मुंबई : (Legislative Council Election 2026) येत्या १२ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी गुरुवारी ९ उमेदवारांनी विधानभवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. तर, पोटनिवडणूकीच्या एका जागेवर भाजपच्या प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, महायुतीच्या वाट्याला विधानपरिषदेच्या ९ पैकी ८ तर, महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा आली आहे. यात भाजपतर्फे सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. तर शिवसेनेच्या वतीने नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झीशान सिद्दीकी यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Legislative Council Election 2026)
हेही वाचा : Maharashtra Legislative Council election BJP list : विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर
मविआत 'महानाट्य'
दुसरीकडे, महाविकास आघाडीत उबाठा गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर, उबाठा गटाच्या नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन मनधरणी केली. शिवाय "विधानपरिषदेची जागा उबाठा गट लढवत असेल तर, पुढच्या निवडणूकीत राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे. ती जागा आम्ही सोडणार नाही," अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली. त्यावर "२ वर्षानंतर राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे. तेव्हाचे तेव्हा बघू. शिवसेना हा महाविकास आघाडीतील मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडीच्या वतीने उबाठा गटाचे अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Legislative Council Election 2026)