत आकाशगंगेच्या मध्यभागातून बाहेर सरकला असावा. या संशोधनामुळे केवळ आपल्या सौरमालेचा इतिहासच नव्हे, तर संपूर्ण आकाशगंगेच्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा अध्याय उलगडत आहे.

जपानमधील ‌‘टोकियो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी‌’ आणि ‌‘नॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेटरी ऑफ जपान‌’ येथील संशोधकांनी या विषयावर सखोल अभ्यास केला. या संशोधनाचे नेतृत्व दाइसुके तानिगुची आणि ताकुजी त्सुजिमोटो या संशोधकांनी केले. त्यांनी ‌‘युरोपियन स्पेस एजन्सी‌’च्या ‌‘गाया‌’ उपग्रहाने गोळा केलेल्या प्रचंड प्रमाणातील खगोल-माहितीचा उपयोग करून सूर्याशी अत्यंत साम्य असलेल्या ताऱ्यांचा शोध घेतला. या ताऱ्यांना ‌‘सोलर ट्विन्स‌’ म्हणजे ‌‘सूर्याचे जुळे तारे‌’ असे म्हटले जाते. या ताऱ्यांचे तापमान, वस्तुमान, पृष्ठभागावरील गुरुत्व, रासायनिक रचना इत्यादी गुणधर्म सूर्याशी जवळजवळ जुळतात.

‌‘गाया‌’ मोहिमेने सुमारे दोन अब्ज तारे आणि खगोलीय वस्तूंची अचूक मोजमापे नोंदवली आहेत. या माहितीच्या आधारे संशोधकांनी सूर्याशी साम्य असलेल्या एकूण सहा हजार, 594 ताऱ्यांची यादी तयार केली. यापूव केलेल्या सर्वेक्षणांपेक्षा ही यादी जवळजवळ 30 पट मोठी होती. त्यामुळे प्रथमच सूर्याशी मिळतीजुळती वैशिष्ट्ये असलेल्या ताऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास शक्य झाला. संशोधकांनी या ताऱ्यांचे वय, त्यांची रासायनिक रचना आणि आकाशगंगेतील त्यांची स्थिती यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. या ताऱ्यांच्या वयाचा अभ्यास करताना एक अत्यंत रोचक गोष्ट समोर आली. सुमारे चार ते सहा अब्ज वर्षे वय असलेल्या ताऱ्यांचा एक मोठा समूह आकाशगंगेच्या एका विशिष्ट पट्ट्यात दिसून आला. आपला सूर्यही सुमारे 4.6 अब्ज वर्षांचा असल्यामुळे तो या समूहात बसतो. म्हणजेच, सूर्य ज्या काळात तयार झाला; त्या काळात सूर्याशी साम्य असलेले अनेक तारे आकाशगंगेच्या मध्य भागाजवळ जन्माला आले होते.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सूर्याचा जन्म आकाशगंगेच्या केंद्रापासून सध्याच्या स्थानापेक्षा सुमारे दहा हजार प्रकाशवर्षे आतल्या भागात झाला असावा. आज आपली सौरमाला आकाशगंगेच्या बाह्य भागात, तुलनेने शांत आणि स्थिर प्रदेशात आहे. परंतु, सुरुवातीला सूर्य हा आकाशगंगेच्या अधिक दाट आणि ऊर्जायुक्त भागात अस्तित्वात होता. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की, जर सूर्य तिथे जन्माला आला असेल, तर तो इतक्या दूर बाहेर कसा आला? या प्रश्नाचे उत्तर शोधताना संशोधकांनी आकाशगंगेच्या रचनेचा विचार केला. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी ताऱ्यांचा एक लांबट पट्टा किंवा ‌‘बार‌’ संरचना आहे. ही रचना फिरणारी आहे आणि ती आकाशगंगेतील ताऱ्यांच्या हालचालींवर मोठा प्रभाव टाकते. या संरचनेमुळे ‌‘सह-भ्रमण अडथळा‌’ नावाचा एकप्रकारचा गुरुत्वीय अडथळा निर्माण होतो. साधारणपणे या अडथळ्यामुळे ताऱ्यांना मध्य भागातून बाहेरच्या भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करणे कठीण होते.

मात्र, संशोधकांनी मांडलेला विचार वेगळा आहे. त्यांच्या मते, सुमारे चार ते सहा अब्ज वर्षांपूव आकाशगंगेतील ही ‌‘बार‌’ रचना पूर्णपणे तयार झालेली नव्हती. ती अजून निर्माण होण्याच्या प्रक्रियेत होती. त्याकाळात गुरुत्वीय अडथळा इतका मजबूत नव्हता. त्यामुळे आकाशगंगेच्या मध्य भागातून बाहेरच्या दिशेने ताऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ शकले असावे. सूर्य आणि त्याचे जुळे तारे या स्थलांतराचा भाग असावेत. याचा अर्थ असा की, सूर्य आज ज्याठिकाणी आहे, ते त्याचे मूळ जन्मस्थान नाही, तर तो आकाशगंगेच्या केंद्रातून बाहेर पडलेल्या एका मोठ्या तारकसमूहाचा सदस्य आहे. या तारकसमूहाने लाखो वर्षांच्या कालावधीत हळूहळू बाह्य भागाकडे प्रवास केला आणि आज आपण त्यांपैकी एक तारा म्हणून सूर्याला पाहतो. या शोधामुळे ‌‘दीर्घिका पुरातत्त्व‌’ किंवा ‌‘आकाशगंगीय इतिहासशास्त्र‌’ या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. पृथ्वीवरील पुरातत्त्वशास्त्र जसे मानवजातीचा इतिहास शोधते, तसेच आकाशगंगीय इतिहासशास्त्र ताऱ्यांच्या हालचाली आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करून आकाशगंगेचा इतिहास समजून घेते. प्रत्येक ताऱ्यामध्ये त्याच्या जन्मस्थळाची आणि निर्मितीच्या काळाची काही रासायनिक खूण असते. या खूणा जणू काही खगोलीय ‌‘फॉसिल‌’सारख्या असतात. त्यांचा अभ्यास करून संशोधक ताऱ्यांची भूतकाळातील यात्रा शोधू शकतात.

