Mankhurd Hindu Conference : शिवकालीन मर्दानी खेळांनी दुमदुमले महाराष्ट्र नगर; हिंदू संमेलनात राष्ट्रभक्तीचा जागर

    29-Apr-2026   
Total Views |
mankhurd-hindu-sammelan
 
मुंबई : (Mankhurd Hindu Conference) महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे रविवार हिंदू संमेलन उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भव्य स्वरूपात संपन्न झाले. सुमारे १२० ते १५० नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनाने परिसरात राष्ट्रभक्ती, संस्कार आणि हिंदू एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्रथमेश कला मंच यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजन आणि संगीत कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भक्तिमय व सकारात्मक ऊर्जेने भारावून गेले. उपस्थितांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
संमेलनाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला तो शिवकालीन मर्दानी खेळांचा थरारक आणि अंगावर शहारे आणणारा प्रयोग. छत्रपती मैदानी आखाडा मुंबई यांच्या वतीने संतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिकाने उपस्थितांना अक्षरशः स्तिमित केले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक युद्धकलेच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून शौर्य, धैर्य आणि चपळतेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला.(Mankhurd Hindu Conference)
 
विशेषतः आखाड्यातील लहान मुलींनी दिलेली शिवगर्जना संपूर्ण परिसरात घुमली आणि उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रखर भावना चेतवून गेली. या सादरीकरणाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण जागवली आणि तरुण पिढीसमोर शौर्याचा जिवंत आदर्श उभा केला. यासोबतच विविध संस्कार शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि नेहमी खरे बोलावे या विषयांवर प्रभावी नाट्यप्रस्तुती सादर करत सामाजिक जाणीव जागृत केली. लहान विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांकडून विशेष दाद मिळवली.(Mankhurd Hindu Conference)
 
हेही वाचा :  Chandrashekhar Bawankule sand policy changes : अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथके
 
संमेलनास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चेंबूर भाग संघचालक रमेश ओवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांनी लव्ह जिहाद या विषयावर परखड मार्गदर्शन केले, तर शिवशंभु विचार मंचाचे संयोजक पंकज विद्याधर भोसले यांनी पंच परिवर्तन आणि हिंदुत्व या विषयांवर प्रभावी विचार मांडत उपस्थितांना प्रेरित केले.(Mankhurd Hindu Conference)
 
कार्यक्रमादरम्यान समाजातील कष्टकरी घटकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नगर येथील महिला भाजी विक्रेत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक कृतज्ञतेची भावना अधोरेखित झाली आणि समाजातील श्रमपूजेला मानाचा मुजरा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धनावडे यांनी प्रभावीपणे केले. पाहुण्यांचे स्वागत संतोष सपकाळ आणि ज्योती हरगुडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राजेश काळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(Mankhurd Hindu Conference)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक