पुरातत्त्वीय संशोधनामुळे, प्राचीन हस्तलिखितांमुळे इतिहास नेहमीच नव्याने उलगडत असतो. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्राचीन रेशीममार्गावर अनेक हस्तलिखिते सापडली. त्यामुळे प्राचीन भारताने तिबेट आणि चीन इत्यादी देशांना दिलेल्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या महान देणगीचे बारकावे ध्यानात आले. अश्वघोषासारख्या कालिदासपूर्व कवीने नाटकही लिहिले आहे, हे याच ठिकाणी सापडलेल्या हस्तलिखितावरून समजले. भारताचे महत्त्व नव्याने उलगडणाऱ्या यातल्या काही हस्तलिखितांचा थोडक्यात परिचय...
प्राचीन काळी लोक पायी प्रवास करीत किंवा प्राण्यांचा वाहन म्हणून उपयोग करीत. प्रवास करावा लागे, तो व्यापाऱ्यांना. शिवाय, एका जागी स्थिरावणे निषिद्ध मानल्यामुळे संन्यासी, भिक्षूही सतत फिरत असत. विद्यार्जनासाठी विद्याथही लांबच्या प्रदेशात जात असत. हे सर्व कधीकधी एकमेकांच्या सोबतीने जात. त्यामुळे साधारणतः ‘अर्थ’ या पुरुषार्थाला केंद्रस्थानी मानणारे व्यापारी आणि मुमुक्षू संन्यासी एकत्र प्रवास करीत. अशा रीतीने भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक समृद्धी अनेकदा हातात हात घालून जात. भौतिक समृद्धीमुळे ज्ञानप्रसाराच्या क्षेत्राचा विस्तार होत जाई.
‘उपनिषद’ काळापासून भारतात मोक्षमार्ग रुजला. गंगेच्या खोऱ्यात तत्त्वज्ञानाचे अनेक पंथोप-पंथ निर्माण होत होते. विविध प्रकारांच्या विचारांची निर्मिती होत होती. ज्ञानाने ओतप्रोत भरलेली अनेक हस्तलिखिते निर्माण होत होती. रेशीममार्ग तयार झाल्यावर भारतातला बौद्ध धर्म आणि बौद्ध हस्तलिखिते पूर्व-आशियायी देशांमध्ये पोहोचली. या हस्तलिखितांबरोबर काही अबौद्ध हस्तलिखितेही तिथे पोहोचली.
चीनमध्ये अनेक राजघराणी होऊन गेली. त्यापैकी ‘हान’ या राजघराण्याने इ.स. पूर्व 114 साली चीन आणि पश्चिम देश यांना जोडणाऱ्या मार्गाचे जाळे तयार केले. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमाचा बाहेरच्या देशांमध्ये व्यापार या उद्देशाने हा मार्ग तयार झाला होता, म्हणून याला ‘रेशीममार्ग’ म्हणतात. चीनपासून रोमपर्यंत पसरलेल्या या मार्गामुळे पश्चिमेचे देश आणि पूर्वेचे देश यांच्यात देवाणघेवाण सुरू झाली. जगभरातल्या सांस्कृतिक उन्नयनामध्ये या मार्गाची खूपच मोठी कामगिरी आहे. ज्ञानाला प्रदेशाचे बंधन नसते. नवनवीन ज्ञानाची लालसा कोणत्याही प्रदेशातल्या मानवाला असते. भारतामधला बौद्ध धर्म आणि बौद्ध परंपरा आशियाई जगात पोहोचवण्याचे मुख्य काम या मार्गाने केले. म्हणूनच, ‘ज्ञानवीथि’ (नॉलेज कॉरिडोर) म्हणूनही या मार्गाची ख्याती झाली. हा मार्ग दुसऱ्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत वापरात होता. या मार्गावर 19व्या - 20व्या शतकामध्ये खूप उत्खनने झाली. या पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये खूप हस्तलिखितांचा शोध लागला आहे. त्यातल्या काही महत्त्वाच्या हस्तलिखितांची ओळख प्रस्तुत लेखात करून घेऊ.
