
मुंबई (ओंकार मुळ्ये) : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या गजबजाटात, प्रवाशांच्या गर्दीत आणि हमालांच्या कष्टमय जीवनात एक शांत, पवित्र आणि भावनिक कोपरा आजही जपला गेला; हमाल मंडळाने पश्चिम रेल्वेच्या जागेवर १९६४ साली उभारलेले हनुमान मंदिर. हे मंदिर केवळ विटा-मातीचं बांधकाम नाही, तर हमालांच्या श्रमातून, त्यांच्या श्रद्धेतून आणि भक्तीभावातून उभं राहिलेलं एक जिवंत श्रद्धास्थान आहे. परंतु केवळ पार्कींग उभारण्याकरीता याच मंदिरावर आता पश्चिम रेल्वे प्रशासनाचा हातोडा पडणार असल्याची माहिती समोर येतेय.
अवघ्या ४५ x १२ फुटांच्या या मंदिरात राधा-कृष्ण, हनुमानजी, लक्ष्मी माता, गणेश, भगवान शंकरांची पिंडी, तसेच नंदी आणि कासव अशा विविध देवतांच्या मूर्ती आहेत. येथील हमालांच्या या कुटुंबाने केवळ श्रमच नाही, तर संस्कृती आणि परंपरेचीही अखंड परंपरा जपली आहे. वर्षानुवर्षे ते येथे प्रत्येक सण या मंदिरात उत्साहाने साजरा करतात. अखंड हरिनाम सप्ताह असो, गणेशोत्सवाची धामधूम असो, नवरात्रीची भक्तीमय रात्र असो किंवा श्रावण महिन्यातील सत्यनारायण पूजा प्रत्येक सोहळा या मंदिरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो.
हमाल संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याने पश्चिम रेल्वे डीआरएम पंकज सिंह यांनी मंदिर हटवण्याबाबत आदेश दिला. त्यांनी सुरुवातीला मंदिर मुळ जागेवरून हटवून दुसऱ्या ठिकाणी बांधण्याबाबत स्पष्टता देखील दिली होती. त्यानुसार हमाल बांधवांनी नवीन १६ बाय १६ फूटाच्या जागेत मंदिर बांधण्याच्या प्रस्तावास मान्यताही दिली. मात्र आता डीआरएम यांनी नवीन आदेश देत, १६ बाय १६ फूट ऐवजी नवीन मंदिर १० बाय १० फूटांच्याच जागेत होईल असे सांगितले. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून त्यांनीच बांधलेली नवीन भिंत पाडण्यासाठी कारवाई होत आहे. हमाल बांधवांवर झालेला हा अन्याय असून सदर कारवाई अत्यंत चूकीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी दै. मुंबई तरुण भारतने पश्चिम रेल्वे डीआरएम पंकज सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
डीआरएम भेटायला तयार नाहीत!
हनुमान मंदिर प्रकरणाबाबत डीआरएम यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते आम्हाला कधीच वेळ देत नाहीत. ते आमच्या मेसेजना कधी उत्तर देत नाही. मंदिर नवीन जागेत बांधून देण्याबाबत त्यांनी होकार दिला होता. मात्र आता १० बाय १० फूट जागेचा मुद्दा समोर आल्यावर ना ते आम्हाला भेटायला तयार आहेत, ना चर्चेसाठी तयार आहेत. त्यांच्या मनात येईल त्यानुसार ते रोज एक नवीन आदेश काढत असतात.
- संदीप घुगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेल्वे हमाल कामगार युनियन
रेल्वे प्रशासनाकडून नोटीस नाही
पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंदिरावरील कारवाई प्रकरणात कुठलीही नोटीस दिलेली नाही. मंदिरावर देखील कुठल्याही स्वरूपाची नोटीस लावलेली नाही. हे केवळ मंदिर नसून हिंदूंच्या एकतेचे केंद्र आहे. पश्चिम रेल्वेच्या डीआरएमना आमचा इशारा आहे की, अशाच स्वरूपाचे दुसरे मंदिर १६ बाय १६ फूट जागेत ठरल्याप्रमाणे पूर्ण करून देत नाही, तोवर आपण या मंदिरात हात लावू शकत नाही. हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू!
- गौतम रावरीया, कोकण प्रांत सहसंयोजक, बजरंग दल