भारताचा ‘स्व’चा शोध हा केवळ तात्त्विक विचारांचा विषय नसून, तो आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी निगडित आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘सज्जन शक्ती जागरण’ या अभियानातून मांडले गेलेले ‘पंच-परिवर्तन’ हे केवळ सामाजिक उपक्रम नसून, भारतीय जीवन दृष्टिकोनाचे पुनर्स्मरण आहे. भारताच्या ‘स्व’चे आकलन करून त्याची आचरणात अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर स्वदेशी जीवनशैलीचा व्यापक अर्थ, भारतीय राष्ट्रचिंतन आणि कुटुंबाच्या भूमिकेचा सखोल वेध घेणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समाजाशी व्यापक संपर्क साधण्यासाठी विविध कार्यक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत समाजपरिवर्तनाच्या उद्देशाने पाच विषयांवर लक्ष केंद्रित करून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, हा महत्त्वाचा प्रयत्न आहे. या अभियानाला ‘सज्जन शक्ती जागरण’ असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत ‘पंच-परिवर्तन’चे पाच विषय निश्चित करण्यात आले आहेत; कुटुंबप्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि स्वदेशी.
स्वदेशी जीवनशैलीच्या संदर्भात सामान्यतः बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांऐवजी स्वदेशी उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंचा वापर, मातृभाषेत संवाद साधणे, सण-उत्सवांमध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषा धारण करणे, पारंपरिक भारतीय आहार स्वीकारणे, आपल्या इष्ट देवतेचे भजन करणे, घराच्या सजावटीत भारतीयतेचा प्रभाव ठेवणे, तसेच कुटुंबासह तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणे यांसारख्या बाबींवर भर दिला जातो.
मात्र, स्वदेशी जीवनशैलीचा अर्थ यापेक्षा अधिक सखोल आणि व्यापक आहे. तो समजून घेण्यासाठी ‘स्वदेशी’ या शब्दातील ‘स्व’ या संकल्पनेचे आकलन करणे आवश्यक आहे. भारताच्या या ‘स्व’चे तीन मूलभूत पैलू आहेत, ज्यांनी भारताला एक वेगळी ओळख आणि व्यक्तिमत्त्व दिले आहे. हे तीनही पैलू जेव्हा आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात स्वाभाविकपणे प्रतिबिंबित होतात, तेव्हाच त्या जीवनपद्धतीला खऱ्या अर्थाने ‘स्वदेशी जीवनशैली’ म्हणता येते.
मग प्रश्न असा आहे की, भारताच्या ‘स्व’चे ते तीन प्रमुख पैलू कोणते?
अध्यात्म - भारताचा पहिला आणि मूलभूत ‘स्व’ म्हणजे त्याचे अध्यात्म. भारतीय जीवनदृष्टी अध्यात्मावर आधारित असल्यामुळे ती एकात्म आणि सर्वांगीण आहे. भारत संपूर्ण सृष्टीला परस्पर जोडलेले मानतो. याच अनुभूतीतून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना विकसित झाली आहे. भारतीय दृष्टिकोनानुसार एकच चैतन्य विविध रूपांत प्रकट झाले आहे. त्यामुळे भारत विविधतेकडे भेद म्हणून पाहत नाही, तर त्या विविध रूपांमध्ये असलेल्या एकत्वाचा अनुभव घेतो आणि विविधतेचा उत्सव साजरा करतो. येथे प्रत्येक व्यक्ती स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सुप्त दिव्यता (ईश्वरत्व) अंतर्भूत आहे. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे अंतर्गत आणि बाह्य प्रकृतीचे संयमाने नियमन करून या दिव्यत्वाचे प्रकटीकरण करणे आणि मोक्ष प्राप्त करणे.
या चराचर सृष्टीत व्याप्त असलेल्या चैतन्याशी एकरूप होणे, त्यात विलीन होणे हाच ‘मोक्ष’ आहे. या ध्येयासाठी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग यांपैकी कोणत्याही एकाचा किंवा एकाहून अधिक मार्गांचा अवलंब करता येतो. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव, आवड आणि संस्कारांनुसार या मार्गांचे मिश्रण वेगवेगळे असू शकते. या वैयक्तिक साधनेलाच ‘उपासना’ असे म्हटले जाते.
भारतात उपासनेचा मार्ग पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि तो निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. येथे उपासना ही व्यक्तिगत बाब मानली जाते. जशी एखाद्याची खासगी वस्तू असते, तशीच. भारतात आध्यात्मिक लोकशाहीची परंपरा आहे. उपासना म्हणजे धर्म नाही; ती धर्माकडे पोहोचण्याचे साधन आहे, धर्माचा पर्याय नाही.
