हजारो शब्द जे व्यक्त करू शकत नाहीत, ते एक चित्र व्यक्त करते असे म्हणतात; ते आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांकडे पाहिल्यावर पटते. व्यंगचित्रे वस्तुस्थितीचे काहीसे अतिरंजित चित्रण करतात, हे खरे. मात्र, बंगालमधील राजकीय वास्तव हे व्यंगचित्राइतकेच अतिरंजित आहे. या राजकीय वास्तवाने बंगाली लोकांच्या सुसंस्कृतपणावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याचे आकलन...
भारतातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांवर काढलेले एक व्यंगचित्र आजही अगदी तंतोतंत लागू व्हावे, यावरून त्या राज्यात इतक्या वर्षांत काहीच बदललेले नाही, हे दिसून येते. या चित्रात दिसते की, लक्ष्मणचा प्रसिद्ध ‘कॉमन मॅन’ समोरून जाणार्या लष्करी चिलखती गाड्या आणि हेलिकॉप्टर वगैरेंकडे विस्मयचकित होऊन पाहात आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या त्याला समजावून सांगत आहेत की, देशावर परचक्र आलेले नाही. पण, पश्चिम बंगालमध्ये शांततेत निवडणुका घेण्यासाठी ही तयारी सुरू आहे. इतक्या दशकांपूर्वीची प. बंगालमधील राजकीय स्थिती आणि आजची स्थिती यात काहीच फरक कसा पडलेला नाही? बिहारसारख्या राज्यात लालूप्रसादांचे ‘जंगलराज’ असतानाही निवडणुकीत कधी इतकी अव्यवस्था आणि हिंसाचार दिसला नाही. जम्मू-काश्मीरसारख्या दहशतवादाने पूर्णपणे ग्रस्त असलेल्या राज्यातही कधी इतके व्यापक प्रमाणात आणि उघडपणे निवडणूक हिंसाचार घडल्याचे दिसले नाहीत. त्या राज्यातील सामाजिक स्थितीही प. बंगालपेक्षा निश्चितच मागास. तरीही, तेथील जनतेने आपल्या हक्कांची इतकी पायमल्ली करू दिली नव्हती, हे खरे आहे.
प. बंगालसारख्या कथित सुशिक्षित प्रदेशात मात्र निवडणूक हिंसाचार हा युद्धातील हिंसाचारासारखा अंगावर येतो. इतर राजकीय पक्ष आणि राजकीय भाष्यकारही हे सर्व सामान्य असल्याचे सांगतात, ही खरी सर्वात धक्कादायक गोष्ट. म्हणजे सत्तेवर असलेला पक्ष वा आघाडी आपली सत्ता टिकविण्यासाठी सर्व कायद्यांचे सर्रास उल्लंघन करणार, ही गोष्ट इतरांनी मान्यच केली आहे, असे मानायचे का? यंदा होत असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांसाठी त्या राज्यात अभूतपूर्व सुरक्षा दलांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंदोबस्त मतमोजणीनंतरही ६० दिवस तसाच तैनात केला जाईल, यावरून तेथील परिस्थिती किती गंभीर आहे, ते स्पष्ट होते. पूर्वी डावी आघाडी असो की, आता ममता बॅनर्जी व त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, यांनी इतक्या उघडपणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवून ठेवली असतानाही, त्यांच्या निवडणुकांना कायदेशीर मान्यता कशी दिली जात होती? याचा अर्थ, हे पक्ष मुक्त व स्वतंत्र निवडणुकीद्वारे सत्तेवर आलेले नव्हते, तर मतदानात घोटाळे करून व सामान्य मतदाराला धमकावून व त्याचा मतदानाचा अधिकार रद्द करून सत्तेवर आले होते.
