KEM Hospital Mumbai : उपमहापौर संजय घाडी यांनी घेतली के.ई.एम रुग्णालयाची भेट

- परिचारिका मारहाण प्रकरणातील दोषींना अटक करण्यासाठी तातडीने प्रयत्न

    29-Apr-2026
Total Views |
KEM Hospital
 
मुंबई: (KEM Hospital Mumbai) परळ येथील के.ई.एम रुग्णालयात परिचारिकेवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उपमहापौर संजय घाडी यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या प्रकरणी महापौर व आरोग्य समीती अध्यक्षांशी चर्चा करून डॉक्टर नर्स कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. (KEM Hospital Mumbai)
 
रुग्णालयातील तेजस्विनी पाटील या परिचारिकेवर चार जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली असून तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता, डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ, गणेश आडीवरेकर तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते. हल्ल्यातील तिघांची ओळख पटली असून एक संशयित अद्याप फरार आहे. संबंधित सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घाडी यांनी केली आहे. (KEM Hospital Mumbai)
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दाही पुढे आला आहे. मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. ही पदे तातडीने भरावीत, तसेच प्रत्येक रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करणारे जनसंपर्क अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. (KEM Hospital Mumbai)
 
हेही वाचा : विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर! कुणाच्या नावाची घोषणा? – वाचा सविस्तर
 
याशिवाय, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची लवकरच भेट घेऊन या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून शहरातील विविध रुग्णालयांना भेट देण्याचा कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि एकूणच रुग्णालय व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. (KEM Hospital Mumbai)