Mumbai Municipal Corporation : महापालिकेत प्रस्तावावरून गदारोळ
- नियमभंगाचा आरोप करत विरोधक आक्रमक
30-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) मुंबई महापालिकेच्या सभागृहात आज एका पुनर्विकास प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. दीर्घकाळापासून असलेली परंपरा मोडत निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला असून अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.
महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडे मोठे बहुमत असले तरी सभागृह चालवताना विरोधी पक्षाशी चर्चा करण्याची परंपरा आणि नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र आज उत्तर विभागातील रफीक अहमद कडवाई मार्ग परिसरातील विविध शहर सर्वेक्षण क्रमांकांशी संबंधित, दादर-नायगाव येथील ‘आझाद नगर’ तसेच वडाळ्यातील ‘कमला नगर’ या महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांच्या पुनर्विकास प्रस्तावात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त भूभाग समाविष्ट करताना नव्याने निविदा प्रक्रिया राबवणे अपेक्षित असताना ती टाळण्यात आल्याचेही सांगण्यात आले.(Mumbai Municipal Corporation)
या प्रस्तावात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भूभाग समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला असून संबंधित आर्थिक व्यवहार व प्रक्रियाही अस्पष्ट असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. संख्याबळाच्या जोरावर निर्णय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.(Mumbai Municipal Corporation)
“संविधानातही मोठ्या बहुमतासोबत विरोधकांना महत्त्व दिले आहे. नियमांची पायमल्ली होऊ देता कामा नये. हा प्रस्ताव नव्याने प्रक्रिया राबवूनच आणावा,” असे विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.(Mumbai Municipal Corporation)