मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वानरकुट आणि निलरेखा या फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतींमध्ये (होस्ट प्लान्ट) भर पडली आहे (butterfly host plant). बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वानरकुट (monkey puzzle) या फुलपाखराची अळी ही अशोकाच्या, तर निलरेखा (common lineblue) या फुलपाखराची अळी करंजवेलीवर खाद्यग्रहण करताना आढळून आली आहे (butterfly host plant). यापूर्वी फुलपाखराच्या या प्रजातीच्या अळ्या नमूद केलेल्या वनस्पतींवर अन्नग्रहण करताना आढळून आलेल्या नव्हत्या (butterfly host plant). त्यामुळे या दोन्ही फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतींमध्ये त्या प्रजातींची भर पडली आहे. (butterfly host plant)
फुलपाखरांच्या जीवनचक्रात त्यांचे होस्ट प्लान्ट म्हणजेच खाद्य वनस्पती महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. खाद्य वनस्पती अशा वनस्पती असतात ज्यावर मादी फुलपाखरे आपली अंडी घालतात. ज्यांची पाने फुलपाखराच्या अळ्या (कॅटरपिलर) अन्न म्हणून खातात. प्रत्येक फुलपाखराच्या प्रजातीची स्वतःची खाद्य वनस्पती ठरलेली असते. जर त्या अळीला दुसऱ्या प्रकारच्या वनस्पतीवर ठेवले, तर ती बहुधा उपासमारीने मरते. शहरी अधिवासात फुलपाखरांचे त्यांच्या खाद्य वनस्पतींसोबत असणारे सहसंबंधाचे नाते अभ्यासण्यासाठी खाद्य वनस्पतींमधील विविधता जाणून घेणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत वानरकुट आणि निलरेखा या दोन्ही प्रजातीच्या खाद्य वनस्पतींच्या यादीत भर पडली आहे. याविषयीची नोंद वन्यजीव अभ्यासक अमेय पारकर, आकाश म्हाडगुत आणि गीतेश गायकवाड यांनी केली असून त्याविषयीची टिपण इंटरनॅशनल जर्नल ऑफ एंटोमोलॉजी रिसर्च या शोध पत्रिकेमध्ये प्रकाशित झाली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वानरकुट फुलपाखराच्या अळ्या अशोकाच्या झाडाची कोवळी पाने खातााना आढळून आल्या. तर निलरेखा फुलपाखराच्या अळ्या या करंजवेलीची फुलं खाताना आढळून आल्या. वानरकुटी या फुलपाखराच्या आंबा, केशपर्ण चाफा (near threatened), गुच्छकरंज, उंडी, कावशी, क्रोटॉन, समुद्रफळ, कुंभी, वंदा, रॉक्सबर्ग चेरी, लोखंडी आणि कुसूंब या ज्ञात खाद्य वनस्पती आहेत. तर निलरेखा या फुलपाखराच्या अळ्या खैर, काजू, चिल्लार, शेंदरी, तिपाणी या झाडांवर अन्नग्रहण करतात. पट्टेरी सुतारी (Common Banded Awl), पांढरी पट्टेरी सुतारी (White Banded Awl), किरण (Indian Sunbeam) या प्रजातीच्या फुलपाखरांच्या अळ्या या करंजवेलीवर अन्नग्रहण करत असल्याचे ज्ञात होते. यामध्ये आता निलरेखा फुलपाखराची भर पडली आहे. तर अशोकाच्या झाडावर अन्नग्रहण करणाऱ्या निलाक्षी (Common Ciliate Blue), शुभ्रा (Common Imperial), पठारी पांडव (Plains Cupid), गडद निलांबरी (Dark Cerulean), निलांबरी (Common Cerulean), करडा तेजस (Slate Flash) या फुलपाखरु प्रजातींच्या अळ्यांमध्ये आता वानरकुटच्या अळ्यांची भर पडली आहे. या नोंदींमुळे फुलपाखरांच्या खाद्यवनस्पतीच्या यादीविषयीच्या माहितीत भर पडली आहे.