भक्तकाजकल्पदृप असणार्या भगवान नारायणांनी भक्तांच्या उद्धारासाठी दहा अवतार धारण केले. त्यापैकी चौथा अवतार हा नृसिंह होय. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी प्रकट झालेल्या नृसिंह महाराजांच्या आज जयंतीनिमित्ताने, त्यांच्या श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्राचा भावार्थ...
आदि शंकराचार्य विरचित ‘श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रम्’ हे भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराची आळवणी करणारे हृदयस्पर्शी स्तोत्र आहे. ‘करावलंब’ म्हणजे हाताचा आधार देणे. संसाराच्या विविध दुःखांत अडकलेला भक्त, या स्वरूपात आचार्य आपला उद्धार करण्याची विनंती करत आहेत. नृसिंहांच्या रौद्र रूपाला अनुपम आणि लडिवाळ शब्दांत आचार्य साद घालतात.
ज्वालाहोबिलमालोलक्रो डकारञ्जभार्गवाः|
योगानन्दश्छत्रवटः पावनो नव मूर्तयः॥१॥
स्तोत्राच्या सुरुवातीला आचार्यांनी प्रभू नृसिंहांच्या नऊ विशिष्ट रूपांचे स्मरण केले आहे. यामध्ये ज्वाला नृसिंह, अहोबिल नृसिंह, मालोल नृसिंह, क्रोड नृसिंह, कारंज नृसिंह, भार्गव नृसिंह, योगानंद नृसिंह, छत्रवट नृसिंह आणि पावन नृसिंह यांचा समावेश आहे. हे नऊ अवतार भक्तांच्या विविध संकटांचे निवारण करण्यासाठी आणि त्यांना आनंद देण्यासाठी प्रकट झाले आहेत.
श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे भोगीन्द्रभोगमणिरञ्जितपुण्यमूर्ते|
योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्॥२॥
भगवान विष्णू क्षीरसागरात निवास करत असून, त्यांनी हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे. त्यांचे शरीर शेषनागाच्या फण्यांवरील मौल्यवान मण्यांच्या तेजाने उजळून निघाले आहे. भगवंत हे केवळ योग्यांचे स्वामी नसून, ते या संसाररूपी अथांग सागरातून पार नेणारी एक नौकाही आहेत. हे प्रभो, आपण मला या भवसागरातून वाचवण्यासाठी आपला मदतीचा हात द्यावा.
ब्रह्मेन्द्ररुद्रमरुदर्ककिरीटकोटि-सङ्घट्टिताङ्घि कमलामलकान्तिकान्त|
लक्ष्मीलसत्कुचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥३॥
प्रभू नृसिंहांचे चरणकमल इतके पवित्र आहेत की ब्रह्मा, इंद्र, शिव, वायू आणि सूर्य यांसारखे थोर देवही त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. त्यांच्या मुकुटांचा स्पर्श भगवंतांच्या चरणांना होतो, ज्यातून एक दिव्य तेज प्रकट होते. भगवंत, लक्ष्मीच्या हृदयातील कमळात निवास करणार्या राजहंसाप्रमाणे आहेत. हे प्रभो, आपण मला या भवसागरातून वाचवण्यासाठी आपला मदतीचा हात द्यावा.
संसारदावदहनातुरभीकरोरु-ज्वालावलीभिरतिदग्धतनूरुहस्य|
त्वत्पादपद्मसरसीशरणागतस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्॥४॥
येथे संसाराची तुलना जंगलात लागलेल्या भीषण आगीशी केली आहे. या आगीच्या ज्वालांनी भक्ताचे शरीर होरपळून निघाले आहे. ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेला जीव सरोवराकडे धाव घेतो; त्याप्रमाणेच हा त्रस्त भक्त भगवंताच्या चरणकमलरूपी शीतल सरोवराचा आश्रय घेत, शांततेसाठी देवाचा हात मागत आहे.
संसारजालपतितस्य जगन्निवास सर्वेन्द्रियार्थ-बडिशार्थझषोपमस्य|
प्रोत्खण्डितप्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥५॥
मानव हा संसार मायेच्या जाळ्यात अडकला आहे. ज्याप्रमाणे अन्नाच्या लोभाने मासा कोळ्याच्या गळाला लागतो, तसाच माणूस इंद्रियांच्या विषयांकडे आकर्षित होऊन स्वतःचे नुकसान करून घेतो. या जाळ्यातून सुटका करण्यासाठी, भगवंताने मदतीचा हात पुढे करावा, हीच या भक्ताची इच्छा आहे.
