मत्स्याहारींच्या ताटात रावस माशाची नवी प्रजात; महाराष्ट्रातून रावसच्या नव्या प्रजातीचा शोध

    03-Apr-2026
Total Views |
 rawas fish
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातून रावस माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (rawas fish). मुंबईतून या प्रजातीचे नुमने गोळा करण्यात आले आहेत (rawas fish). या प्रजातीचा अधिवास अरबी समुद्रामध्ये असल्याने तिचे नामकरण 'फिलिस्टरियटस अरॅबिकस', असे करण्यात आले असून त्याला अरेबियन फाईव्ह-फिंगर थ्रेडफिन या सामान्य नावाने ओळखले जाईल (rawas fish). मत्स्यव्यवसायात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या रावस माशाची नवी प्रजात सापडणे, हे महाराष्ट्रातील सागरी जैवविविधतेबरोबर दुर्लक्षित राहिलेले सागरी संशोधन देखील अधोरेखित करत आहे. (rawas fish)
 
 
रावस हा मासा चविष्ट असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहेत. या माशाला स्ट्राइप्ड थ्रेडफिन किंवा नॉर्दन थ्रेडफिन म्हणून ओळखले जाते. हे मासे प्रामुख्याने इंडो-पॅसिफिक प्रदेशात आढळतात. यामध्ये पूर्व आफ्रिकेचा किनारा, जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच पॉलिनेशिया पर्यंतच्या क्षेत्रांचा समावेश होतो. मात्र, आता अरबी समुद्रामधील त्यातही महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातील रावसची प्रजात वेगळी आणि नवीन असल्याचे संशोधन समोर आले आहे. ही प्रजात रावस या माशाच्या कुटुंबातील असून ती आकाराने लहान आहे. आकाराने असणाऱ्या या प्रजातीला सेंदू असे स्थानिक भाषेत म्हणतात. कोचीच्या सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधक के.व्ही.अखिलेश, ए.गोपालकृष्णन आणि भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाचे संशोधक के.के.बिनेश यांनी नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. यासंबधीचे संशोधन इंडियन जर्नल आॅफ फिशरीज या शोध पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.
 
 
संशोधक के.व्ही.अखिलेश यांनी या प्रजातीचे तीन नमुने २०१४ साली मुंबईतील ससून डाॅक आणि अलिबागमधून गोळा केले होते. इतर संशोधकांच्या मदतीने केलेल्या निरीक्षणानंतर त्यांच्या लक्षात आले की, या नवीन प्रजातीचे काही अवयव हे नॉर्दन थ्रेडफिन या ज्ञात असलेल्या रावस माशापेक्षा वेगळे आहेत. सूक्ष्म अभ्यासानंतर ही प्रजात आकारशास्त्र आणि गुणसूत्रांने देखील नॉर्दन थ्रेडफिन रावसपेक्षा वेगळी असल्याचे समोर आले. सध्या ही प्रजात अरबी समुद्रात आणि त्यातही महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रातच आढळल्याने तिचे नामकरण अरबी समुद्रावरुन अरॅबिकस, म्हणजेच अरेबियन फाईव्ह-फिंगर थ्रेडफिन असे करण्यात आले आहे. या माशांच्या कल्ल्यांचा खालचा भाग लांब, धाग्यासारख्या तंतूंमध्ये विभागलेला असतो, ज्याचा उपयोग ते गाळात किंवा वाळूत भक्ष्य शोधण्यासाठी ज्ञानेंद्रियांसारखा करतात. त्याला थ्रेडफिन म्हणतात. त्यामधील तंतूमय धाग्यांची संख्या पाच असते, म्हणून त्यांना फाईव्ह-फिंगर थ्रेडफिन असे संबोधले जाते.
 
नॉर्दन थ्रेडफिन पेक्षा वेगळे कसे ?
नॉर्दन थ्रेडफिन आणि अरेबियन फाईव्ह-फिंगर थ्रेडफिन यांच्या शरीरावरील कल्ले, खवले आणि रेषा यांच्या संख्येमध्ये फरक आहेत. नॉर्दन थ्रेडफिनच्या कल्ल्यांमधील खुरपींची संख्या (गील रेकर) २४ ते ३२ असून अरेबियन फाईव्ह-फिंगर थ्रेडफिनमध्ये ही संख्या २० ते २४ आहे. या माशांच्या पार्श्व रेषेवरील खवले (Lateral line scales) हे त्यांच्या संवेदी यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असतात. नॉर्दन थ्रेडफिनमध्ये त्यांची संख्या ६० ते ६८ असून अरेबियन फाईव्ह-फिंगर थ्रेडफिनमध्ये ही संख्या ५४ ते ५८ आहे. तसेच या दोन्ही प्रजातींमधील आनुवांशिक फरक हा ६.६ टक्के ते १०.३ टक्क्यांपर्यत आहे.