"अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. "लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आपण विधानसभेत गाफील राहिलो. आगामी काळात अतिआत्मविश्वासाने हुरळून न जाता, जमिनीवर काम करायला हवे. विरोधी पक्षाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपण झटायला हवे,” अशा सूचना त्यांनी या बैठकीत जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांना केल्या. त्यामुळे उशिरा का होईना, ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची तसदी घेतली म्हणावी. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांचीही बैठक घेतली. यात संघटनावाढीसाठी प्रयत्न होत नसल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, ठाकरेंनी पक्षाचा ढासळत चाललेला बुरूज आणि नेत्यांच्या उदासीनतेची दखल घेतलेली दिसते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या तुटपुंज्या यशाने हुरळून जात, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले. शिवाय, लोकसभेत मिळालेल्या विशिष्ट समाजाची साथ आपल्याला विधानसभेतही तारेल, अशी भाबडी आशाही त्यांना होती. मात्र, निकाल लागल्यानंतर त्यांचे हे स्वप्न भंग पावले.
पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या, त्यावेळी त्यांनी आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी ऐतिहासिक युती केली आणि केवळ ‘मुंबई एके मुंबई’ हे एकच ध्येय डोळ्यापुढे ठेवले. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याचे धोरण अवलंबले. त्यासाठी राज्यातील इतर मोठ्या महापालिकांकडे पुरेपूर डोळेझाक केली. मात्र, यावेळी पुन्हा त्यांना अतिआत्मविश्वास नडला. इतकी वर्षे भ्रष्टाचाराने बरबटलेली मुंबई महापालिका मुंबईकरांनी भाजपच्या हातात दिली. या काळात सलग दोनदा झालेल्या पराभवाची जखम झाकण्यासाठी ठाकरेंनी त्यावर मग ‘ईव्हीएम’चे मलम लावले. एवढे सगळे झाल्यानंतर, आता कुठे त्यांना आपल्या पराभवाचे खरे कारण उमगलेले म्हणायचे. आपण कुठे कमी पडतोय याची जाणीव झाल्याचे दिसते. मात्र, यावर आता त्यांचे पुढचे पाऊल काय असणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे. खरेतर, गेल्या काही वर्षांत ‘उबाठा’ गटाचे संपत चाललेले अस्तित्व आणि राजकीय महत्त्वाकांक्षेला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सक्रिय होणे गरजेचे आहे. आज त्यांनी हातपाय हालवले नाही, तर उद्या पक्ष कधी दिसेनासा होईल, याची शाश्वती नाही.
वाटा वाटा वाटा गं...
वाटा वाटा वाटा गं, चालीन तितक्या वाटा गं’ हे प्रसिद्ध मराठी गीत ‘उबाठा’ गटाच्या सध्याच्या अवस्थेचे अचूक वर्णन करणारे. याचे कारण म्हणजे, शिवसेनेच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर’ला ‘उबाठा’ गटाच्या खासदारांनी लावलेली हजेरी. एकीकडे, राज्यात सर्वत्र ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा असताना, उद्धव ठाकरे यांनी तातडीने ‘मातोश्री’वर आपल्या खासदारांची बैठक घेतली. यात त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे समजते. मात्र, याच वेळी पक्षातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला. ‘संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव का घेतले?’ असा सवाल करत प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. शिवाय, आदित्य ठाकरे यांनीही राऊतांवर आगपाखड केल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, हा वाद केवळ एका राज्यसभेच्या जागेपुरता मर्यादित आहे का? की, याभोवती भविष्यातील सत्ताकारण फिरतेय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
हा सगळा घटनाक्रम ताजा असताना, अलीकडेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ला चक्क ‘उबाठा’ गटाच्या दोन बड्या खासदारांनी हजेरी लावली. खरेतर, गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या निमित्ताने ‘उबाठा’ गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे. आता या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे संपर्काच्या चर्चा सत्यात उतरणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. वास्तविक, आपल्याच पक्षाच्या बाबतीत ‘ऑपरेशन टायगर’च्या बाता का? यावर उद्धव ठाकरे यांनी विचार करणे गरजेचे आहे. संजय राऊत दररोज शिंदेंच्या शिवसेनेवर वाट्टेल ते आरोप करतात. आता तर म्हणे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये विलीन होणार आहेत. परंतु, कोणत्या पक्षाचे नेते कुठे जाणार, यापेक्षा आपल्या पक्षाचे आमदार-खासदार आपल्यासोबत राहणार की नाही, याकडे राऊतांनी जास्त लक्ष देणे गरजेचे. शिवाय, अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना पक्षाच्या संघटन मजबुतीचा कानमंत्र दिला असताना, लगेच ‘डिनर डिप्लोमसी’च्या बातम्या पुढे येणे ‘उबाठा’ गटाला परवडणारे नाही. वारंवार होत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आपल्या आमदार-खासदारांवरही आत्मचिंतन करणे आवश्यकच!