सध्या अनेक कलाकार आपल्या सादरीकरणात एखाद्या ‘म्युझिक’वर अनेक भ्रमरी, वेगवेगळ्या पद्धतीने पदसंचलन किंवा मग शरीराला झोक, म्हणजे हेलकावे देत सादरीकरण करताना दिसतात. हीच नाचण्याची ‘स्टाईल’ अनेकजण अवलंबतानाही दिसतात. पण नृत्यदिग्दर्शन किंवा ‘कोरिओग्राफी’ म्हणजे नेमकं काय, ते कसं असायला हवं, याविषयी आज ‘जागतिक नृत्य दिना’च्या निमित्ताने जाणून घेऊया...
हल्ली पालकांकडून किंवा नृत्य शिकू इच्छिणाऱ्या अनेक पाल्यांकडून, ‘प्युअर क्लासिकल’ म्हणजे की ‘शुद्ध शास्त्रीय नृत्य’ शिकण्याऐवजी, आम्हाला ‘सेमी क्लासिकल’ शिकायचे आहे; परीक्षा वगैरे द्यायच्या नाहीत किंवा द्याव्याच लागतात का, अशी विचारणा होते. पण, ताल-लयीत सादरीकरण करायचं, तर काही नियम आणि अटींच्या मदतीनेच म्हणजे की शास्त्रोक्त पद्धतीनेच पुढे जायला हवं. कारण, ‘रिल्स‘ बनवण्यासाठी असेल किंवा आवड म्हणून असेल किंवा आणि काही, पण एखादे सादरीकरण सुंदरतापूर्वक किंवा आखीव-रेखीव नसेल, तर ते तितके मनाला भावत नाही.
पूर्वीच्या काळी आपल्या हस्तकांना म्हणजे हस्तमुद्रा आणि हाताच्या हालचालींना कसं वळण द्यावं, हे सांगणारं कुणी नव्हतं, फक्त छान सादरीकरण करून आनंद मिळवणं, हे एकच उद्दिष्ट होतं.पण, पुढे याला शिस्तीची जोड मिळाली. आधी करून ठेवलेल्या कामाला फक्त काही अंशी बदलून ते सुंदर वाटायला लागलं. नृत्याचे ‘एकलनृत्य’ आणि ’समूहनृत्य’ असे दोन प्रकार असतात. इथेच नृत्यदिग्दर्शनाचा कस लागतो. एकलनृत्य सादरीकरण करताना, शुद्ध हस्त आणि ’लाऊड’ हातवारे केले जात आहेत ना, संपूर्ण रंगमंचाचा सादरीकरण करण्यासाठी वापर होतोय ना, नर्तकाने केलेली एक अन् एक हालचाल समोरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय ना, त्याचे रंगमंचावर वावरणे, उठणे-बसणे अशा सगळ्यांचाच विचार करावा लागतो.
तर समूहनृत्य प्रकारात त्यातल्या त्यात उत्तम सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीला पुढे ठेवणं, सर्वांच्या हालचाली एकसारख्या व्हाव्या, यासाठी योग्य पद्धतीने तालाच्या गतीचे गणित लक्षात घेऊन हालचाली बसवणं, एखाद्याच्या पदसंचलनातून ठरवून दिलेले बोल निघत नसतील किंवा सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीला ते झेपत नसेल, तर नेमक्या बोलांवर सुयोग्य पद्धतीने पदसंचलन ठरवून देणं, जेणेकरून ‘फूटमाईक’ समोर एकत्रितपणे सादरीकरण सुरू असताना त्यात सहजता जाणवते, समूहातील प्रत्येक व्यक्ती एकएकदा तरी प्रेक्षकांसमोर येतेय ना, सादरीकरणातून काही आकृत्या तयार करायच्या ठरवल्या, तर कलाकार नेमकी कोणती हालचाल करून त्यांच्या जागेवरून ठरवून दिलेल्या जागेवर वेळेत पोहोचेल? तसेच, कलाकारांच्या उंची आणि अंगयष्टीचा ही विचार करावा लागतो. एक ना अनेक गोष्टी बारकाईने लक्षात घ्याव्या लागतात.