‘राज्य’ आणि ‘राष्ट्रा’ची भारतीय संकल्पना
पाश्चात्त्य देशांमध्ये ‘राष्ट्रा’ची संकल्पना ‘राज्या’वर आधारित राहिली आहे. याउलट, भारतात समाजच ‘राष्ट्र’ आहे, ‘राज्य’ नाही. भारतात राष्ट्राने आपल्या सोयीसाठी आणि व्यवस्थेसाठी राज्याची निर्मिती केली आहे. याच कारणामुळे स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान तयार झाले, तेव्हा त्याची प्रस्तावना ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होते. समाजातील सर्व घटकांचे जीवन सुव्यवस्थित आणि सुरळीत चालावे, यासाठी आम्ही भारतातील लोकांनी मिळून काही नियम निश्चित केले आहेत. या नियमांचे पालन करणे, हे आपले नैतिक कर्तव्य आणि बांधिलकी आहे. यासाठी प्रत्येक गोष्टीत राज्य किंवा शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहणे आवश्यक नाही. आपल्या समाजासाठी आपणच बनवलेल्या नियमांचे कर्तव्यभावनेने पालन करणे, हीच स्वदेशी जीवनशैलीची महत्त्वाची ओळख आहे. स्वतःच्या समाजाने निर्माण केलेल्या राज्यावर प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबतीत अवलंबून राहणे, हा स्वदेशी दृष्टिकोन नाही.
समाज-आधारित राष्ट्र
भारताचे राष्ट्र कधीही राज्याधारित राहिलेले नाही. ‘वेलफेअर स्टेट’ ही संकल्पना पाश्चात्त्य आहे, भारतीय नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘स्वदेशी समाज’ या निबंधात नमूद केले आहे की, “पारंपरिक भारतात न्याय, अंतर्गत व बाह्य सुरक्षा, तसेच परराष्ट्र धोरण यांसारखे विषय राज्याच्या अखत्यारित असत; परंतु शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यापार, कला, संगीत, नाटक, प्रवास, तीर्थ व्यवस्था अशा सर्व जीवनावश्यक बाबी समाज स्वतः चालवत असे.” या कार्यांसाठी निधी राज्याकडून मिळत नसे; समाजच तो उचलत असे. रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत; ‘जो समाज आपल्या गरजांसाठी राज्यावर कमीत-कमी अवलंबून राहतो, तोच खरा स्वदेशी समाज होय.’
जीवनाच्या पूर्णतेचा दृष्टिकोन
भारतीय जीवनदर्शनात भौतिक समृद्धी (अभ्युदय) आणि आध्यात्मिक उन्नती (मोक्ष) या दोन्हींचा समन्वय साधणे हीच जीवनाची पूर्णतः मानली जाते. केवळ भौतिक सुख किंवा केवळ त्याग यांपैकी कोणत्याही एका गोष्टीचा आग्रह धरणे, अपूर्ण मानले गेले आहे. याच भावनेचा उल्लेख धर्माच्या एका प्रसिद्ध व्याख्येत केला आहे. ‘यतो अभ्युदय नि:श्रेयस सिद्धिः स धर्मः’, म्हणजे जे भौतिक प्रगती आणि आत्मिक कल्याण या दोन्हींची साधना घडवते, तोच धर्म होय.
समरसता - भारताच्या ‘स्व’चे नैसर्गिक स्वरूप
भारतीय आध्यात्मिक चिंतनानुसार, एकच चैतन्य संपूर्ण चराचर सृष्टीत व्यापलेले आहे. त्यामुळे समाजातील कोणतेही कार्य करणारी व्यक्ती माझा भाऊ किंवा बहीण आहे. त्याच्यातही तेच चैतन्य आहे, जे माझ्यात आहे. जर असे असेल, तर जातिभेदावर आधारित उच्च-नीचतेची भावना निर्माण होण्याचे कारण काय? ही भावना भारताच्या ‘स्व’ची अभिव्यक्ती नाही.
जीविकेसाठी समाजात विविध प्रकारची कामे करावी लागतात आणि प्रत्येक कार्य समाजासाठी आवश्यक असते. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असू शकतात; पण माणसाचे मूल्य त्याच्या व्यवसायावरून ठरत नाही. उच्च-नीचतेची ही मानसिकता आपली नाही; ती भारतीय परंपरेचा भाग नाही.
आपली मूलभूत भावना अशी आहे; ‘हिन्दवः सोदराः सर्वे’, म्हणजे सर्व हिंदू भारतमातेची संताने असून, सर्व समान आहेत. म्हणूनच, स्वदेशी जीवनशैलीचा अर्थ असा आहे की, सर्व प्रकारचे भेद विसरून समाजात आपुलकी, आत्मीयता आणि समरसतेने वागणे. आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि सामाजिक जीवनात सर्व जात, वर्ग आणि विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा सहज आणि स्वाभाविक समावेश असणे आवश्यक आहे. हाच खऱ्या अर्थाने स्वदेशी जीवनशैलीचा गाभा आहे.
संत-परंपरेतील समरसतेची उदाहरणे
आदि शंकराचार्य यांच्या जीवनातील एक प्रसिद्ध घटना आहे. काशीमध्ये गंगास्नान करून ते घाटावरून वर चढत होते. समोरून एक चांडाळ त्याकाळात ज्याला ‘अस्पृश्य’ मानले जात असे, घाटाकडे येत होता. शंकराचार्यांनी त्याला ‘अपसर, अपसर’ (दूर व्हा) असे सांगितले. त्यावर त्या चांडाळाने प्रश्न केला, “आपण कोणाला दूर जाण्यास सांगत आहात? माझ्या शरीराला? तर- माझे आणि तुमचे शरीर हे एकाच पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. की माझ्या आतल्या आत्म्याला? तर- तुमच्यात आणि माझ्यात तोच एक आत्मा आहे.” हे ऐकताच, शंकराचार्यांना जाणवले की, हा सामान्य मनुष्य नसून साक्षात् भगवान विश्वनाथ आहेत. त्यांनी तत्काळ त्या चांडाळाला दंडवत-प्रणाम केला. ही घटना भारतीय अध्यात्मातील एकात्मतेच्या दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे.
त्याचप्रमाणे, दक्षिण भारतातील महान संत रामानुजाचार्य यांच्या जीवनातही एक प्रेरणादायी प्रसंग आढळतो. वृद्धावस्थेत ते दररोज कावेरी नदी किनारी स्नानासाठी जात असत. नदीत उतरताना ते दोन ब्राह्मण शिष्यांच्या आधाराने जात; परंतु स्नान करून परत येताना ते तत्कालीन समाजात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या ‘मल्लार’ समाजातील एका व्यक्तीचा हात धरून वर येत असत. याचे कारण विचारले असता, रामानुजाचार्य म्हणाले, “नदीत स्नान करून मी माझे शरीर शुद्ध करतो आणि परतताना या बंधूंच्या आधाराने चालून माझे मन शुद्ध करतो.”
अशाप्रकारची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आढळतात. त्यांचे स्मरण ठेवत आपण आपल्या जीवनाची स्वदेशी रचना करावी आणि सर्वांशी समान आत्मीयतेने व समरसतेने वागावे.
पर्यावरण आणि भारताचा ‘स्व’ भाव
आपली परंपरा सांगते, ‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः’, म्हणजे ही पृथ्वी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. हाच भारताचा ‘स्व’ भाव आहे; परंतु पाश्चात्त्य विकास मॉडेलचे अंधानुकरण करताना आपण पर्यावरणीय असंतुलनाचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. ही सृष्टी आपली माता असल्याने तिचा उपयोग केवळ गरज भागवण्यासाठी व्हावा, शोषणासाठी नव्हे.
प्रतीकात्मक कथा
एकदा निवडणुकीची घोषणा झाली. चार उमेदवार मैदानात उतरले- जलप्रदूषण, वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण आणि अन्नप्रदूषण. चौघांनीही निवडणूक चिन्ह म्हणून ‘मनुष्य’ची मागणी केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले, हे चिन्ह फक्त एकालाच दिले जाईल. ज्याच्याकडे सर्वात ठोस कारण असेल, त्यालाच ते मिळेल. एकामागून एक सर्व उमेदवारांनी एकच मुद्दा मांडला; मनुष्यानेच आम्हाला जन्म दिला आहे, वाढवले आहे. आज आम्ही इतके मोठे झालो आहोत की, निवडणूक लढवण्याइतके सक्षम झालो आहोत, तेही मनुष्यामुळेच. ही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते की, आपण वेळेत आपले वर्तन बदलले नाही, तर आपल्या स्वतःच्या निर्माण केलेल्या समस्या आपल्या समोर उभ्या राहतील.
या कथेद्वारे विद्यार्थ्याने अत्यंत अचूक आणि तीक्ष्ण व्यंग मांडले आहे. ज्या समस्यांचा येथे प्रतीकात्मक उल्लेख आहे, त्या निर्माण करणारा ‘मनुष्य’ हा कोणताही मागास, गरीब किंवा अविकसित समाज नाही. प्रत्यक्षात,
स्वतःला प्रगत, समृद्ध आणि विकसित म्हणवणाऱ्या मानव समूहाने गेल्या सुमारे 500 वर्षांत उभ्या केलेल्या विकास मॉडेलमुळे आज पाणी, हवा, जमीन आणि अन्न यांसारख्या जीवनाधारांवरच संकट निर्माण झाले आहे. याउलट, भारताचे राष्ट्रजीवन किमान 20 हजार वर्षांहून अधिक जुने असून, तेही निसर्गाशी संतुलन राखत विकसित झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि त्याचा समतोल जपणे, हे आपल्या स्वदेशी जीवनशैलीचे अविभाज्य अंग आहे.
