Datta Meghe : दत्ताभाऊ खऱ्या अर्थाने ‘दाता’भाऊ होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसदत्ता मेघे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
05-Apr-2026
Total Views |
नागपूर: (Datta Meghe)दत्ता मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे, गोरगरिबांचे नेते होते. लोक त्यांना प्रेमाने दत्ताभाऊ म्हणायचे. पण ते खऱ्या अर्थाने ‘दाता’भाऊ होते, लोकनेते होते. समाजातील वंचितांसाठी त्यांनी व्यवस्था उभी केली. सर्वसामान्य माणूस त्यांच्या कायम केंद्रस्थानी असायचा. त्यांच्या मदतीसाठी कायम ते तत्पर असायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. (Datta Meghe)
व्हीसीए जामठा येथे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दत्ता मेघे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कामगार मंत्री आकाश फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार माया इवनाते, आ. नाना पटोले, आ. विकास ठाकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. (Datta Meghe)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दत्ताभाऊंनी आपल्याला जी गोष्ट मिळाली नाही ती इतरांना कशी मिळेल, यासाठी विविध क्षेत्रात काम उभे करीत मदत केली. हा विस्तार करतानाही त्यांच्या डोळ्यासमोरून सर्वसामान्य माणूस गेला नाही. संस्था उभ्या करतानाही त्यांनी गुणवत्तेशी कधी तडजोड केली नाही. आरोग्य, शिक्षण, सहकार अशा प्रत्येक क्षेत्रात आपला विस्तार गुणवत्तापूर्वक होईल, असा विचार केला. अशा प्रकारचे नेते फार कमी पहायला मिळतात." (Datta Meghe)
नागपूर आणि वर्धा येथे दोन स्मारके
दत्ता मेघे यांची कर्तृत्व दर्शविणारी दोन स्मारके नागपूर आणि वर्धा येथे लवकरच निर्माण करण्यात येणार आहे. सर्वसामान्य, गोरगरिबांची सेवा करण्याचा दत्ताभाऊंचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या माध्यमातून होईल आणि स्मारकाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्यांना त्यांचे स्मरण होईल, असेही त्यांनी सांगितले. (Datta Meghe)
राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
लोकनेते दत्ता मेघे यांनी राजकारणात असतानाही पूर्णवेळ समाजकारण केले. अशी माणसे दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व होते. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला दत्ताभाऊंनी जे दुःख सोसले, त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत होती, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. (Datta Meghe)