Mata Khir Bhawani Temple USA : अमेरिकेत उभे राहणार माता खीर भवानी मंदिर

काश्मीरी हिंदूंच्या श्रद्धेला नवे अधिष्ठान

    29-Apr-2026   
Total Views |
kheer bhawani USA temple
 
मुंबई : (Mata Khir Bhawani Temple USA) काश्मीरी हिंदू समुदायाने परदेशी भूमीवर आपली सांस्कृतिक मुळे जिवंत ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये राहणारे काश्मीरी हिंदू समुदायातील लोक येथे माता खीर भवानीच्या दिव्य मंदिराचे निर्माण करत आहेत. लिव्हरमोर येथे माता खीर भवानीच्या भव्य मंदिराच्या उभारणीच्या योजनेने ठोस स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. ही केवळ मंदिर बांधणीची योजना नसून, विस्थापनाची वेदना सहन केलेल्या काश्मीरी हिंदूंच्या श्रद्धा, ओळख आणि अस्तित्वाच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक आहे.
 
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ६० कनाल (७.५ एकरांहून अधिक) जमीन खरेदी करण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजित किंमत २० कोटी रुपयांहून अधिक आहे. अलीकडेच संपूर्ण वैदिक विधी-विधानांनुसार भूमिपूजन पार पडले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी काश्मीरी हिंदूंनी सहभाग घेतला. मंदिर उभारणीत काश्मीरी हिंदू समुदायाची एकजूट स्पष्टपणे दिसून येत आहे.(Mata Khir Bhawani Temple USA)
 
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी एका दात्याने एकट्याने ९.२५ कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले आहे, जे या उपक्रमाविषयीच्या भावनिक नात्याचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. समुदायातील इतर सदस्यांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य केले असून, हा प्रकल्प आता सामूहिक संकल्पाचे रूप धारण करत आहे. हे मंदिर माता खीर भवानी मंदिराच्या स्वरूपावर आधारित असेल. हे पवित्र स्थान काश्मीरी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. माता खीर भवानीला समर्पित हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर काश्मीरी हिंदूंच्या सांस्कृतिक ओळखीचेही जिवंत प्रतीक आहे. दरवर्षी ज्येष्ठ अष्टमीच्या दिवशी येथे हजारो भाविक एकत्र येतात; आता याच परंपरेचा नाद अमेरिकेतही ऐकू येणार आहे.(Mata Khir Bhawani Temple USA)
 
हेही वाचा :   Chandrashekhar Bawankule sand policy changes : अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथके
 
केवळ मंदिर नव्हे, तर सांस्कृतिक केंद्रही
 
या प्रकल्पाचा उद्देश फक्त पूजा-अर्चनेपुरता मर्यादित नाही। प्रस्तावित मंदिर परिसराला सांस्कृतिक आणि सामुदायिक केंद्र म्हणूनही विकसित केले जाणार आहे. याठिकाणी काश्मीरी परंपरा, भाषा आणि सण-उत्सव जतन केले जातील, नव्या पिढीला आपल्या मुळांशी जोडण्याचे प्रयत्न केले जातील, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. १९९० च्या दशकात काश्मीरमधून झालेल्या विस्थापनानंतर जगभर विखुरलेल्या काश्मीरी हिंदूंसाठी हा उपक्रम भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक