॥सौंदर्यलहरी भाष्य ॥ (भाग २२)

    30-Apr-2026
Total Views |
saraswati devi
 
कवीन्द्राणां चेतः
कमलवन-बालातप-रुचिं
भजन्ते ये सन्तः
कतिचिदरुणामेव भवतीम्|
विरिञ्चि-प्रेयस्या-
स्तरुणतर-श्रृङ्गर लहरी-
गभीराभि-र्वाग्भिः
र्विदधति सतां रञ्जनममी॥१६॥
 
आदि शंकराचार्यांनी या श्लोकात देवीच्या वर्णकांतीचे आणि तिच्या उपासनेतून मिळणार्‍या वाग्वैभवाचे अत्यंत हृद्य वर्णन केले आहे. चित्त हे मानवाच्या पूर्वसंचिताचे वैभव आहे. ज्या उच्च कोटीच्या साधकांचे चित्त हे चिखलातील कमलाप्रमाणे निर्मल झाले आहे, त्यांच्यावर श्री ललिता देवीचा कृपावर्षाव होतो. उगवत्या सूर्याची जी रक्तिमा लाली असते, तिला ‘अरुणवर्ण’ म्हणतात. देवीची कांती अरुणवर्णाची आहे. मग चित्तरूपी कमल वनात जशी सूर्याची प्रथम किरणे पडतात, त्याचप्रमाणे साधकांच्या चित्तामध्ये ललिता देवीच्या कृपेचा प्रकाश पडतो. याचा स्थूल असा की, श्री ललितादेवीच्या अरुण वर्णाचे ध्यान करणारा साधक तिच्या कृपेला प्राप्त होतो आणि त्याच्या वाणीत एक विलक्षण सामर्थ्य येते. वाणी हे देवी सरस्वतीचे स्वरूप आहे. देवी सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी आहे. तिची कृपा झाल्याने, साधकाच्या चित्तात शृंगाराच्या नव्या नव्या लहरी उठतात. ही वाणी अत्यंत गहन, अर्थपूर्ण आणि रसाळ असते.
 
श्री ललिता देवीच्या अरुणवर्णाची महती देवीच्या प्रत्येक स्तोत्रात गायली आहे. देवीच्या ध्यानाच्या श्लोकांमध्येही हा उल्लेख आवर्जून असतो. आदि शंकराचार्य विरचित श्री ललिता पंचरत्न श्लोक, अष्ट वाग्देवी रचित श्री ललिता सहस्रनामामध्येही हा उल्लेख आहे. ‘बालारुण’ हा वर्ण सृष्टीच्या आरंभाचा, नवनिर्मितीचा आणि इच्छाशक्तीचा द्योतक आहे. त्रिपुरसुंदरीच्या उपासनेत तिचे अरुणस्वरूप हे इच्छाशक्ती, अर्थात सर्व सृष्टीमागील आद्य स्फूर्ती दर्शविते. म्हणूनच उपासनेत याचा उल्लेख वारंवार येतो. कमलवन हे साधकाच्या चित्ताचे प्रतीक आहे. जसे कमळ चिखलात राहूनही निर्मळ असते, तसे साधकाचे चित्त संसारात राहूनही विकाररहित असते. त्या निर्मळ चित्तावर जेव्हा देवीच्या अरुण कृपेचा प्रकाश पडतो, तेव्हा ते पूर्णपणे प्रकाशित होते. शक्तिउपासनेत मानवी चित्त ही त्याची स्वयंचेतना आहे, तर चित ही वैश्विक चेतना आहे.
 
