BMC Budget Discussion : मुंबईच्या प्रगतीसाठी 'स्थगिती' नको तर 'गती' हवी; प्रतिक कर्पे यांचा अर्थसंकल्पीय भाषणात एल्गार
महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत विशेष समिती स्थापन करण्याची मागणी
30-Apr-2026
Total Views |
मुंबई : (BMC Budget Discussion) "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आज विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. मुंबईकरांना आता प्रकल्पांना 'स्थगिती' देणारे नव्हे, तर शहराला 'प्रगती'कडे नेणारे नेतृत्व हवे आहे," अशा शब्दांत भाजप नगरसेवक प्रतिक कर्पे यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत आपला ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुंबईतील महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.(BMC Budget Discussion)
कॉर्पोरेट महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समितीची मागणी
नाशिक येथील टीसीएस कंपनीत महिलांच्या सुरक्षेबाबत समोर आलेल्या गंभीर प्रकाराचा संदर्भ देत कर्पे यांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरला. ते म्हणाले, "मुंबईत बीकेसी, अंधेरी, लोअर परळ अशा कॉर्पोरेट झोनमध्ये लाखो महिला काम करतात. नाशिकमध्ये ज्या तत्परतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अंडरकव्हर' ऑपरेशन करून कारवाई केली, ती कौतुकास्पद आहे. त्याच धर्तीवर मुंबईतही राज्य सरकार, महिला आयोग आणि महापालिका यांची एक संयुक्त विशेष समिती स्थापन करावी, अशी विनंती मी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे."(BMC Budget Discussion)
प्रगती की स्थगिती? कर्पे यांचा सवाल
मागील कार्यकाळातील कामांचा पाढा वाचताना कर्पे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "बुलेट ट्रेन, मेट्रो आणि गारगाई प्रकल्पाला स्थगिती देऊन मुंबईच्या विकासाचा गळा घोटण्याचे काम झाले. गारगाई प्रकल्प वेळेत झाला असता, तर आज मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले नसते. मात्र, आता मोदी-फडणवीस यांच्या महायुती सरकारमुळे मुंबई पुन्हा प्रगतीच्या वाटेवर आहे," असे त्यांनी नमूद केले.(BMC Budget Discussion)
महापालिकेच्या शाळांसाठी एक 'होलिस्टिक पोर्टल' बनवून त्यात शिक्षकांचा स्तर आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या जाहीर करावी. तसेच शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हावे. महापालिका रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता दर्शवणारे पोर्टल आणि हेल्प डेस्क असावे. वाढत्या ऑटिझमच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक दोन वॉर्डमागे एक 'ऑटिझम सेंटर' उभे करावे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित 'स्मार्ट सिग्नल' आणि मुंबईत जागोजागी भूमिगत पार्किंग विकसित करण्याची सूचना त्यांनी केली.(BMC Budget Discussion)
दादर स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करत, भंगार गाड्यांच्या नावाखाली होणारी अतिक्रमणे रोखण्याची मागणी केली. आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी महायुती सरकारच्या विकास पर्वाचा पुनरुच्चार केला. "मुंबईकरांनी आता ठरवले आहे की, मोदीजी आणि फडणवीसजींच्या नेतृत्वाखालील महायुतीचा हा विकासाचा दौर असाच सुरू राहील," असा ठाम विश्वास प्रतिक कर्पे यांनी व्यक्त केला.(BMC Budget Discussion)