नानी पालखीवाला : स्मरण एका महान कायदेपंडिताचे

    05-Apr-2026
Total Views |

नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील‌’ हे ॲड. विजय गोखले यांनी लिहिलेले पुस्तक नानी पालखीवाला यांच्या जीवनावर आधारित आहे. सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नानी पालखीवाला यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ज्या घटनेचे पावित्र्य जपण्यासाठी नानींनी आयुष्यभर प्रयत्न केले, त्या भारताच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून त्यांच्या ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी आणि आपली वैयक्तिक आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण हे पुस्तक लिहिल्याचे लेखकाने म्हटले आहे. तसेच नानींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध आकर्षक पैलू मराठी वाचकांसमोर यायला हवेत, या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. नानी पालखीवाला या व्यक्तीची मोहिनी लेखकाच्या मनावर विश्वविद्यालयीन जीवनात पडली, ती आजतागायत कायम आहे, याचा प्रत्यय पुस्तक वाचताना पदोपदी येतो.

नानी पालखीवाला हे निष्णात कायदेपंडित, जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व करतज्ज्ञ होते. अमेरिकेत ते काहीकाळ भारताचे राजदूत म्हणूनही कार्यरत होते. तेथे त्यांना अमेरिकन विद्यापीठाने ‌‘मानद डॉक्टरेट‌’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या अर्थसंकल्पावरील व्याख्यानास मुंबईच्या ‌‘ब्रेबॉर्न स्टेडियम‌’वर हजारो लोक उपस्थित असायचे. त्यांच्या मनात आई-वडिलांबद्दल प्रचंड आदराची भावना होती. ते कुटुंबवत्सल, धार्मिक प्रवृत्तीचे व निगव होते. त्यांची कौटुंबिक परिस्थिती सामान्य होती. आपल्या देशावर त्यांचे अफाट प्रेम होते. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, त्यांची आध्यात्मिक वृत्ती, भारतीय संस्कृतीवर त्यांचा असलेला विश्वास, त्यांच्या वर्तणुकीतील सुसंस्कृतपणा, त्यांचा दानशूरपणा, त्यांची देशभक्ती या सर्वांची माहिती लेखकाने या पुस्तकातून करून दिली आहे. नानी निष्णात कायदेपंडित म्हणून प्रसिद्ध होतेच; पण ते एक सहृदयी, सुसंस्कृत व कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून कसे होते, हे वाचकांना समजावे व वाचकांनी व विशेषतः तरुण पिढीने त्यांच्या जीवनविषयक मूल्यांमधून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावावा, हा लेखकाचा पुस्तक लिहिण्यामागचा प्रमुख हेतू आहे.

एका मध्यमवगय कुटुंबात जन्म घेऊन चिकाटीने, शारीरिक उणिवांवर मात करत, या असामान्य चरित्रनायकाने त्यांच्या आयुष्यात प्रचंड काम केले. त्याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, स्वतः असामान्य असतानाही त्यांना कुठेही ‌‘ग‌’ची बाधा झाली नाही किंवा त्यांनी ती होऊ दिली नाही. पराकोटीच्या प्रामाणिकपणे कार्य करताना पैशासाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. सत्याची कास धरली. विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. आपल्या बुद्धी-सामर्थ्याच्या जोरावर सन्मार्गाने संपत्ती जमवली; पण त्याचा गाजावाजा न करता, स्वतःच्या गरजा भागातील इतका पैसा जवळ ठेवून उरलेले सर्व पैसे समाजकार्यासाठी व गरजूंना मदत करण्यासाठी सढळ हस्ते खर्च केले.

वरवर पाहता नानी युक्तिवाद करत असलेल्या याचिका मोठ्या उद्योग संस्थांच्या, घराण्यांच्या वा उद्योगपतींच्या असल्या, तरी त्यात गुंतलेले विवाद्य मुद्दे हे सामान्य माणसांच्या अधिकाराशी निगडित असत. किंबहुना, ते तसे होतील याची काळजी नानी आपल्या खुबीने व बुद्धी-कौशल्याने घेत असत व न्यायालयाला त्याचा विचार करावयास प्रवृत्त करत असत. कोणत्याही प्रकरणात युक्तिवाद करताना सार्वजनिक हित व सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू असे. घटना व नागरिकांचे मूलभूत अधिकार यांचे संरक्षण, संवर्धन व जपणूक करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर आटोकाट प्रयत्न केले, ही बाब या पुस्तकात प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे.