संसारकूपमतिघोरमगाधमूलं संप्राप्य
दुःखशतसर्पसमाकुलस्य|
दीनस्य देव कृपया पदमागतस्य लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥६॥
संसार ही एक अत्यंत भयानक आणि अथांग खोल विहीर आहे. या विहिरीच्या तळाशी दुःखरूपी शेकडो सर्प भक्ताला दंश करुन, त्याला त्रास देत आहेत. असा हा दीन आणि दुबळा भक्त विहिरीत कोसळल्यावर, भगवंताच्या चरणांचे स्मरण करत आपला मदतीचा हात मागत आहे.
संसारभीकरकरीन्द्रकराभिघात-निष्पिष्टमर्मवपुषः सकलार्तिनाश|
प्राणप्रयाणभवभीतिसमाकुलस्य लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥७॥
संसाराला येथे एका अवाढव्य आणि भयानक हत्तीची उपमा दिली आहे. या हत्तीने आपल्या सोंडेच्या प्रहाराने, भक्ताच्या शरीराचे महत्त्वाचे अवयव चिरडून टाकले आहेत. जन्माच्या आणि मृत्यूच्या भीतीने व्याकुळ झालेला हा जीव, सर्व दुःखांचा नाश करणार्या प्रभूला विनंती करतो आहे की, हे प्रभो, आता तुमचा आधार द्या.
संसारसर्पघनवक्त्रमयोग्रतीव्र-दंष्ट्राकरालविषदग्धविनष्टमूर्तेः|
नागारिवाहन सुधाब्धिनिवास शौरे लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्॥८॥
संसार हा एक मोठा सर्प असून, त्याचे मुख भयानक आहे. या सर्पाच्या विषारी सुळ्यांनी भक्ताला दंश केल्यामुळे, त्याचे शरीर होरपळून गेले आहे. गरुडारूढ असलेल्या आणि क्षीरसागरात निवास करणार्या भगवंताने, या भक्ताला विषाच्या प्रभावातून वाचवण्यासाठी हात द्यावा, अशी आळवणी येथे केली आहे.
संसारवृक्षमघबीजमनन्तकर्म-शाखाशतं करणपत्रमनङ्गपुष्पम्|
आरुह्य दुःखफलिनं पततो दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्॥९॥
संसार हा एक असा विचित्र वृक्ष आहे, ज्याचे बी ‘पाप’ आहे, ज्याच्या असंख्य फांद्या म्हणजे मानवाची ‘कर्मे’ आहेत, ‘इंद्रिये’ ही त्याची पाने आहेत आणि ‘कामदेव’ हे त्याचे फूल आहे. या वृक्षाला ‘दुःख’ नावाची फळे लागतात. अशा या धोकादायक वृक्षावरून खाली कोसळणार्या जीवाला वाचवण्यासाठी दयाळू नृसिंहाने आपला हात द्यावा.
संसारसागरविशालकरालकाल-नक्रग्रहग्रसननिग्रहविग्रहस्य|
व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपीडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्॥१०॥
हा संसार एक विशाल सागर असून, त्यात काळ रूपी भयानक सुसरी वावरत आहेत. या सुसरी भक्ताच्या शरीराला पकडून गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. आसक्ती आणि मोहाच्या लाटांनी हा जीव हैराण झाला असून, संकटात सापडलेल्या या भक्ताला भगवंताच्या आधाराची नितांत गरज आहे.
संसारसागरनिमज्जनमुह्यमानं दीनं विलोकय
विभो करुणानिधे माम्|
प्रह्लादखेदपरिहापकृतावतार लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥११॥
आचार्य म्हणतात हे करुणानिधी, मी या संसारसागरात बुडत आहे आणि मोहग्रस्त झालो आहे. माझ्याकडे एकदा कृपेने पाहा. ज्याप्रमाणे तुम्ही प्रल्हादाचे दुःख दूर करण्यासाठी अवतार घेतला, त्याचप्रमाणे या दीन भक्तालाही वाचवण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे करा.
संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रवरार्दितस्य|
आर्तस्य मत्सरनिदाघनिपीडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम्॥१२॥
संसार हे एक घनदाट आणि भयानक जंगल आहे, जिथे हा जीव भरकटला आहे. या जंगलात कामदेव हा एका हिंस्र सिंहाप्रमाणे भक्ताला घाबरवत असून, मत्सर हा ग्रीष्म ऋतूच्या कडक उन्हाप्रमाणे त्याला पिडत आहे. अशा त्रस्त अवस्थेत असलेल्या मला वाचवण्यासाठी भगवंतांनी धावून यावे.
बद्ध्वा गले यमभटा बहु तर्जयन्तः कर्षन्ति यत्र भवपाशशतैर्युतं माम्|
एकाकिनं परवशं चकितं दयालो लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥१३॥
जेव्हा जीवनाचा अंत जवळ येतो आणि यमदूत गळ्याला फास लावून ओढून नेतात, तेव्हा माणूस अत्यंत हतबल असतो. शेकडो संसारपाशांनी बांधलेला हा जीव भयभीत झालेला असतो. अशा वेळी कोणताही नातेवाईक मदत करू शकत नाही, केवळ भगवंताचा कृपाकटाक्ष आणि त्यांचा मदतीचा हातच तारून नेऊ शकतो.
लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव|
वैकुण्ठ कृष्ण मधुसूदन पुष्कराक्ष देवेश देहि कृपणस्य करावलम्बम्॥१४॥
आचार्य आता भगवंतांच्या विविध नामांचा (उदा. लक्ष्मीपती, कमलनाभ, केशव, वासुदेव, कृष्ण, मधुसूदन) आर्ततेने पुकार करून त्यांना आवाहन करत आहेत. मी ‘कृपण’ देवाधिदेवांना विनंती करतो की, या गरीब जीवावर दया करा आणि त्याला आपला मदतीचा हात द्या.
एकेन चक्रमपरेण करेण शङ्खमन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन्|
वामेतरेण वरदाभयपद्मचिह्न लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥१५॥
भगवंतांच्या चतुर्भुज रूपाचे वर्णन येथे केले आहे. एका हातात चक्र, दुसर्यात शंख, तिसर्या हाताने लक्ष्मीला आधार दिलेला असून, चौथ्या हाताने भक्तांना अभय देणारी मुद्रा धारण केली आहे. अशा सुंदर आणि रक्षक रूपात असलेल्या भगवंताने मला आधार द्यावा.
अन्धस्य मे हृतविवेकमहाधनस्य चोरैः प्रभो बलिभिरिन्द्रियनामधेयैः|
मोहान्धकूपकुहरे विनिपातितस्य लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥१६॥
आचार्य म्हणतात, माझी इंद्रिये हे असे शक्तिशाली चोर आहेत, ज्यांनी माझे ‘विवेक’ नावाचे सर्वांत मोठे धन चोरून नेले आहे. विवेकाशिवाय मी आंधळा झालो असून, त्यांनी मला मोहाच्या अंधार्या विहिरीत ढकलून दिले आहे. या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी हे भगवंता, मला आपला हात द्या.
प्रह्लादनारदपराशरपुण्डरीक-व्यासादिभागवतपुङ्गवहृन्निवास|
भक्तानुरक्तपरिपालनपारिजात लक्ष्मीनृसिंह
मम देहि करावलम्बम्॥१७॥
प्रभू नृसिंह हे प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक आणि व्यास यांसारख्या महान भक्तांच्या हृदयात नेहमी निवास करतात. ते आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कल्पवृक्षाप्रमाणे (पारिजात) आहेत. जो कोणी त्यांची भक्ती करतो, त्याचे ते पूर्णपणे पालनपोषण करतात.
लक्ष्मीनृसिंहचरणाब्जमधुव्रतेन स्तोत्रं कृतं शुभकरं भुवि शङ्करेण|
ये तत्पठन्ति मनुजा हरिभक्तियुक्तास्ते यान्ति तत्पदसरोजमखण्डरूपम्॥१८॥
आदि शंकराचार्यांनी स्वतःला भगवंताच्या चरणांमधील भुंगा मानून, या स्तोत्राची रचना केली आहे. हे स्तोत्र जगाचे कल्याण करणारे आहे. जे लोक शुद्ध भक्तीने याचे पठण करतील, त्यांना भगवंतांच्या अविनाशी चरणकमलांची प्राप्ती होईल आणि ते या जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त होतील.
-ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज