Mithi River : नालेसफाईतील गाळात बांधकामातील डेब्रिज
- सईदा खान यांचा संताप
30-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mithi River) मिठी नदीतील गाळ उपशाच्या कामात अनियमितता होत असून गाळासोबत बांधकामातील डेब्रिज मिसळून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सईदा खान यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिठी नदीतील गाळ काढताना नदीतील नैसर्गिक गाळ, चिकणमाती आणि इतर घटकांसोबत बाहेरील बांधकामातील डेब्रिज मुद्दाम मिसळले जात असल्याचा दावा सईदला खान यांनी केला आहे. “नदीच्या पट्ट्यात आधी बांधकामातील साहित्य टाकले जाते, त्यावर गाळ टाकून तो एकत्रित उचलला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात किती गाळ काढला जातो आणि किती अवशेष मिसळले जातात, याबाबत शंका निर्माण होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील काही दृश्य पुरावेही संबंधितांकडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.(Mithi River)
या कामात मुंबईकरांच्या कराच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत त्यांनी यावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली. दर आठवड्याला गाळ काढल्याचे आकडे दिले जात असले तरी तो खरोखर नदीतील गाळ आहे की बांधकामातील अवशेष, याचा खुलासा करावा, असे त्यांनी म्हटले आहे. “गाळामध्ये मोठे दगड असणे अशक्य आहे, त्यामुळे या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी त्यांनी सांगितले आहे.(Mithi River)
या प्रकरणी स्थायी समितीत मुद्दा उपस्थित केला. तसेच अशा प्रकारचे आरोप अनेकदा नगरसेवकांकडून करण्यात येतात. काही प्रकरणांत कारवाईही होते. मात्र तरीही पुन्हा त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Mithi River)
तसेच, या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उडती यंत्रे आणि उपग्रहांच्या माध्यमातून देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. “प्रत्येक वर्षी पूरस्थिती निर्माण होते, विशेषतः कुर्ला आणि आसपासच्या भागांत नागरिकांना मोठा फटका बसतो. त्यामुळे या कामांमध्ये पारदर्शकता आणि काटेकोर देखरेख आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.(Mithi River)