याचा अर्थ, केवळ विचार नाही; तर प्रत्यक्ष आचरणही आवश्यक आहे. पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळणे, जास्तीत-जास्त वृक्षारोपण करणे, तसेच त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे, ही सर्व स्वदेशी जीवनशैलीची नैसर्गिक अंग आहेत.
‘मी’ ते ‘आपण’ची यात्रा - कुटुंबाचे महत्त्व
पाश्चात्त्य विचारसरणी व्यक्तीला अधिक व्यक्तिवादी आणि भौतिकतावादी बनवते. याउलट, भारतीय विचारसरणी मानते की, समाजाची सर्वात लहान घटक एकेक व्यक्ती नसून कुटुंब आहे. कुटुंबाची निर्मिती होण्यासाठी व्यक्तीच्या ‘मी’चा ‘आपण’मध्ये विलय होणे आवश्यक असते. हीच भारताच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे; ‘मी’ ते ‘आपण’ची यात्रा.
ही यात्रा कुटुंबापासून सुरू होऊन नातेवाईक, गाव किंवा शहर, राज्य, राष्ट्र, संपूर्ण मानव जात आणि अखेरीस संपूर्ण चराचर सृष्टीपर्यंत विस्तारते. या विस्तारित ‘आपण’मध्ये असलेल्या त्या परम-चैतन्याशी एकरूप होणे, हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, ज्याला आपण ‘मोक्ष’ असे म्हणतो. याच क्रमाला भारतीय तत्त्वज्ञानात ‘व्यष्टि, समष्टि, सृष्टी आणि परमेष्टी’ अशी पायरी-पायरीची संकल्पना मानली जाते. या दीर्घ आध्यात्मिक प्रवासाचा प्रारंभबिंदू कुटुंब आहे. त्यामुळेच चार आश्रमांमध्ये ‘गृहस्थाश्रमाला’ विशेष महत्त्व दिले गेले आहे.
भारताचे वैश्विक दायित्व आणि कुटुंबाची भूमिका
आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. विविध उपासना पद्धती, भाषा, वांशिक विविधता आणि मर्यादित संसाधने यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मानव जातीने समृद्ध, सुसंवादी आणि शांततापूर्ण जीवन कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान भारताकडे आहे. हे ज्ञान भारताच्या अध्यात्माधिष्ठित जीवन दृष्टिकोनातून निर्माण झाले असून, त्याचा दीर्घ ऐतिहासिक अनुभवही भारताकडे आहे. त्यामुळे मानवकल्याणासाठी भारत एक समृद्ध, समर्थ आणि आत्मविश्वासू राष्ट्र म्हणून उभा राहणे आणि आपले ‘भारतपण’ जपणे अत्यावश्यक आहे.
भारताचा विचार महान आहे. मात्र, तो विचार आचरणात आणणारा समाज नसल्यास हे ज्ञान केवळ ग्रंथांपुरते आणि विद्वानांच्या चर्चांपुरते मर्यादित राहील. भारताचा विचार प्रत्यक्षात जगणारा समाज कुटुंब-व्यवस्थेतूनच घडतो. कुटुंबात जन्मलेल्या मुला-मुलींना ही वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरा संवादातून देणे, ही कुटुंबाची प्राथमिक जबाबदारी आहे. शाळा आणि समाजाची भूमिका त्यानंतर येते.
कुटुंबाची सातत्यता टिकवण्यासाठी पुढील पिढीचे पुरेसे अस्तित्व आवश्यक असते. सर्वसाधारणपणे प्रतिकुटुंब 2.1 म्हणजे साधारण तीन अपत्ये असतील, तर कुटुंबाची सातत्यता राखली जाते. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आठवड्यातून किमान एकदा एकत्र बसून संवाद साधला; तर सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक सातत्य सहज टिकून राहते.
याच आधारावर भारत आपली जागतिक भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सक्षम, सक्रिय आणि समर्थ राहील. हे सर्व भारताच्या ‘स्व’चे प्रकटीकरण असून, स्वदेशी जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. हे दायित्व राष्ट्राचे म्हणजेच, समाजाचे आहे. राज्य यामध्ये साहाय्यक ठरू शकते; परंतु मूळ जबाबदारी समाजाचीच आहे आणि त्या समाजाच्या घडणीत कुटुंबाची भूमिका सर्वात मूलभूत आणि निर्णायक आहे. म्हणूनच, कुटुंबप्रबोधनाला विशेष आणि अनिवार्य महत्त्व आहे.
- डॉ. मनमोहन वैद्य
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी
सदस्य आहेत.)
(अनुवाद : ओंकार मुळ्ये)