कर्णाने प्रतिज्ञा केली की, दुसरा दिवस उजाडताच तो पांडवांना ठार मारेल. हे ऐकून दुर्योधन त्या रात्री सुखाने झोपला; कारण त्याचे शत्रू पांडव मारले जाण्याची शक्यता अधिक बळावली होती. पांडवांच्या शिबिरात ही बातमी पोहोचली आणि त्यामुळे पांडव बेचैन झाले. कर्ण जे बोलेल त्याप्रमाणे करेल, कारण कर्ण युद्धशास्त्रात परमवीर आहे. पांडवांनी श्रेष्ठबुद्धी भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि त्यांनी पांडवांना सुयोग्य मार्गदर्शन केले. श्रीकृष्णास माहीत होते की, कर्ण मोठा दानशूर आहे. थोडी स्तुती केल्यानंतर आणि प्रातःकाली कोणाही ब्राह्मणाने त्याच्याकडे दान मागितले, तर याचकास अवश्य कवचकुंडले दान देईल. येथे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारी साधक अवस्था आहे. श्रीकृष्णाने धर्मराजास ब्राह्मणाच्या रूपात प्रातःकाली कर्णाच्या शिबिरात जाऊन, त्याच्याकडून कवचकुंडले मागण्यास सांगितले.
दुसर्या दिवशी धर्मराज दानाचे मागणे मागण्यासाठी कर्णाच्या द्वारी गेला. धर्मस्वरूप ब्रह्म जाणणार्या अतिथी ब्राह्मणाचे मागणे, कर्णाने त्वरित मान्य केले आणि आपली कवचकुंडले काढून त्या अतिथी ब्राह्मणास दिले. ब्रह्म जाणण्यासाठी कर्ण ब्रह्म जाणणार्या खर्या ब्राह्मण वृत्तीला आपली कुवृत्तीरूप कवच आणि कुंडले देतो, ज्यामुळे कर्णवृत्ती नष्ट होऊन खरे ब्रह्मज्ञान प्राप्त करील. कर्णाचे दान मिळाल्यावर पांडव प्रसन्न झाले; कारण कर्णाच्या निर्लज्जतेची कवच आणि कुंडले निघून गेल्यामुळे, अर्जुनरूप सत्य ज्ञानाच्या साधकाला नीच कर्णवृत्तीला मारून ब्रह्म जाणणार्या ब्रह्मवृत्तीमध्ये घेऊन जाणे सोपे झाले. कर्णाचा मृत्यू होणे, म्हणजे कर्णरूप उथळ वृत्ती नष्ट होऊन आता तो ब्रह्मरूप होणे आहे. दुसरा दिवस उजाडला आणि दुर्दम्य आशेने कर्ण रणांगणात पांडवांशी युद्ध करण्यासाठी उतरला. अर्जुन आणि कर्णामध्ये युद्ध सुरू झाले. कर्ण आता जीवाची बाजी लावून अर्जुनाशी लढतो. तो आता जाणत होता, त्याच्या अंगावर आता कवच नाही. अर्जुनाचे बाण त्याचे शरीर विदीर्ण करू लागले, कर्ण रक्तबंबाळ झाला.
शल्य मामा
कर्णाच्या रथाचा सारथी, पांडवांचा हितकर मामा शल्य हा आहे. शल्य दोन अटींवरच कर्णाच्या रथाचे सारथ्य करण्यास राजी झाला. अटी अशा होत्या की, शल्य कर्णाजवळ सत्य गोष्टी निर्भीडपणे सांगेल व त्याच्या रथाचे सारथ्य सोडून दुसरे कोणतेही काम तो करणार नाही. ‘शल्य’ म्हणजे काटा किंवा मनाला टोचणार्या गोष्टी. कर्णाच्या मनास एक गोष्ट बोचत होती की, तो चांगले काम करीत नाही. हेच शल्याचे, म्हणजेच विवेकाचे कर्णाला स्पष्ट सांगणे आहे. युद्ध चालू असता, अचानक कर्णाच्या रथाचे एक चाक जमिनीत रुतले. ते वर काढण्यासाठी कर्ण निःशस्त्र अवस्थेत रथावरून खाली उतरला. आता त्याला आठवले की, त्या देवगायीला त्याने मारहाण करून जमिनीत रुतविलेले होते, त्याचेच फळ तो भोगीत आहे. परंतु कर्ण हा अट्टाहासी वृत्ती कायम ठेवणारा वीर असल्याने, त्याने रुतलेले चाक जमिनीतून बाहेर काढण्याचे काम चालूच ठेवले. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली की, कर्णासारख्या नीच माणसाला (वृत्तीला) मारण्याचा हाच श्रेष्ठ अवसर आहे.
