मुंबई : (Ram Mandir) श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या परकोट्यावर उभारण्यात आलेल्या सहा मंदिरांपैकी एका भगवान शिवाच्या मंदिराच्या शिखरावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधीवत पूजन करून ध्वजारोहण केले. यावेळी आचार्य इंद्रदेव मिश्र व पुष्पदीप यांनी वेद मंत्रोच्चारासह ध्वजपूजन केले. त्यांच्यासोबत वेदपाठी गोपाल पांडेय, त्रिपुरारी त्रिपाठी, शिवा दीक्षित, उत्कर्ष पांडेय आणि मृदुल तिवारी यांनी ध्वजारोहणावेळी राष्ट्रसूक्ताचे पठण केले.
योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माच्या ऐक्यावर भर देत भारताची एकता अधिक बळकट करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. आपल्या परंपरेला अधिक दृढतेने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, ज्यांनी जातीयतेच्या आधारावर देश आणि समाजाची फूट पाडण्याचा प्रयत्न केला, ते आज श्रीराम मंदिराच्या वैभवाचे साक्षीदार आहेत. आज आपण अनुभवत असलेला हा गौरव पुढे नेण्याची गरज आहे.(Ram Mandir)
पुढे ते म्हणाले, श्रीराम जन्मभूमी आंदोलन हे जगातील एक अद्वितीय आंदोलन होते. गरीब ते श्रीमंत सर्वांनी आपल्या रामासाठी भव्य मंदिराची इच्छा व्यक्त केली. इ.स. १५२८ पासून सनातन धर्मीय सतत संघर्ष करत होते. अशोक सिंघल यांनी आंदोलनाची धुरा सांभाळल्यानंतर जो उर्जा प्रवाह निर्माण झाला, तो आजही देशभर जाणवतो. राम त्रेतायुगापासून भारताला जोडत आले आहेत आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.(Ram Mandir)
सनातन धर्मीय एकत्र आले तेव्हाच मंदिरनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला. आपल्या फूट पाडण्याचा नेहमीच फायदा घेतला गेला, पण आज आपण एकजुटीने उभे राहिल्यामुळे सुरक्षित आहोत. हा गौरवशाली क्षण आपण अनुभवत आहोत आणि तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानगढी येथे दर्शन घेतले. तसेच रामलला आणि प्रथम मजल्यावरील रामदरबाराचे दर्शन घेतल्यानंतर शिवमंदिरात अभिषेक केला.(Ram Mandir)
श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या परकोट्यात ईशान्य दिशेला असलेल्या शिवमंदिराचा ध्वजदंड १९ फूट ७ इंच उंच असून ध्वजाची लांबी ९ फूट ३ इंच तर रुंदी ४ फूट ७ इंच आहे.(Ram Mandir)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक