पूर्वी तरुणपणीच एखादा लघुउद्योग सुरु करायचा निर्णय घेतला, तरी कौटुंबिक साथ ते भांडवली आधारापर्यंत पाठबळ मिळेल की नाही, याची शाश्वती नसायची. पण, आज हे चित्र बदलले असून, उद्योजकतेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही सकारात्मक दिसतो. त्यानिमित्ताने नवउद्योजकांच्या या नव्याविश्वाचा आणि स्टार्टअप व्यवस्थेचा आढावा घेणारा हा लेख...
गेल्या सुमारे दोन दशकांत भारतीय उद्योग-व्यवसायाच्या प्रगतिशील प्रवासात लघुउद्योग क्षेत्रातील स्टार्टअपमधील नव्या व नावीन्यपूर्ण उद्योगांनी आपली विशेष छाप सोडली असून, देश-विदेश स्तरावर त्यांच्या कार्य-कर्तबगारीची नोंद घेण्यात आली आहे. व्यावसायिक संदर्भातपण या नव्या स्टार्टअप उद्योग व उद्योजकांनी कधी स्वत:चा लघुउद्योग सुरू करायचा, म्हणजे सर्वच संदर्भात मोठी जोखीम समजली जायची. मात्र, या प्रस्थापित विचारधारणेवर आपली कल्पक प्रेरणा व अथक प्रयत्नशीलतेसह या नवउद्योजकांनी यशस्वीपणे मात केली आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
गेल्या २० वर्षांतील या प्रगतिशील परिस्थितीमध्ये बर्याच खाचखळग्यांसह विविध टप्पे आढळून येतात. अगदी सुरुवातीला कुणी व विशेषत: युवा अवस्थेत स्वत:चा नवा व छोटेखानी व्यवसाय सुरू करायचे ठरविल्यास, त्याला प्रेरित-प्रोत्साहित करणार्यांपेक्षा परावृत्त करण्याचेच प्रयत्न होत असत. आज मात्र हे चित्र बर्याच अंशी बदललेले दिसते. यामागे स्टार्टअपसह लघुउद्योग आणि उद्योजकांनी व्यावसायिक जिद्द, कल्पक क्षमता, कौशल्य व सातत्य यांसह केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले. स्टार्टअप क्षेत्रातील एका पिढीला हे सारे करून स्वत:ला सिद्ध करावे लागले, हा त्यामागचा इतिहास तसा ताजाच आहे.
भारतातील लघुउद्योग क्षेत्रातील हे परिवर्तन तसे सहजसाध्य नव्हते. यासंदर्भात ‘एमएसएमई’ क्षेत्रात नव्याने स्वत:चा उद्योग सुरू करून अपेक्षित यश न मिळाल्याने अल्पावधीतच व्यवसाय गुंडाळणार्यांची संख्यापण कमी नव्हती. अर्थात, लघुउद्योग क्षेत्रातील अपयशातून शिकून या अपयशी अनुभवानंतर सातत्याने व नव्या उमेदीसह उत्साहाने प्रयत्न करून उल्लेखनीय यश प्राप्त करणार्या लघुउद्योजकांनी आपला आदर्श प्रस्तुत करून ठसा उमटविण्याची उदाहरणे आपल्याकडे दिसून येतात, हे विशेष.
यासंदर्भात प्रामुख्याने ‘इन मोबी’चे संस्थापक नवीन तिवारी यांचे उदाहरण नमूद करता येईल. त्यांंनी स्टार्टअप स्वरूपात सुरू केलेले चार लघुउद्योग अपयशी ठरले. मात्र, त्यांनी आपल्या जिद्दीसह केलेले प्रयत्न सोडले नाहीत. नवी उमेद व कल्पनांसह प्रयोगशील उद्योजकता केवळ जोपासलीच नाही, तर त्याला प्रयत्नपूर्वक सातत्याची जोड दिली. याचाच परिणाम म्हणजे पूर्वी चारवेळा अपयशी ठरलेले नवीन तिवारी आज केवळ आघाडीचे व यशस्वी लघु-उद्योजकच ठरले नाहीत, तर त्यांनी मिळविलेल्या यशापोटी आज त्यांच्या व्यवसायाला देशातील पहिला ‘युनिकॉर्न’ होण्याचा बहुमान मिळाला आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
यासंदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातील जवळ-जवळ निम्म्या म्हणजेच ४९ टक्के ‘युनिकॉर्न’ उद्योजकांना आपल्या यशाचा टप्पा गाठण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागले. यामध्ये आपल्या आधीचे प्रयत्न वा त्याला मिळालेले अपयश यामुळे खचून न जाता, या उद्योजकांनी आपले प्रयत्न सुरू करून यशस्वी ‘युनिकॉर्न’ होण्याचे आपले यश साध्य केले आहे. यामागे त्यांचे सातत्य व कल्पक प्रयत्न ही महत्त्वाची कारणे ठरली.
आधीचे वा सुरुवातीच्या टप्प्यातील अपयश आल्याने खचून न जाता, पुन्हा नव्याने व जिद्दीने प्रयत्न करणार्या यशस्वी स्टार्टअप-‘युनिकॉर्न’ श्रेणीतील उद्योजकांमध्ये ‘फिनटेक स्टार्टअप’पैकी ‘फ्रीचार्ज-युनिकॉर्न’च्या कुणाल शाह यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशाप्रकारे आधी अपेक्षित यश न मिळविणार्या व नंतर ‘युनिकॉर्न’ स्तराची झेप घेणार्या यशस्वी लघुउद्योजकांची संख्या सध्या ४०हून अधिक आहे.
नव्या स्टार्टअप लघुउद्योजकांना अशाप्रकारे बळ मिळण्यामध्ये आर्थिक पाठबळाची मोठी व महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. स्टार्टअपच्या या प्रगतिशील टप्प्यात आज देशांतर्गत सुमारे पाच लाख स्टार्टअप कार्यरत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे २०१६ मध्ये त्यांची संख्या जेमतेम ५०० होती. यातून आजवर साध्य झालेल्या आर्थिक उलाढालीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे भारतीय स्टार्टअपची २०१६ मध्ये असणारी ५.२ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल २०२४ मध्ये तब्बल १२.६ दशलक्ष डॉलर्सवर जाणे, ही आर्थिक विश्लेषण कंपनीची माहिती यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
परंपरागत स्वरूपात पाहता, भारतीय लघुउद्योगांचा स्वाभाविक भर व्यावसायिक फायद्यावर असायचा. ही स्वाभाविक परंपरा ‘एमएसएमई’सह स्टार्टअपमध्ये पण दिसून येते. याचेच प्रतिबिंब ‘सेबी’सारख्या आर्थिक व्यवहार-व्यवसाय क्षेत्रातील नियामक संस्थांच्या धोरणात्मक कारभारात दिसून येते. यातूनच ‘सेबी’ने कधी तोट्यात चालणार्या कंपन्यांनी सार्वजनिक समभाग विक्री करण्यावर निर्बंध घातले होते.
मात्र, ‘सेबी’च्या ध्येय-धोरणांत २०२१ मध्ये महत्त्वपूर्ण व मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे ‘सेबी’द्वारा नवे तंत्रज्ञान व संशोधनासह काम करणार्या कंपन्या फायद्यात नसल्या, तरी त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ व गुंतवणूक असल्यास अशा कंपन्यांना सार्वजनिक समभाग विकण्याची परवानगी दिली. ‘झोमॅटो’च्या सार्वजनिक समभाग विक्रीमुळे या नव्या पुढाकाराला प्रगत दिशा प्राप्त झाली. त्यानंतर या आणि अशा श्रेणीतील सुमारे एक डझनाहून अधिक कंपन्यांनी अशाप्रकारे व यशस्वी पद्धतीने समभाग विक्री केली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
याशिवाय, आर्थिक-व्यावसायिक क्षेत्रातील अद्ययावत स्वरूपात माहिती संकलन-विश्लेषण करणार्या ‘क्रेडीबल’ या कंपनीने लघुउद्योग-स्टार्टअप क्षेत्रात केलेल्या अभ्यासानुसार, आजवर सुमारे १००हून अधिक स्टार्टअप कंपन्यांनी २०२० ते २०२५ या काळात कंपनीअंतर्गत ‘ई-सॉप’ पद्धती व त्याद्वारे सुमारे १.७ दशलक्ष डॉलर्सचे व्यवहार यशस्वीपणे केले आहेत. यातील ‘ई-सॉप’ म्हणजेच, ‘एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन’ योजनेद्वारा अशा कंपन्या व कर्मचारी या उभयतांचा लक्षणीय फायदा झाला आहे.
सरकारी योजना आणि पुढाकारामुळे लघुउद्योग-स्टार्टअप क्षेत्राला नव्या दिशेसह मोठे पाठबळ लाभले आहे. विशेषत: नीती आयोगांतर्गत ‘अटल इनोव्हेशन मिशन’अंतर्गत मोठ्या प्रमाणावरील कामकाज झालेले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून ‘दि यंग एंटरप्रन्युअर्स अकादमी’च्या माध्यमातून विद्यार्थी-युवकांना उद्योजकतेसाठी प्रेरणा-प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याचे मोठे काम होत आहे. परिणामी, आज आठव्या वर्गातील विद्यार्थी रिशान सिंदवानीने उद्योजकतेला प्रोत्साहन देणार्या ‘ऑप्टीमाईझ साईट’ या स्वत:च्या संकेतस्थळावरून स्वत:चा व वेगळा व्यवसाय विकसित केला आहे, तर बंगळुरू येथे ११व्या वर्गात शिकणार्या आदित्यनने केवळ आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून विविध व्यावसायिक संकल्पनांचा प्रसार-प्रचार करण्याच्या व्यवसायाला फायदेशीर सुरुवात केली आहे. नव्या पिढीतर्फे व नव्या स्वरूपात सुरू झालेला स्टार्टअप उद्योगांचा हा प्रवास नक्कीच उत्साहवर्धक ठरला आहे.
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६