याचबरोबर, या संशोधनातून आकाशगंगेतील ताऱ्यांच्या हालचालींचे दीर्घकालीन स्वरूप अधिक स्पष्ट होत आहे. तारे केवळ आपल्या जन्मस्थानी कायम राहात नाहीत, तर गुरुत्वीय परस्परसंवाद, आकाशगंगेच्या फिरत्या संरचना आणि वायू-धुळीच्या ढगांमुळे त्यांची कक्षा हळूहळू बदलत राहते. या प्रक्रियेला ‌‘रेडियल मायग्रेशन‌’ असे म्हटले जाते. लाखो-कोट्यवधी वर्षांच्या कालावधीत तारे आकाशगंगेच्या आतल्या किंवा बाहेरच्या भागाकडे सरकू शकतात. सूर्याच्या जुळ्या ताऱ्यांचा अभ्यास करताना ही प्रक्रिया प्रत्यक्ष निरीक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे आकाशगंगेतील ताऱ्यांचे वितरण, रासायनिक बदल आणि तारकसमूहांची उत्क्रांती यांचा अभ्यास करण्यासाठी नवीन दिशा मिळाली आहे.

या संशोधनाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा परिणाम म्हणजे, जीवनाच्या उत्क्रांतीशी त्याचा संबंध. आकाशगंगेच्या मध्य भागातील वातावरण अत्यंत उग्र असते. तिथे ताऱ्यांची घनता जास्त असते, प्रचंड गुरुत्वीय हालचाली घडतात, तसेच उच्च ऊर्जेचे विकिरण आणि स्फोटक घटना; जसे की- ‌‘सुपरनोव्हा‌’ किंवा ‌‘अतिनवतारा‌’ स्फोट वारंवार घडतात. अशा वातावरणात स्थिर ग्रहप्रणाली टिकणे कठीण असते आणि सजीव जीवनाच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेली दीर्घकालीन स्थिरता मिळणे अवघड असते. परंतु, आकाशगंगेच्या बाह्य भागात परिस्थिती तुलनेने शांत असते. ताऱ्यांमधील अंतर जास्त असते आणि प्रचंड ऊर्जेच्या घटनांचा परिणाम कमी असतो. त्यामुळे ग्रह-प्रणाली दीर्घकाळ स्थिर राहू शकतात. पृथ्वीवर जीवन विकसित होण्यासाठी जे काही अब्जावधी वर्षांचे स्थैर्य आवश्यक होते, ते या प्रदेशात शक्य झाले. त्यामुळे सूर्याने आकाशगंगेच्या मध्य-भागातून बाहेर स्थलांतर केले नसते, तर पृथ्वीवरील जीवनाची कथा कदाचित वेगळी असती.

या शोधामुळे आपली सौरमाला आकाशगंगेतील एका मोठ्या गतिमान प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट होते. सूर्य हा केवळ एक स्वतंत्र तारा नसून, त्याच्या इतिहासामध्ये आकाशगंगेतील व्यापक गुरुत्वीय हालचालींचा प्रभाव दिसून येतो. पुढील संशोधनांमध्ये ‌‘गाया‌’ मोहिमेतील अधिक अचूक माहिती आणि इतर दूरदर्शकांमधील निरीक्षणांचा उपयोग करून या ‌‘सौर जुळ्या‌’ ताऱ्यांचा आणखी सखोल अभ्यास केला जाईल. यामुळे सूर्याच्या जन्मस्थळाचा अधिक अचूक अंदाज येऊ शकतो आणि आकाशगंगेच्या रचनेच्या इतिहासाबद्दल अधिक स्पष्ट चित्र मिळू शकते. मानवाने आकाशाकडे पाहण्याची परंपरा हजारो वर्षांपासून जपली आहे. परंतु, आधुनिक खगोलशास्त्राच्या साहाय्याने आपण आता केवळ तारे पाहत नाही; तर त्यांच्या जीवनकथा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सूर्य हा विश्वातील असंख्य ताऱ्यांपैकी एक असला, तरी त्याची कथा अत्यंत रोचक आहे. तो आकाशगंगेच्या मध्य-भागातून निघालेल्या एका मोठ्या तारकप्रवासाचा भाग आहे. या प्रवासामुळेच कदाचित पृथ्वीवर जीवनाची बीजे रुजली आणि बुद्धिमान सजीव प्राणी म्हणून आपण विश्वाचा अभ्यास करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो.

सूर्याच्या ‌‘जुळ्या ताऱ्यांच्या स्थलांतराचा‌’ हा शोध केवळ खगोलशास्त्रीय माहितीपुरता मर्यादित नाही. तो आपल्याला विश्वातील आपल्या स्थानाबद्दल नव्याने विचार करायला लावतो. आपण खरोखरच एकटे नाही, तर आपल्या सूर्याचे अनेक जुळे तारे आजही आकाशगंगेच्या विविध भागांत प्रवास करत आहेत. त्यांच्या आणि आपल्या इतिहासाची कथा म्हणजेच, आकाशगंगेची कथा आहे आणि त्या कथेतून विश्वाच्या उत्क्रांतीची अनेक रहस्ये पुढे उलगडत जाणार आहेत.

- सुजाता बाबर
[email protected]