Raghav Chadha Video : लोकांचे प्रश्न मांडणं हा गुन्हा आहे का? कारवाईनंतर राघव चड्ढांचा आप'वर हल्लाबोल! मांडली सविस्तर भूमिका

    03-Apr-2026   
Total Views |

Raghav Chadha Video


मुंबई : (Raghav Chadha Video)
राज्यसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर परखडपणे भूमिका मांडणारे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांची पक्षाने उपनेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच स्वतः राघव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन व्हिडीओ संदेश शेअर करत आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्यावरील कारवाईसाठी आम आदमी पक्षाला जाब तर विचारलाच आहे, पण त्याचबरोबर 'मेरी खामोशी को मेरी हार ना समझ लेना...' असे म्हणत पक्षाला सूचक इशारादेखील दिला आहे. (Raghav Chadha Video)
 
व्हिडीओमध्ये काय म्हणाले राघव चड्ढा?

कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्यावरील कारवाईसाठी आम आदमी पक्षाला जाब तर विचारलाच आहे, पण त्याचबरोबर पक्षाला सूचक इशारादेखील दिला आहे. "मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलायची संधी मिळते, तेव्हा मी लोकांचे प्रश्न तिथे मांडतो. कदाचित ते असे विषय असतात जे सामान्यपणे संसदेत मांडले जात नाहीत. पण मग लोकांचे प्रश्न मांडणं हा गुन्हा आहे का? मी काही चूक केली का? कारण आम आदमी पक्षानं राज्यसभा सचिवालयाला असे कळवले आहे की माझ्या संसदेतील बोलण्यावर निर्बंध घालण्यात यावेत. आता माझ्या बोलण्यावर कुणाला बंदी घालावीशी का वाटली?" अशा शब्दांत राघव चड्ढांनी आम आदमी पक्षाला जाब विचारला आहे. (Raghav Chadha Video)

पक्षाचं काय नुकसान झालं?

"मी जेव्हा कधी संसदेत बोललो, तेव्हा मी सामान्य माणसाचे मुद्दे मांडले. विमानतळावरील अन्नपदार्थांच्या प्रचंड किंमती, झोमॅटो-ब्लिंकइटच्या डिलीव्हरी रायडर्सचा मुद्दा, जेवणातील भेसळीचा मुद्दा, टोल प्लाझावरील लूट, बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त दरांचा मुद्दा, अगदी मध्यमवर्गीयांवरील करांचं ओझं, कंटेंट क्रिएटर्सवरील कारवाया, टेलिकॉम कंपन्या १२ महिन्यांत १३ वेळा आपल्याला रिचार्ज करायला लावतात असे असंख्य मुद्दे मी संसदेत मांडले. यामुळे देशाच्या सामान्य जनतेचा फायदा झाला. पण आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं?" असाही सवाल त्यांनी केला आहे. (Raghav Chadha Video)

'आप'ला सूचक इशारा
 
दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी राघव चड्ढांनी 'आप'ला सूचक इशारा दिला आहे. "जनतेनं मला खूप प्रेम दिलं. मी जेव्हा जेव्हा जनतेचे प्रश्न मांडतो, तेव्हा तुम्ही मला पाठिंबा देता. मी तुमचे आभार मानतो. मला अशीच साथ देत राहा. मी तुमच्यातलाच एक आहे. ज्या लोकांनी आज माझा संसदेत बोलण्याचा अधिकार काढून घेतला, त्यांना मी काहीतरी सांगू इच्छितो. 'मेरी खामोशी को मेरी हार ना समझ लेना.. मैं वो दरिया हूँ, जो वक्त आने पर सैलाब बनता है", असे ते म्हणाले आहेत. (Raghav Chadha Video)





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\