लंडनच्या मध्यभागी उभे असलेले ‘ब्रिटिश म्युझियम’ हे केवळ एक संग्रहालय नाही, तर जगभरातील संस्कृतींच्या स्मृती जपणारे एक विशाल भांडार आहे. परंतु, या भांडारात जपलेल्या वस्तूंमध्ये अनेक वस्तू अशा आहेत, ज्यांचा उगम भारताच्या पवित्र भूमीत, मंदिरांच्या गर्भगृहात किंवा स्तूपांच्या शांत परिघात झाला होता. हजारो किलोमीटर दूर, आपल्या मूळ संदर्भापासून विलग झालेल्या या मूत आणि शिल्पांकडे पाहताना एक प्रश्न नकळत उभा राहतो- या केवळ कलाकृती आहेत की, त्या एका जिवंत परंपरेच्या तुटलेल्या कड्या आहेत?
ब्रिटिश म्युझियम’ची स्थापना इ.स. 1753 मध्ये सर हान्स स्लोन यांच्या वैयक्तिक संग्रहावर आधारित झाली. प्रारंभी हे ज्ञान आणि कुतूहल यांचे केंद्र म्हणून उभे राहिले असले, तरी पुढील शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारासोबतच या संग्रहात विविध देशांतील वस्तूंची भर पडत गेली. भारतासारख्या वसाहती देशांमधून अनेक पुरातत्त्वीय वस्तू, शिल्पे आणि हस्तकला वस्तू येथे आणल्या गेल्या. त्या काळातील ‘संकलन’ आणि ‘संरक्षण’ या संकल्पनांमागे साम्राज्यवादी दृष्टिकोनही दडलेला होता; जगभरातील वारसा एका केंद्रस्थानी गोळा करण्याचा.
भारतातील अनेक शिल्पे ही केवळ सौंदर्यदृष्टीने नव्हे, तर धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थाने अत्यंत महत्त्वाची होती. मंदिरांमध्ये स्थापित असलेल्या देवमूत या केवळ दगड किंवा धातूच्या नव्हत्या; त्या भक्ती, श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होत्या. अशा मूत जेव्हा त्यांच्या मूळ स्थानांहून दूर जाऊन काचेच्या पेटीत मांडल्या जातात, तेव्हा त्यांचा अर्थ बदलतो- पूजनीय देवतेपासून ते ‘प्रदर्शनासाठीची वस्तू’ असा हा प्रवास केवळ भौगोलिक नसून, सांस्कृतिकही आहे.
या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल घडतो, मूतचा संदर्भ हरवतो. ज्या मंदिराच्या वास्तुशिल्पाशी, उत्सवांशी आणि स्थानिक परंपरांशी त्या जोडलेल्या होत्या, त्या सर्वांपासून दूर जाऊन त्या एकाकी उभ्या राहतात. पाहणाऱ्याला त्या सुंदर वाटतात, कौशल्यपूर्ण वाटतात; परंतु त्या मूतमागील कथा, त्यांची पूजा, त्यांचा सामाजिक संदर्भ, हे सर्व हळूहळू अस्पष्ट होत जाते. अशा वेळी, संग्रहालय हे केवळ जतन करण्याचे साधन राहते की, विस्मरणाची सुरुवात होते, हा प्रश्न विचार करायला भाग पाडतो.
आजच्या काळात या वस्तूंच्या पुनर्स्थापनेबाबत म्हणजेच, त्या त्यांच्या मूळ देशात परत आणण्याबाबत जगभर चर्चा सुरू आहे. भारतामध्येदेखील ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चर्चांमध्ये इतिहास, नैतिकता आणि सांस्कृतिक हक्क यांचा गुंता आहे; परंतु या सर्वांपलीकडे एक गोष्ट निश्चित आहे, या शिल्पांकडे पाहताना आपण केवळ त्यांची कला पाहू नये, तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि इतिहासाची जाणीव ठेवावी. कारण, या मूत केवळ भूतकाळाच्या अवशेष नाहीत, तर त्या आजही एका जिवंत परंपरेचे निःशब्द साक्षीदार आहेत. याच पार्श्वभूमीवर या संग्रहालयात असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण मूत आपण समजून घेणार आहोत.
1. सदाशिव
काश्मीरच्या नंदनवनातून वेगवेगळ्या देशांत शेकडो वर्षे प्रवास करून शेवटी ब्रिटिश संग्रहालयात स्थिरावलेली ही 1000-1200 वर्ष जुनी प्रतिमा. काश्मीरच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत पद्धतीने सुरू असणाऱ्या धार्मिक साधनेचा हा पुरावा आहे. ‘शैव’ संप्रदायाचा विचार मांडणारी ही प्रतिमा. समोर दिसणारे तीन चेहरे बघून बऱ्याचदा त्रिमूत म्हणून आपण फसतो. पण, हे चेहरे म्हणजे तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात आणि ईशान असे असतात; जे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. खास काश्मिरी शैलीचा मुकुट, कपाळावरचा तिसरा डोळा, अघोर रूपाची दाढी आणि उग्र चेहरा, अंगावरचे दागिने या सर्व गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेल्या आहेत.