बृहदारण्यक उपनिषद - २.४.५ 
आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः
 
याज्ञवल्य मैत्रेयीला सांगतात, हे प्रिये, आत्मा हाच खरा जाणण्यायोग्य आहे. त्यासाठी चार टप्पे आहेत. प्रथम श्रवण - गुरूकडून सत्य ऐकणे; आधुनिक काळात शास्त्रग्रंथांचे वाचन हेही श्रवणाचेच रूप आहे. त्यानंतर मनन - ऐकलेल्या गोष्टींवर बुद्धीने सखोल विचार करून, शंकांचे निरसन करणे. अंतिम टप्पा निदिध्यासन - त्या सत्याशी पूर्णपणे एकरूप होईपर्यंत, अखंड ध्यान करणे. श्रवण-वाचन बीज पेरते, मनन त्याला पाणी घालते आणि निदिध्यासन त्याचे फळ पिकवते. बाह्य जगतातील या ज्ञानाचे, या पद्धतीने मानवी मेंदू पृथक्करण करतो. परंतु, ‘कवी’ असा ज्यांचा उल्लेख होतो, ते असे श्रेष्ठ तत्त्वचिंतक असतात की, ज्यांना जगताचा कार्यकारण भाव जाणून घ्यायचा असतो. अशा कवींचा साधकांचा उल्लेख आपण ‘ऋषी’ म्हणून करतो. हे ऋषी जगतातील अज्ञात सत्ये जाणून घेण्यासाठी सातत्यपूर्ण ध्यान करतात. यामुळे त्यांचे चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धीची प्रक्रिया प्रपंचात बद्ध असूनही तुम्हाला विकारमुक्त करण्याची आहे. यातून तुमचे चित्त पूर्ण शुद्ध झाले की, जणू ते एखाद्या कमल पुष्पाच्या वनाप्रमाणे भासते. मग हे कमल पुष्प रूपी तुमचे चित्त, श्री ललिता देवीच्या कृपेने उमलण्यास आरंभ होतो. कमळाचे फूल उमलण्यासाठी सूर्योदय होणे अनिवार्य असते. अगदी तशीच क्रिया साधकाच्या चित्तातही घडते. वैश्विक चेतनारूपी ज्ञानाचा प्रकाश साधकाच्या उमललेल्या कमल पुष्पाप्रमाणे नाजुक, कोवळ्या चित्तावर पडतो. त्यामुळे साधकाचे कवित्व जागृत होते आणि त्याला वैश्विक चेतना, त्याच्या मनातील समस्त प्रश्नांचे उत्तर अर्थात ज्ञान प्रदान करते. देवीच्या कृपेने साधकाला या ज्ञानाला शब्दबद्ध करण्याचे सामर्थ्यही प्राप्त होते.
 
ब्रह्मदेव हा सृष्टीतील सृजन क्रिया साधणारे ईश्वरी तत्त्व मानले जाते. त्याची पत्नी/प्रिया सरस्वती ही वाणीचे रूप आहे. अर्थात, परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार स्तर असून, वाणी या माध्यमातूनच प्रकट होते. गुण रूपाने ब्रह्मदेव हे परम तामसी तत्त्व आहे आणि सरस्वती हे परम सात्त्विक स्वरूप आहे. सृजनासाठी तमोभाव आवश्यक आहे; पण सृजन हे सात्त्विक रूपानेच प्रकटले पाहिजे, असा प्रकृतीचा अनुपम नियम आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे साधकाच्या चित्तात वैश्विक चेतनेकडून ज्ञान प्राप्त झाले आहे; परंतु आता त्याला शब्दबद्ध करण्यासाठी वाणी अर्थात सरस्वतीची कृपा आवश्यक आहे. सरस्वतीच्या कृपेने साधकाला प्राप्त ज्ञान शब्दबद्ध करण्याची प्रतिभा विकसित होते. या प्रतिभेच्या बळावर साधक त्या ज्ञानाला आवरणबद्ध करून, शब्दमाध्यमातून प्रकट करतो.
 