या पुस्तकात कायद्याची क्लिष्ट व तांत्रिक भाषा नाही, युक्तिवाद नाहीत, कायद्याची कलमे नाहीत; तर पालखीवाला या बुद्धिमान माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे जे विविध आकर्षक पैलू लेखकाला भावले, ते त्याने अत्यंत सोप्या, सरळ आणि प्रवाही भाषेत मांडले आहेत. या पुस्तकात नानी पालखीवाला यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध आकर्षक पैलू वाचकांना वाचायला मिळतील आणि आपणही त्यांच्यासारखे गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत, असे वाचकास वाटेल, असे मला वाटते. एका अर्थाने, ते ‌‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट‌’चे ते ‌‘सेल्फ हेल्प‌’ पुस्तक आहे. तरुण पिढीने ज्यांनी कदाचित पालखीवाला हे नाव ऐकलेही नसेल, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावयास हवे.

यशस्वी होण्यासाठी लागणारी निश्चयी वृत्ती, अफाट कष्ट करण्याची तयारी, वेळेचे व्यवस्थापन, मन एकाग्र करणे, वेगवान वाचन, सतत सुधारणा करण्याची वृत्ती, आपले मत दुसऱ्याला पटवून देण्याची कला इत्यादी नानी पालखीवाला यांच्या गुणांचे दर्शन तुम्हाला या पुस्तकात नक्कीच होईल. आपल्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती चांगली नाही म्हणून शालेय व विश्वविद्यालयीन जीवनापासून शिकवण्या घेऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारे, शाळेत जाताना एखाद्या दिवशी घरून डबा दिला नसेल, तर मधल्या सुटीत काहीतरी खाण्यासाठी वडील थोडे पैसे देत ते खर्च न करता वाचवणारे व पुरेसे पैसे साठले की, लगेच त्याचे पुस्तक खरेदी करणारे, आपल्या तोतरेपणावर प्रयत्नपूर्वक मात करणारे, कार्यबाहुल्यामुळे आपण आपल्या वडिलांना पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडणारे, त्यानंतर आपल्या आईकडे विशेष लक्ष देणारे, लग्न ठरले तेव्हा ग्रॅण्ट रोडच्या ‌‘पेटिट मॅन्शन‌’मध्ये दोन खोल्यांच्या घरात एका खोलीत पार्टिशन टाकून एका भागाचा शयनगृह म्हणून वापर करणारे व पुढे काही वर्षांतच नरिमन पॉईंट येथील ‌‘कॉमनवेल्थ‌’ इमारतीत पाच हजार चौरस फुटांच्या सदनिकेत राहावयास गेलेले व तेथेच आपले उर्वरित आयुष्य व्यतित करणारे, आपल्या बहिणीसाठी ‌‘कॉमनवेल्थ‌’ इमारतीतच व भावासाठी पेडर रोड येथे प्रशस्त सदनिका घेणारे नानी आपल्याला या पुस्तकात भेटतील. आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या हयातभर महिन्याचे वेतन देणारे, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलणारे, आपल्या घरातील मदतनिसांना पुढे कित्येक वर्षांनंतर भेटल्यावर कडकडून मिठी मारणाऱ्या पालखीवालांचे दर्शनही या पुस्तकात घडते.

देशहिताच्या अनेक खटल्यांत आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर कित्येकदा फी न घेता, देशाची बाजू मांडणारे, गोलकनाथ प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी सकाळी जिनिव्हाहून येऊन युक्तिवाद करून रात्री जिनिव्हाला परत जाणारे, राज्यकर्त्यांच्या धोरणावर कठोर टीका करणारे; पण त्याला व्यक्तिगत टीकेचे हिणकस रूप न देणारे, आणीबाणी जाहीर झाल्यानंतर, “मी इंदिराजींचे वकीलपत्र परत करत आहे, मी माझा निर्णय आपणास कळवत आहे. त्यात चर्चा करण्यासारखे काही नाही,” असे इंदिराजींचे विश्वासू व तत्कालीन कायदामंत्री हरिभाऊ गोखले यांना खडसावून सांगणारे पालखीवालाही मनाला भावून जातात.

‌‘वेद रक्षण समिती‌’चे अध्यक्षपद स्वीकारलेले, 1970 मध्ये मुंबई येथे भरलेल्या संत-महंतांच्या सभेत आध्यात्मिक क्षेत्रातले नसलेले एकमेव वक्ते असणारे; पण भारताच्या आध्यात्मिक परंपरेच्या आपल्या सखोल ज्ञानाने संत-महंतांना अचंबित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नानी पालखीवाला. ‌‘कांची पीठा‌’चे परमाचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांना भेटायला जाताना, ‌‘नानी हे हिंदू नाहीत, ते मठात कसा काय प्रवेश करू शकणार?‌’ असा प्रश्न काहींनी उपस्थित केला असता, “त्यांच्यासारखा माणूस मठात प्रवेश करू शकत नसेल, तर दुसरे कोणीच प्रवेश करू शकणार नाही,” असे उद्गार ज्यांच्या बाबतीत परमाचार्यांनी काढले, ते पालखीवाला आपल्याला या पुस्तकात भेटतील. भारताच्या सांस्कृतिक परंपरेप्रमाणे आपल्या उत्पन्नाचा काही भाग सामाजिक जाणीव म्हणून दरवष ‌‘भारतीय विद्याभवन‌’ला नानी पालखीवाला यांनी दिला. नानाजी देशमुख या तत्कालीन जनसंघाच्या नेत्याचा सत्कार करण्याचा प्रस्ताव पुढे आला, तेव्हा त्याला तत्काळ मान्यता देणारे, नानाजींनी आणीबाणीनंतर जनता सरकारात सामील न होता, समाजसेवेसाठी संपूर्ण वेळ द्यायचा निर्णय घेतला, याचे विशेष कौतुक वाटणारे, इंदिरा गांधी यांच्याकडून कायदामंत्रिपदाचे निमंत्रण व त्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचे आश्वासन मिळालेले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत आयकराची चौकशी सुरू झाली असता, संघाच्या बाजूने युक्तिवाद करणारे, त्यानंतर गुरुजी गोळवलकर यांनी त्यांचे आभारप्रदर्शन करण्यासाठी भेट मागितली असता, आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून रात्री उशिरा का होईना; पण त्यांना भेट देणारे, अखिल भारतीय विद्याथ परिषदेच्या नेत्यांची बाजू न्यायालयात मांडणारे, दुर्बल व पीडित लोकांबद्दल अनुकंपा असल्यामुळे बहुजन समाज पक्षाचे कांशीराम यांच्या विनंतीवरून त्यांच्या सभेत भाषण करणारे नानी पालखीवाला, असे त्यांचे कित्येक पैलू लेखकाने या पुस्तकात उलगडले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूत अजय गडकरी यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून त्यांनी बजावलेली उत्तुंग कामगिरी आणि ‌‘टाटा‌’ उद्योगसमूहाशी त्यांचा जुळलेला आणि शेवटपर्यंत टिकलेला ऋणानुबंध यांचा आढावाही लेखकाने पुस्तकात चांगला घेतला आहे. हे पुस्तक लिहिताना पालखीवाला यांचे साहित्य व त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके याचा सखोल अभ्यास करून व त्याला संशोधनाची जोड देऊन लेखकाने हे पुस्तक परिश्रमपूर्वक लिहिले आहे.

हे पुस्तक वाचल्यानंतर ते प्रत्येक नव्या आणि जुन्या वकिलांनी अवश्य वाचलेच पाहिजे; पण शाळा, महाविद्यालय, विशेषतः सर्व विधी महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला पाहिजे, असे राहून राहून वाटत राहते.

पुस्तकाचे नाव : नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील
लेखक : ॲड. विजय गोखले
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या : 108
मूल्य : 200 रुपये

- प्रदीप पाटील
9960495495