नाटकाच्या सादरीकरणात ज्याप्रमाणे कलाकारांमध्ये योग्य बॉण्डिंग असायला लागतं (गीव्ह ॲण्ड टेक - देवाणघेवाण), समोरचा चुकलाच, तर त्याची चूक त्या दोन कलाकारांच्याच लक्षात येऊन वेळ मारून न्यावी लागते, त्याप्रमाणेच समूहनृत्य सादरीकरण करतानादेखील कलाकारांनी एकमेकांवर अवलंबून असलेल्या प्रकारात हजरजबाबीपणा किंवा प्रसंगावधान दाखवावं लागतं.
भ्रमरी मारतच झटकन बसणं किंवा समेवर एखाद्या ‘पोझ’मध्ये क्षणात न डगमगता थांबणं, ‘फूटवर्क’च करायचे असेल, तर शरीर गदागदा न हलवता स्थिर ठेवून करायचे; परंतु चेहऱ्यावर त्यातील प्रत्येक बोलाचा आधी स्वतः कलाकाराने आनंद घेऊन त्याप्रमाणे हावभाव देत सादरीकरण करायचं, जेणेकरून अगदी प्रथमच कार्यक्रम बघायला आलेल्या व्यक्तीच्या मनालादेखील ते आनंद देईल.
एखाद्या सादरीकरणात तिथल्या तिथे काहीतरी काहीतरी गुंडाळल्यासारख्या हालचाली न करता, ताल-लयीच्या बंधनात राहून सोडवून मांडल्या, तर त्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतात.कथक नृत्यात नृत्यनाटिका किंवा गतभाव अशा दोन प्रकारच्या मूक अभिनयाचे सादरीकरण केले जाते. यामध्ये केल्या जाणाऱ्या हालचाली किंवा हस्तमुद्रा सर्वसामान्य प्रेक्षकांना माहीत नसतात, अशा वेळी त्या हालचाली आपल्या दैनंदिन जीवनातील हावभावांचा वापर करून, त्यात काही शास्त्रीय हावभावांची भर घालून सादर केल्या जातात किंवा सादरीकरणावेळी त्याच्याबरोबर जर कोणी ती कथा सांगितली, तर ती प्रेक्षकांपर्यंत अधिक लवकर पोहोचते. म्हणूनच आपल्या कथकनृत्यात आधी नृत्याचे बोल पढंत करणं, म्हणजे की ताल-लयीत म्हणून दाखवणं आणि मग सादरीकरण करण्याची परंपरा आहे.
हे सगळं झालं टेक्निकल, पण याची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे, चेहऱ्यावर उमटणारे हावभाव. एखादी ऐतिहासिक प्रसंग सादर करताना, त्याचे अचूक वर्णन करण्यासाठी त्या पात्राचा अभ्यास करणे आवश्यक असते. समजा आपण राधा आणि कृष्ण किंवा यशोदा आणि कृष्ण यांच्यातील संवाद दाखवत आहोत, तर आपल्या समोरच्या व्यक्तीचे वय, उंची आणि नाते केवळ त्यांच्या नजरेच्या हालचालीवरून किंवा पाहण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट झाले पाहिजे.अशा सूक्ष्म तपशिलांमधूनच कथानकाचे विविध पैलू, जसे की अस्तित्वात नसलेल्या वस्तू, माणसे, पराकोटीचा आनंद, पराकोटीचे दुःख हे सारे उत्तम दिग्दर्शनाद्वारे सादर केले जातात. त्यामुळेच, नृत्याबरोबरच नृत्यदिग्दर्शनही अत्यंत महत्त्वाचे आहे.
मानसी अत्रे
(लेखिका इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड अचिवर, एम.ए. इन कथक आहेत)