आवरणबद्ध करण्यासाठी, त्याला शृंगाररस पूर्णपणे आत्मसात झालेला असणे आवश्यक आहे. कामभावना ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. या कामभावनेचे प्रकटीकरण शृंगाररसातून होते. सरस्वतीच्या कृपेने या शृंगाररसाला आत्मसात करणारा साधक, प्राप्त ज्ञानाला शब्दबद्ध करताना त्याला शब्दशृंगाराचे आवरण प्रदान करतो. यामुळेच त्याचे काव्य हे त्या ज्ञानाचे प्रकटीकरणच असते. त्याचे काव्य हे बहुआयामी असते. त्याचा सामान्य मानवाच्या वृत्तींना आल्हाद प्रदान करणारा एक अर्थ असतो. पण, त्याच काव्याचा आस्वाद घेताना, ज्ञानी मुमुक्षू मंडळींना वैश्विक चेतनेकडून मिळालेले ते मूळ ज्ञान उमगते.
 
त्याच्या वाणी आणि लेखणीला शब्दबद्ध करण्याचे ज्ञान आणि शृंगाररसाचे आच्छादन प्रदान करण्याचे सामर्थ्य, कवीला सरस्वती कृपेने प्राप्त होते. हे कवित्व जागृत करण्यासाठी आवश्यक असणारी चित्तशुद्धी, श्री ललिता देवीच्या उपासनेतून साधते. चित्त पूर्ण शुद्ध झाल्यावर तुमचे चित्त आणि वैश्विक चेतना यांचा संयोग होतो आणि तुम्ही ज्या ज्ञानासाठी पात्र आहात, ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होते. मिळालेले ज्ञान तुमच्या वैयक्तिक हिताचे नसून, तुम्ही जगताचा कार्यकारणभाव जाणून तो सामान्यजनांना उलगडून सांगण्याचसाठी प्राप्त करता. त्यामुळे हे ज्ञान शब्दबद्ध करणे आणि त्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणेही तितकेच आवश्यक. सामान्यजनांची क्षमता निखळ ज्ञान ग्रहणाची नसते, आणि त्यांना त्याची तितकीशी आवश्यकतासुद्धा नसते. मग या ज्ञानावर तुम्ही सरस्वतीच्या कृपेने, शृंगाररसाचे आच्छादन टाकता. मग हे ज्ञान सामान्यजन ग्रहण करून, त्यांचा भावनात्मक रसपरिपोष होतो. त्याचवेळी त्या ज्ञानातील अंश त्यांना नित्य जीवनात वापरता आल्याने, त्यांचे लौकिक जीवन धन्य होते. जे ज्ञानी असतात, ते प्रदीर्घ चिंतन करून सरस्वती कृपेने मूळ स्वरूपातील ज्ञान प्राप्त करतात आणि समाजहितासाठी त्याचा व्यापक स्वरूपात वापर करु शकतात.
 
वेदांची उत्पत्ती नेमकी याच पद्धतीने झाली आहे. वैश्विक चेतनेकडून प्राप्त ज्ञानाला, ऋचांच्या स्वरूपात बद्ध केले गेले. या ऋचांचे संहिता, क्रम आणि घन पद्धतीने पठन करून ते जतन केले. वेद विद्या गुरुकुलातून सामान्य साधकांना शिकवली गेली आणि त्यांनी त्याचा व्यवहारात वापर केला. पुढे ज्ञानी मंडळींनी त्यातील गुह्य तत्त्व वापरून, मानवाचे व्यापक हित साधले. याचे एकच उदाहरण म्हणजे, ऋग्वेदातील श्रीसूक्त. हे आपण सामान्य लोक लक्ष्मीची कृपा व्हावी, म्हणून पठण करतो. पण हेच निसर्ग सूक्तही आहे. हे त्या अर्थाने जाणून घेतले, तर त्याचा शेती करताना प्रचंड लाभ होईल. यामुळे, घर अन्नधान्याने भरून जाईल इतके उत्पादन मिळू शकते. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर तुमच्या ध्यानात येईल की, आपल्याकडे ‘जे न देखे रवी ते देखे कवि’ असे का म्हणतात.
 
 
- सुजीत भोगले