या रेशीममार्गावर डनहुआंग नावाच्या सुमारे 500 गुहांचा समूह आहे. 'Thousand Buddha Caves' किंवा ‘मोगाओ गुहा’ म्हणूनही या गुहा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी 17 क्रमांकाची गुहा अनेक वर्षे लोकांच्या नजरेत आली नव्हती. इ.स. 1900 मध्ये वँग युवानलू नावाच्या एका ताओ भिक्षूला ती सापडली. जरा आत जाऊन पाहातो, तर तिथे अनेक भित्तिचित्रे, पुतळे आणि हस्तलिखितांचे ढीग दिसले. हे एक चौथ्या-पाचव्या शतकातले समृद्ध ग्रंथालय असावे, असे म्हणतात. पुढे डॉ. ऑरल स्टाईन या ब्रिटिश अभ्यासकाने यातली बरीचशी हस्तलिखिते विकत घेतली आणि ब्रिटन, फ्रान्स इ. ठिकाणच्या प्रसिद्ध ग्रंथालयांमध्ये ठेवली. सुमारे इ.स. 402 ते इ.स. 1100 या कालावधीमध्ये लिहिलेली हस्तलिखिते या गुहेत सापडतात. ही हस्तलिखिते ताग, रेशीम, कागद इ. साधनांवर लिहिलेली आढळतात. बरीचशी काष्ठचित्रेही आढळली आहेत. काष्ठचित्र किंवा झायलोग्राफी या तंत्राने हस्तलिखिते छापण्याच्या तंत्राचा विकास चीनमध्ये झाला होता. या पद्धतीने हस्तलिखिते छापण्याचे काम इथे चालत असावे, असा अंदाज तिथे सापडलेल्या लाकडी फलकांवरून करता येतो. याठिकाणी सुमारे 70 हजार हस्तलिखिते असून चिनी, तिबेटी, खोतानी, संस्कृत, सोग्डियन, हिब्रू इ. भाषांमध्ये लिहिलेली आहेत. बौद्ध ग्रंथ सर्वात जास्त आहेत, जवळजवळ 80 टक्के. इ.स. 406 मध्ये प्रत केलेला ‘विनय ग्रंथ’, ‘वज्रच्छेदिका प्रज्ञापारमिता सूत्र’ इ. महत्त्वाचे ग्रंथ इथे दिसतात. बरेचसे ग्रंथ चिनी किंवा तिबेटी भाषांमध्ये अनुवादित आहेत. आचार्य रघुवीरांनीही या गुहांना भेट दिली होती. तिथून ते काही हस्तलिखिते घेऊन भारतात परतले होते. बहुतेक ‘सरस्वती विहार’ या त्यांच्या संस्थेतर्फे ‘शतपीटक’ सिरीजमधून यातल्या काही हस्तलिखातांचे प्रकाशन त्यांनी केले असावे. याठिकाणी सापडलेली काही हस्तलिखिते चीनमधल्या राष्ट्रीय ग्रंथालयात सुरक्षित आहेत. ‘इंटरनॅशनल डुनहुआंग प्रोजेक्ट’ या उपक्रमात देशोदेशीचे अभ्यासक सामील झाले आहेत.
याच मार्गावर तुर्फान नावाचा एक प्रांत आहे. तिथे काही हस्तलिखितांचे भाग सापडले आहेत. ‘तुर्फान फ्रेगमेंट्स’ या नावाने ते ओळखले जातात. यात सापडलेला महत्त्वाचा भाग म्हणजे ‘अश्वघोषाचे शारिपुत्तप्रकरण’ आणि इतर दोन नाटके. शारिपुत्र हा उपतिष्य आणि शारी यांचा मुलगा आणि भगवान बुद्धाचा सुरुवातीच्या काळातला शिष्य. हा व्याकरणकार मौद्गलायन (मोग्गलान) यांचा मित्र होता. शारिपुत्राने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याचे वर्णन प्रस्तुत नाटकात आहे. संस्कृत भाषेतले पहिले नाटक म्हणूनही या ग्रंथाचे महत्त्व आहे. अश्वघोष हा कालिदासपूर्व कवी म्हणून प्रसिद्ध होताच. बौद्ध धर्माच्या अनुयायांना पाली भाषेकडून संस्कृत भाषेकडे वळवण्याचे काम ‘बुद्धचरित’ आणि ‘सौन्दरानन्द’ ही काव्ये लिहून त्याने केलेच होते. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्याने उत्तम नाटकही लिहिले हे तुर्फान इथे सापडलेल्या हस्तलिखितांवरून सिद्ध झाले. हिमालयाच्या जवळपास ‘ताडपत्रावर सापडलेले हस्तलिखित’ म्हणून यांचे महत्त्व आहेच.
