Mumbai water shortage 2026 : मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळणार
१५ मे पासून १० टक्के कपात; धरणांतील जलसाठा २७ टक्क्यांवर
29-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai water shortage 2026) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने येत्या १५ मे पासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, पावसाचे वेळेवर आगमन न झाल्यास ही कपात वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.(Mumbai water shortage 2026)
राज्य सरकारकडे मदतीची धाव -
मुंबईची तहान भागवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि वैतरणा धरणांतील राखीव साठ्यातून २३७ दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात पालिकेने सरकारला अधिकृत पत्र पाठवले असून, हा राखीव साठा उपलब्ध झाल्यास मुंबईकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.(Mumbai water shortage 2026)
पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे प्रशासनाचे आवाहन -
पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवून वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. १५ मे पासून ही कपात लागू होणार असल्याने इमारतींमधील टाक्या भरताना किंवा दैनंदिन वापरावेळी मुंबईकरांना नियोजित कपातीचा सामना करावा लागणार आहे. असे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.(Mumbai water shortage 2026)
बॉक्स
कपात लागू: १५ मे २०२६ पासून.
कपातीचे प्रमाण: १० - टक्के.
वर्तमान साठा: २७ टक्के (सातही धरणांतील एकत्रित).
प्रमुख मागणी: राज्य सरकारकडून २३७ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची गरज.(Mumbai water shortage 2026)