५० वर्षांनंतर पुन्हा चंद्राकडे!

Total Views |
Moon Mission

'अपोलो १७’चे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उभे आहेत आणि या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा ध्वज दिसत आहे. ‘अपोलो १७’ ही चंद्रावर उतरणारी आणि पृथ्वीवर परतणारी सातवी आणि शेवटची मानवी मोहीम होती. दि. ७ डिसेंबर १९७२ रोजी हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्राच्या दिशेने झेपावले आणि दि. ११ डिसेंबर रोजी चंद्रावर उतरले, तर दि. १९ डिसेंबर १९७२ रोजी हे यान पृथ्वीवर पुन्हा यशस्वीरीत्या उतरले.

शेवटच्या ‘अपोलो’ मोहिमेत या कार्यक्रमातील सर्वात व्यापक चंद्र शोधमोहीम पार पडली. या मोहिमेत प्रत्येकी सात तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या तीन चाली झाल्या, तर अंतराळवीर तीन दिवसांपेक्षा जास्त काळ चंद्रावर राहिले. कमांडर जीन सेर्नन आणि लुनार मॉड्यूल पायलट हॅरिसन श्मिट चंद्रावर पोहोचणारे पहिले शास्त्रज्ञ अंतराळवीर ठरले. यांनी २४३ पौंड नमुना गोळा केला. जसजशी नवीन साधने आणि तंत्रे विकसित होत आहेत, तसतसे हे नमुने आणि मागील मोहिमांमधील नमुने चंद्राबद्दल अधिक माहिती उघड करत आहेत.

५० वर्षांहून अधिक काळ लोटलेल्या ‘अपोलो’ मोहिमेनंतर पुन्हा एकदा प्रथमच अंतराळवीर चंद्राभोवती प्रवास करत आहे. त्यामुळे ‘आर्टेमिस II’ ही मोहीम केवळ अमेरिकेची कामगिरी नसून, संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. ‘नासा’ आणि ‘कॅनेडियन स्पेस एजन्सी’ यांच्या संयुक्त सहभागातून ही मोहीम साकारली आहे. या मोहिमेत रीड व्हाईसमेन, व्हिटर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन हे अंतराळवीर सहभागी आहेत. ते केवळ अंतराळयानाची चाचणी करत नाहीत, तर भविष्यातील चंद्रावरच्या मोहिमांसाठी आणि मंगळावर जाण्याच्या तयारीचा मार्गही प्रशस्त करत आहेत.

या मोहिमेतील एक विशेष आकर्षण म्हणजे चंद्राभोवतीचा ‘फ्लायबाय’ ठरतो. म्हणजे अंतराळवीर चंद्राच्या अशा भागांचे निरीक्षण करतील, जे मानवी डोळ्यांनी फारच कमीवेळा पाहिले गेले आहेत. सूर्यप्रकाश अंशतः पडत असल्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठ्या सावल्या तयार होतील. यामुळे खड्डे, पर्वतरांगा आणि दर्‍या अधिक स्पष्टपणे दिसतील. या निरीक्षणातून वैज्ञानिकांना चंद्राच्या रचनेबाबत अधिक माहिती मिळेल.

‘आर्टेमिस II’ ही केवळ एक चाचणी मोहीम नाही, तर भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांची पायाभरणी आहे. ‘ओरियन स्पेसक्राफ्ट’ हे यान सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आल्यास पुढील मोहिमांसाठी संपूर्ण जगाचा आत्मविश्वास वाढेल. ‘नासा’च्या दीर्घकालीन योजनेनुसार, भविष्यात चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्याचा आणि त्यानंतर मंगळावर मानव पाठवण्याचा विचार आहे.
आज मानवजातीचा प्रवास आता पृथ्वीपुरता मर्यादित राहिलेला नाही. चंद्राकडे पुन्हा झेप घेताना मानव भविष्यातील अंतराळ संशोधनाचे नवे दार उघडत आहे. आजचे युग हे अतिशय प्रयोगशील आणि तंत्रज्ञानस्नेही आहे. १९६०च्या दशकात ‘नासा’ आणि सोव्हिएत युनियन यांच्यात चंद्रावर प्रथम पोहोचण्याची तीव्र स्पर्धा होती. त्या काळात ही शर्यत प्रतिष्ठेची होती. म्हणूनच, कोण आधी चंद्रावर पोहोचणार याकडे जगाचे लक्ष होते.

मात्र, आजची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी स्पर्धा भविष्यातील अंतराळ वर्चस्वासाठी आहे. चीनने २०३० पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. हे पाहता, अमेरिका या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, अमेरिकेचा मुख्य भर चंद्रावर कायमस्वरूपी उपस्थिती निर्माण करण्यावर आहे. पुढील दशकात चंद्राच्या पृष्ठभागावर एक मजबूत आणि कार्यक्षम तळ उभारण्याचा ‘नासा’चा मानस आहे. यामुळेच अमेरिकेची भविष्यातील संशोधन, संसाधनांचा वापर आणि मंगळ मोहिमेसाठी तयारी अधिक प्रभावी होईल. हे पाहता, ‘आर्टेमिस II ’ ही मोहीम याच नव्या युगाची नांदी घेऊन आली आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.