कोचा (Kucha) इथे लेफ्टनंट बॉवेर यांना सापडलेले हस्तलिखित ‘बॉवेर’ हस्तलिखित म्हणून प्रसिद्ध आहे. हे हस्तलिखित एका स्तूपाखाली त्यांना इ.स. 1890 मध्ये सापडले. गुप्त लिपीत भूर्जपत्रावर लिहिलेल्या या हस्तलिखितामध्ये सात लहानलहान ग्रंथांचा समावेश आहे. ‘नवनीतक’ या आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथाबरोबरच इतर दोन आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत. त्यानंतर काही म्हणींचा संग्रह आहे. दोन ‘धारणीं’चाही समावेश या हस्तलिखितात आहे. ‘धारणी’ म्हणजे बौद्ध धर्मातला आरोग्याशी किंवा स्मृतीशी संबंधित मंत्र. इथे सापडलेली एक धारणी ‘महामायुरी विद्याराज्ञी’ म्हणून ओळखली जाते. हा मंत्र सर्पदंशावरचा उतारा आहे, अशी समजूत आहे. हे हस्तलिखित निदान चार लेखकांनी लिहिलेले आहे. मंगलाचरणावरून त्यातले तीन बौद्ध असावेत. यातले दोन ग्रंथ शिव, विष्णू, देवी आणि इतर हिंदू देवतांना नमन करतात. म्हणून ते लेखक हिंदू असावेत, असे प्राचीन हस्तलिखितांचे प्रसिद्ध अभ्यासक आणि प्रस्तुत हस्तलिखिताचे संपादक सर य्होर्नले यांचे मत आहे. आयुर्वेदाच्या दुमळ ‘भेलसंहिते’मधले काही उतारे या हस्तलिखितामध्ये असल्यामुळे आणि आयुर्वेदाच्या इतर ग्रंथांशी नाते सांगत असल्यामुळे हे हस्तलिखित महत्त्वाचे मानले जाते.
कोचामध्ये सापडलेले आणखी एक महत्त्वाचे हस्तलिखित म्हणजे ‘वेबर’ हस्तलिखित. रेव्हरंड वेबर हे लेहमध्ये राहाणारे एक ख्रिस्ती मिशनरी होते. त्यांना एका अफगाण व्यापाऱ्याने कोचामध्ये सापडलेले हे हस्तलिखित दिले. त्यांनी ते सर य्होर्नले यांना पाठवले. वर वर्णन केलेल्या ‘बॉवेर’ हस्तलिखिताप्रमाणे हादेखील नऊ ग्रंथांचा समूह आहे. हे हस्तलिखित कागदावर लिहिलेल्या हस्तलिखितांमधील सर्वात प्राचीन पुरावा म्हणून महत्त्वाचे ठरते.
सध्याच्या चीनमध्ये असलेले खोतान हे रेशीममार्गावरचे एक ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळी हे भारतीय प्रवाशांनी वसवलेले राजधानीचे शहर असून, इथून रेशीम आणि पाचूंची निर्यात होत असे. बौद्ध धर्माचे ते एक महत्त्वाचे केंद्रही होते. या भागात ‘गांधारी प्राकृत’ नावाची भाषा बोलली जात असावी. याठिकाणी इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिलेले एक अत्यंत महत्त्वाचे हस्तलिखित सापडले. त्याचे नाव ‘गांधारी धम्मपद’. ‘धम्मपद’ हा बुद्धवचनांचा संग्रह असून, तो अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पाली भाषेतले ‘धम्मपद’ अधिक प्रसिद्ध आहे.
‘गांधारी धम्मपद’ हे गांधारी प्राकृत भाषेतले हस्तलिखित खोतान प्रांतात सापडले. भाषेमुळे हे वेगळे आहेच; पण या हस्तलिखिताची लिपीही ‘खरोष्ठी’ आहे. भूर्जपत्रावर लिहिलेले हे हस्तलिखित सध्या ‘ब्रिटिश लायब्ररी’मध्ये जतन करून ठेवले आहे.
या रेशीममार्गाला जोडल्या गेलेल्या एका मार्गावर आणखी एक उल्लेखनीय हस्तलिखित सापडले आहे, त्याचे नाव ‘गिलगिट’ हस्तलिखित. ‘गिलगिट’ हा पाकव्याप्त काश्मीरचा एक प्रांत. याठिकाणीही बौद्ध स्तूप होते. प्राचीन काळी भिक्षूंची हस्तलिखिते त्यांच्यासाठी उभारलेल्या स्तूपामध्ये पुरण्याची प्रथा होती. या स्तूपामध्ये ‘सद्धर्मपुण्डरीक’ आणि ‘समाधिराज’ ही साधारणतः इसवी सनाच्या सातव्या शतकात भूर्जपत्रावर लिहिलेली ‘शारदा’ लिपीतली हस्तलिखिते सापडली. बौद्ध हस्तलिखितांमध्ये हे ग्रंथ महत्त्वाचे मानले आहेत.
भारतीय लिपिशास्त्राचे अग्रगण्य अमेरिकन संशोधक प्रा. रिचर्ड सॉलोमन सध्या ‘ब्रिटिश लायब्ररी’मधल्या प्राचीन बौद्ध हस्तलिखितांवर काम करीत आहेत. यातल्या बऱ्याच हस्तलिखितांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होईल.
- प्रा. निर्मला कुलकर्णी
[email protected]