कर्णाने अर्जुनाला युद्धनीतीची आठवण करून दिली की, निःशस्त्र शत्रूवर प्रहार करता कामा नये. त्यावेळी कर्ण निःशस्त्र होता. श्रीकृष्णाने कर्णास स्पष्टपणे सांगितले की, त्याला धर्माचा उपदेश करण्याचा काहीही अधिकार नाही; कारण दुर्योधनाबरोबर राहून त्याने सतत पांडवांवर जे अन्याय केले, त्याचे स्मरण श्रीकृष्णाने कर्णाला दिले. कर्णाने प्रारंभापासूनच अन्यायी आणि अधर्मी लोकांशी सहवास केला, त्यांना साहाय्य केले. अशा अधर्मी माणसास अधर्माने मारणे, हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले. अर्जुनाने आत्मरूप तीर चालवून, कर्णास काळाच्या विळख्यात गुरफटविले. अशा तर्हेने अर्जुनाच्या ब्रह्मावर लक्ष केंद्रित करणार्या शराने, कर्णवृत्तीचा अंत केला. आता कर्णवृत्ती ब्रह्म जाणणारी व ब्रह्मस्वरूप झाली. रामायण, महाभारतात जी व्यक्ती मारली जाते, ती व्यक्ती आपली नीच वृत्ती टाकून उच्च वृत्ती प्राप्त करते. कर्णाच्या जीवनात येणारी सगळी व्यक्तिरूप नावे, योगशास्त्रात येणारे अनुभव, अडचणी आणि त्यावर कशा प्रकारे मात करावी, याचे साद्यंत वर्णन आहे, हे न समजल्यास या महान ग्रंथांचा सत्य आशय लक्षात येणार नाही.
द्रौपदी
द्रौपदीस असलेल्या पाच पतींमुळे ती विश्वविख्यात आहे. द्रौपदी ही द्रुपद राजाची मुलगी आणि पाच पांडवांची पत्नी दाखविली आहे. तिच्या भावाचे नाव दृष्टद्युम्न दाखविले आहे. जो दृपद राजास यज्ञाच्या ज्वालांपासून प्राप्त झालेला दाखविला आहे. यज्ञाच्या ज्वालेपासून कोणीही व्यक्ती मिळत नसते, म्हणून अशा प्रकारच्या जन्मात काही उच्च व्यास-आशय असला पाहिजे. द्रौपदी एक प्रखर स्वाभिमानी आणि बुद्धिमान स्त्री दाखविली आहे, जी आपल्या पाच पतींबरोबर नेहमी राहते, समाजकार्यात, राजकारणात, वनवास आणि अज्ञातवासातच नाही, तर युद्धभूमीवरील शिबिरामध्येसुद्धा ती पाच पतींबरोबर होती. पांडवांच्या इतर काही बायकाही दाखविल्या आहेत; परंतु त्या पाडवांबरोबर राहात नव्हत्या आणि त्या नाममात्र होत्या.
द्रौपदी ही पांचाल देशाच्या द्रुपद राजाची एकुलती एक मुलगी. तिच्या पूर्वजन्माची कथासुद्धा अतिशय सुरस वर्णिली आहे. पूर्वजन्मात ही स्त्री होती. तिने उत्तम पती मिळण्यासाठी भगवान शिवाची आराधना करून, घोर तपश्चर्येला आरंभ केला. घोर तपस्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. तिने पाच वेळा ‘उत्तम पती मिळू दे,’ हे वाक्य उच्चारले. शंकराने तिला पाच पती मिळतील, असा वर दिला आणि शंकर अंतर्धान पावले. या जन्मात ती द्रुपद राजाची कन्या झाली. द्रुपद ज्या देशाचा राजा होता, त्या देशाचे नावही पांचाल दाखविले आहे. येथे पांडव म्हणजे पाचांचा हिशोब आहे. ही सर्व नावे व्यासनिर्मित आहेत. ‘पांचाल’ म्हणजे ज्याला पंचतत्त्वावधान एकास एक लागून एकत्र आले आहेत, (पंच + अलि) असे शरीर. या पांचाल देशाचा राजा द्रु-पद म्हणजे, जो साधनेमध्ये द्रुत गतीने प्रगती करून उत्तम पद प्राप्त करतो, तो साधक द्रुपद आहे. अशा द्रुपदाची कन्या द्रौपदी आहे, जी द्रुतगतीने उत्तम पद प्राप्त करते. यासाठीच ती पंडुपुत्र पांडवांशी एकत्र विवाह केलेली दाखविली आहे. तिच्याशी विवाह करून, पंचप्राणरूप पांडव द्रुत गतीने उत्तम पद प्राप्त करू शकतात. यासाठी द्रौपदी आपल्या पाच पतींबरोबर नेहमी एकत्र राहते, व्यवहारात, युद्धात आणि स्वर्गारोहणाच्या वेळीसुद्धा!
- योगिराज हरकरे