2. हरिहर
इंग्लंडमधल्या बेकर आणि फ्रिज या दोन महिलांनी आपल्या वैयक्तिक संग्रहालयातील हे शिल्प ब्रिटिश संग्रहालयाला दान केले. आता हे आठव्या-नवव्या शतकातले, मध्य प्रदेशमधल्या ‘खजुराहो’ भागातले अतिशय सुंदर शिल्प यांच्या वैयक्तिक संग्रहालयात कसे आले? हा प्रश्न पडतोच; पण त्याच्याकडे थोडा काळ दुर्लक्ष करून आपण शिल्पावर लक्ष केंद्रित करूया. आपले मार्ग, साधना प्रकार, अधिष्ठात्री देवता जरी वेगळ्या असल्या, तरीही अंतिम सत्य एकच आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी इतरांच्या मार्गात अडथळे निर्माण न करता एकत्र साधना करता येईल, या विचाराने वेगवेगळे देव एकत्रित कोरले गेले. अशीच शिव आणि विष्णू यांची एकत्रित प्रतिमा म्हणजे ‘हरिहर’. घड्याळ्याचा काटा जसा फिरतो, तसे शिल्प बघताना लक्षात येते की, एका बाजूला नंदी, गणपती, कार्तिकेय या शिवाशी निगडित छोट्या-छोट्या प्रतिमा आहेत; तर दुसऱ्या बाजूला गरुड, शेष या विष्णूशी निगडित. मुख्य मूतच्या हातात एका बाजूला ‘अक्षमाला’ आणि ‘त्रिशूळ’ आहे; तर दुसऱ्या बाजूला ‘चक्र’ आणि ‘शंख’, अनुक्रमे शिव आणि विष्णू यांची आयुधे. पण, या मूततील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे मुकुट. मुकुटाच्या अर्ध्या भागात जटा कोरलेल्या आहेत आणि त्यात कवटीचा भाग पण आहे; तर अर्ध्या भागात विष्णूचा किरीट मुकुट कोरलेला आहे. अतिशय उत्तम अशी ही कलाकृती या संग्रहालयात बघायला मिळते.
3. लिंगोद्भव मूत
ही आणि यानंतर बघणारे शिल्प हे भारताच्या पूर्व-किनाऱ्यावरच्या भागातून इथे आणले गेले. विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात श्रेष्ठत्वावरून वादविवाद झाला, त्यावेळी अचानक एक मोठा स्तंभ उत्पन्न झाला. दोन्ही बाजूंनी याचा शेवट शोधावा आणि ज्याला तो मिळेल, तो श्रेष्ठ अशी दोघांमध्ये चर्चा झाली. विष्णू ‘वराह’ रूपात भूमीखाली गेले, तर ब्रह्मा वरचे टोक शोधण्यासाठी निघाले. विष्णूला काही तळ मिळाला नाही; पण ब्रह्माने आपल्याला टोक दिसले आहे, असे खोटे सांगितले आणि अचानक तिथे मोठी ज्वाला तयार झाली आणि त्यातून शिव प्रकट झाले. ब्रह्मदेवाची फारशी मंदिरे का नाहीत, याचे उत्तर देणारी ही कथा. या शिल्पात खाली भूमीमध्ये जाणारा विष्णू तुम्हाला दिसेल, मधे हातात ‘परशू’ आणि हरीण घेतलेले शिव आहेत. त्यांच्या भोवतीने ज्वाळा दिसत आहेत आणि सर्वात वर ब्रह्मा दिसतात. छोट्याशा शिल्पातून खूप मोठी शिकवण देऊन जाणारी ही कथा आहे.
4. चामुंडा
साक्षात मृत्यूचे चित्रण आपल्या आचार्यांनी या चामुंडेच्या माध्यमातून करून ठेवले आहे. सर्वोत्तम कला कुठली, जी त्या कलेतून तोच भाव व्यक्त करते. इथे बघणाऱ्याला तो भाव थेट काळजात जाऊन भिडतो. खपाटीला गेलेले पोट, खोबणीत गेलेले डोळे, शरीर म्हणजे फक्त सापळा, लोंबलेले स्तन, विकट हास्य, गळ्यात नरमुंडांची घातलेली माळ, वाहन म्हणून ‘घुबड’ आणि आसन म्हणून ‘प्रेत’ - अंताचे यापेक्षा सुंदर वर्णन काय असू शकते?
आज या विषयाकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू बदलत आहे. लोकांमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दलची जाणीव वाढू लागली आहे; केवळ इतिहास म्हणून नव्हे, तर ओळख आणि आत्मसन्मानाचा भाग म्हणून. अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकही आता या प्रश्नांवर उघडपणे बोलू लागले आहेत- ही शिल्पे कुठून आली, कशी गेली आणि ती परत यावीत का? 'Bring Back Indian Gods' (ब्रिंग बॅक इंडियन गॉड्स) सारख्या चळवळींमुळे या विषयाला एक नवे व्यासपीठ मिळाले आहे, जिथे हरवलेल्या देवतांच्या पुनरागमनाची मागणी केवळ भावनिक नाही, तर सांस्कृतिक न्यायाची मागणी बनली आहे. कदाचित, या प्रयत्नांमुळे एक दिवस असा येईल, जेव्हा या देवता पुन्हा आपल्या भूमीत, आपल्या परंपरेत, आपल्या लोकांमध्ये परततील. तोपर्यंत मात्र, त्या काचेआड उभ्या राहूनही आपल्याला एकच प्रश्न विचारत राहतात; आपण त्यांना केवळ पाहणार आहोत की, त्यांच्या परतीसाठी काही पावले उचलणार आहोत?
- इंद्रनील बंकापुरे
7841934774