आजही ममतांचा पक्ष अगदी उघडपणे हेच करीत आहे, ही धक्कादायक गोष्ट आहे. कारण, पूर्वीच्या तुलनेत आज या निवडणुकांतील गैरप्रकार देशातील जनतेसमोर विविध मार्गांनी येत आहेत. मालदा येथील एका मतदान केंद्रावरील ‘ईव्हीएम’वर भाजपच्या पुढील बटण प्लास्टिकचे आवरण लावून बंद केल्याचा व्हिडिओ दुपारीच वृत्तवाहिन्यांवरून दाखविला जात होता. ही गोष्ट अन्यत्रही होत असेलच. या स्थितीत यंदाच्या निवडणुकीत तृणमूल विजयी झाली व भाजपला बहुमत मिळाले नाही, तर ती जनभावना होती, असे मानणे आत्मवंचना ठरेल. प्रत्यक्ष हिंसाचारच नव्हे, तर तृणमूलचे नेते व ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे वाचिक हिंसाचारही उघडपणे करीत होते. त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच धमकी दिली. "शाह यांनी ४ मे रोजीच्या मध्यरात्री बंगालमध्ये राहूनच दाखवावे. मग आम्ही त्यांना दाखवू की, आम्ही किती मोठे गुंड आहोत,” या शब्दांत अभिषेक बॅनर्जी यांनी शाह यांना धमकावले आहे. दुसरीकडे तृणमूलचे प्रवक्ते रुजू दत्ता हेही मतदारांना उघडपणे धमकाविताना म्हणतात की, "मतमोजणीनंतर सुरक्षा दले माघारी जातील, तेव्हा आम्ही तुम्हाला (भाजप मतदारांना) बघून घेऊ.” चक्क कॅमेर्यावर अशा धमक्या देण्याची या नेत्यांची हिंमत कशी होते? हे सर्व भारतातच सुरू आहे, यावर प्रथमदर्शनी विश्वास बसणे अवघड आहे.
प. बंगालच्या आजच्या स्थितीचे सारे खापर केवळ राजकीय पक्षांवर फोडून चालणार नाही. राजकीय पक्षांच्या या गुंडगिरीला काही प्रमाणात बंगाली जनताही जबाबदार आहे. डावी आघाडी असो की, ममता बॅनर्जी; यांचे पक्ष जेव्हा दहशतीच्या जोरावर सामान्य मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावून घेत होते, तेव्हा ही जनता तो अन्याय मुकाटपणे सहन करीत होती. इतकेच नव्हे, तर बहुसंख्य हिंदू मतदारही तृणमूलला किंवा डाव्या आघाडीला मते देत होते. एकप्रकारे ते आपल्याच पायावर धोंडा मारून घेत होते. ममता असो की डावी आघाडी, ते राज्यातील बहुसंख्य हिंदूंच्याच मतावर निवडून येत होते, ही वस्तुस्थिती. पण, या पक्षांनी चतुरपणे राजकीय ‘नॅरेटिव्ह’ असे तयार केले होते की, राज्यातील अल्पसंख्य मुस्लीम मतदारांच्या जीवावर आम्ही सदैव सत्तेवर येतच राहू. परिणामी, हिंदू मतदारांमध्ये एक प्रकारची हताशता आली होती, असे मानता येते.
आज दुसर्या टप्प्यातील मतदानात भाजपला किती हिंदू मतदार मत देतात, त्यावरच भाजपचे सरकार स्थापन होणार की नाही, ते ठरेल असे सांगितले जाते. याचा अर्थ, ममतांना बहुसंख्य हिंदूंनीच सत्तेत कायम ठेवले होते. ज्या ममता बॅनर्जींनी मुस्लीम परंपरांसाठी हिंदूंच्या धार्मिक सणांवर व सांस्कृतिक उत्सवांवर बंधने आणली आणि अल्पसंख्य मुस्लीम मतदारांवर करदात्यांचा पैसा उधळला, तिला हे हिंदू मतदारच भरभरून मते देत होते! लक्ष्मण यांची व्यंगचित्रे म्हणूनच दंतकथा बनतात. कारण, जनता ही लक्ष्मणरेषा ओलांडत नाही. सुदैवाने यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी बर्याच प्रमाणात निर्भयतेने मतदान केल्याचे दिसून येते. पहिल्या टप्प्यात झालेले ९३ टक्के मतदान हे मतदारांमधील भीतीची भावना ओसरल्याचे लक्षण मानावे लागेल. कालही झालेले ९० टक्के मतदान हेच दर्शविते की, निदान आता बंगाली मतदार आपली खरी भावना व्यक्त करण्याचे धाडस करत आहे. त्याच्या या धाडसात भरभक्कम सुरक्षा दलांच्या बंदोबस्ताचा वाटा मोठा आहे.
- राहुल बोरगांवकर