‘परोपकारार्थमिदं शरीरम्’ या उक्तीला सार्थ ठरवत, दुर्गम वनवासी भागातील हजारोंच्या जीवनात परिवर्तनाचा प्रकाश पेरणारी श्रद्धा शृंगारपुरे यांची प्रेरणादायी गाथा...
परोपकाराय फलन्ति वृक्षा:
परोपकाराय वहन्ति नद्य:|
परोपकाराय दुहन्ति गाव:
परोपकारार्थमिदं शरीरम्॥
अर्थात, ज्याप्रमाणे वृक्ष परोपकारासाठी फळे देतात, नद्या दुसर्यांसाठी वाहतात आणि गायी दुसर्यांसाठी दूध देतात, त्याचप्रमाणे मानवी शरीरदेखील केवळ परोपकारासाठीच असावे, हा उदात्त विचार आजच्या धावपळीच्या युगात क्वचितच पाहायला मिळतो. शिक्षण आणि करिअरच्या नावाखाली गावे सोडून शहरांकडे धावणार्या तरुणांच्या गर्दीत, एक तरुणी मात्र याला अपवाद ठरली आहे. मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीचा झगमगाट, सुखसोयी आणि संधींचे आकाश समोर असताना, त्याकडे पाठ फिरवून पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात सेवेचा यज्ञ पेटवणारी ही ध्येयवेडी म्हणजे श्रद्धा शृंगारपुरे.
श्रद्धा शृंगारपुरे यांच्या रक्तातच देशसेवेचे बाळकडू होते. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. आजीकडून ऐकलेल्या क्रांतिगाथा आणि आईने अभ्यासासोबतच मनावर बिंबवलेले संस्कार यांनी श्रद्धा यांच्या मनात लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण केली. त्यांचे स्वप्न प्रशासकीय सेवेत जाण्याचे होते; पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळी आणि अधिक कठीण वाट निवडलीहोती. वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबाला हातभार लावत, काम करून त्यांनीआपले शिक्षण पूर्ण केले. याचसंघर्षाने त्यांना वयाआधीच प्रगल्भ बनवले.
रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी घेतल्यावर त्यांनी २००६ मध्ये ‘निर्मला निकेतन समाजकार्य’ महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच त्यांना उमजले की, समस्या सोडवायची असेल; तर तिच्या मुळाशी जावे लागते. समाजकार्याचे शिक्षण घेताना एका सहा वर्षांच्या चिमुकलीने ज्या आत्मविश्वासाने रेल्वेरुळांच्या कडेला असलेल्या आपल्या झोपडीचा पत्ता सांगितला, ते वास्तव पाहून श्रद्धा हादरून गेल्या. सुरक्षित वातावरणात वाढलेल्या श्रद्धा यांना जाणीव झाली की, आपण ज्या जगात राहतो, त्यापलीकडे एक अत्यंत कठोर वास्तव आहे.
जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, ‘तुमच्या मते विकास काय आहे?’ तेव्हा त्यांचे उत्तर होते, ‘स्वयंपूर्ण गाव!’ याच शोधातून वयाच्या २२व्या वर्षी त्या मोखाड्यासारख्या दुर्गम भागात पोहोचल्या. तिथे त्यांनी दारिद्य्र, स्थलांतर, पाणीटंचाई, बालविवाह आणि महिलांचे आरोग्य या समस्या अगदी जवळून पाहिल्या. प्रसूतीसाठी महिलांना खाटेवर टाकून नेले जाणारे विदारक दृश्य पाहून त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. या वास्तवाशी दोन हात करण्यासाठी श्रद्धा शृंगारपुरे आणि त्यांचे पती अॅड. राहुल तिवरेकर यांनी २०१७ मध्ये ‘दिगंत स्वराज्य फाऊंडेशन’ची स्थापना केली.
श्रद्धा यांचा विश्वास होता की, विकास हा लोकांच्या सहभागातूनच (Bottom-up Approach) शक्य आहे. त्यांनी स्थानिक युवकांना प्रशिक्षित केले आणि कामाला सुरुवात केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेतून ७५ सिमेंट नाले बांधले आणि ९९ सौरऊर्जाआधारित प्रकल्पांद्वारे १०० कोटी लीटर पाणीसाठा निर्माण केला. त्यामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली. ‘बोलकी शाळा’ या लाऊडस्पीकरवरील अभिनव प्रयोगामुळे ‘कोविड’ काळातही हजारो मुलांचे शिक्षण सुरू राहिले. या कार्यासाठी त्यांना ‘बेटर इंडिया कोविड अवॉर्ड’ने देखील सन्मानित करण्यात आले. सुमारे २०० मुलींनी बालविवाह नाकारले; तर दहा हजारांपेक्षा अधिक मुलींना जीवन कौशल्य शिक्षण देण्यात आले.
नऊ लाख झाडांची लागवड आणि आधुनिक शेतीमुळे हजारो कुटुंबांचे उत्पन्नही वाढले. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ पुरस्कार, ‘वुमन इम्पॅट’ अवॉर्ड, ‘लोकसेवा सन्मान’ अशाअनेक पुरस्कारांनी श्रद्धा यांना गौरविण्यात आले आहे. मात्र, श्रद्धा यांच्यासाठीखरा पुरस्कार म्हणजे आदिवासी बांधवांच्या डोळ्यांतील समाधान आणिसन्मानाने जगण्याची मिळणारी संधी हाच आहे. आज श्रद्धा शृंगारपुरे यांचे स्वप्न अगदी स्पष्ट आहे- प्रत्येक आदिवासी गाव स्वयंपूर्ण व्हावे, प्रत्येक कुटुंबाला विकासाची समान संधी मिळावी आणि कोणीही केवळ सोयींच्या अभावामुळे मागे राहू नये. मुंबईची चकाकी सोडून मातीच्या ओढीने निघालेला हा प्रवास परिवर्तनाची एक मशाल बनला आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे श्रद्धा शृंगारपुरे यांच्या या पवित्र आणि जिद्दी प्रवासाला लाख लाख शुभेच्छा!