मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नांदेड जिल्ह्यातील गोदा काठावरुन दुर्मीळ पांढऱ्या कंठेरी चिखल्या (Little ringed plover) पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (albino Little ringed plover). महाराष्ट्रात हिवाळी स्थलांतर करुन येणाऱ्या या पक्ष्याच्या अल्बिनो प्रकाराची नोंद यापूर्वी दोन वेळा झाली आहे (albino Little ringed plover). वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. (albino Little ringed plover)
कंठेरी चिखल्या हा पक्षी युरोप आणि आशियाच्या समशीतोष्ण प्रदेशातून हिवाळ्यात महाराष्ट्रात स्थलांतर करुन येतो. या पक्ष्याच्या अनेक उपप्रजाती आहेत. भारतात या पक्ष्याची एक उपप्रजाती (Charadrius dubius jerdoni) सापडत असून ती देशात कायमस्वरुपी वास्तव्यास असते आणि जी इथेच प्रजनन करते. मात्र, हिवाळ्यात उत्तर भागातून येणाऱ्या स्थलांतर करुन येणाऱ्या उपप्रजातीमुळे (C. d. curonicus) त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. डोळ्याभोवती स्पष्ट आणि ठळक पिवळ्या रंगाचे वर्तुळ, या पक्ष्याला इतर पक्ष्यांपासून वेगळे ओळखण्यास मदत करते. हवेत उडताना याच्या पंखांवर पांढरा पट्टा नसतो, ज्यामुळे हे पक्षी मोठ्या कंठेरी चिखल्यापेक्षा ( Common Ringed Plover) वेगळे असल्याचे दिसते. मात्र, आता या पक्ष्यामधील अल्बिनो प्रकाराची म्हणजेच शरिराने पूर्णत: पांढऱ्या रंगाच्या पक्ष्याची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बेलूर (बुद्रुक) या गावाजवळ वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी ही नोंद आॅक्टोबर, २०२५ मध्ये झाली आहे. याची नोंद करणारे वनरक्षक मनेशकुमार सज्जन व जीवशास्त्रज्ञ दर्शन दुधाने यांनी यासंबंधी लिहलेला शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे 'मेलेनिन' रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत: काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. 'ल्युकिस्टिक' प्रकारात शरीर काळे किंवा पांढरे असले तरी, वन्यजीवांचे डोेळे नियमित रंगाचे असतात. 'अल्बिनो' प्रकारात डोळे लाल दिसतात. गोदाकाठी नोंदवलेल्या कंठेरी चिखल्या पक्ष्याचे डोळे हे पूर्णत: लाल आहेत.