भारतातील तरुण लोकसंख्येचे रूपेरी आव्हान...

    29-Apr-2026
Total Views |
India Aging Healthcare Challenge
 
आजचे तरुण हे उद्याचे प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक. त्यामुळे आजघडीला भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश असला, तरी भविष्यात एवढीच संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची असेल. तेव्हा, देशाच्या लोकसंख्येचा विचार करताना, भविष्यातील आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचीही दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यादृष्टीने देशातील आरोग्य व्यवस्थेत नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवाव्या लागतील, यासंबंधीचा ऊहापोह करणारा हा लेख...
 
भारत आज जगातील सर्वांत मोठ्या तरुण लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरुण लोकसंख्या देशाची सर्वांत मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे. आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक स्वरूपाचे आहे.
 
एकूण पाहता, आजमितीस भारतात १६ कोटी ज्येष्ठ नागरिक आहे आणि हीच संख्या २०३५ पर्यंत २४ कोटींवर पोहोचणार आहेत. ही वाढ केवळ लोकसंख्येतील बदल नसून, आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेची देखील खरी परीक्षा आहे.
 
जर सध्याच्या पायाभूत सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, विमा व्यवस्था आणि जनजागृती यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली नाही, तर २०३५ पर्यंत भारताला ‌’healthcare stress'चा गंभीर सामना करावा लागू शकतो. पण, याच परिस्थितीत एक संधीही दडलेली आहे. योग्य नियोजन केल्यास भारत ‌‘सिल्व्हर इकोनॉमी‌’ मध्ये जागतिक नेतृत्व करू शकतो. २०३५ पर्यंत ही भारतासाठी केवळ लोकसंख्येतील बदलांची वर्षे नसून, आरोग्य व्यवस्थेच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा ठरणार आहे. याचा अर्थ असा की, आजच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक लोकांना दीर्घकालीन डॉक्टर्स, रुग्णालये, आरोग्य सेवा, औषधे आणि विमा इ. संसाधनांची गरज भासणार आहे. आधीच डॉक्टरांची कमतरता, हॉस्पिटल बेड्सची अपुरी संख्या आणि ग्रामीण-शहरी दरी या समस्या अस्तित्वात असताना, या वाढत्या मागणीचा सामना करणे, ही मोठी कसोटी ठरणार आहे. तथापि, भारताचे चित्र केवळ आव्हानांचे नाही. उलटपक्षी, या बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारताकडे काही अद्वितीय ताकदीही आहेत.
 
भारत हा जगातील सर्वांत मोठ्या जेनेरिक औषध उत्पादक देशांपैकी एक आहे, ज्यामुळे औषधांची किंमत तुलनेने कमी राहते. तसेच, इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा स्वस्त आहेत. यामुळे ‌‘मेडिकल टुरिझम‌’साठी भारत एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. कुशल डॉक्टर, वाढते खासगी रुग्णालयांचे जाळे आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सर्व गोष्टी भारताला जागतिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका देऊ शकतात.
 
मात्र, या ताकदीचा योग्य उपयोग करण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम, सरकारने आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढवणे गरजेचे आहे. सध्या भारताचा सार्वजनिक आरोग्य खर्च ‌‘जीडीपी‌’च्या सुमारे दोन टक्क्यांच्या आसपास आहे, जो विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही गुंतवणूक वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका आणि इतर साहाय्यक वैयक्तिक सेवा तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता सुधारणा हीदेखील महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विम्याच्या क्षेत्रात, सर्व ज्येष्ठ नागरिकांना विमा कवच देण्याची गरज आहे. आजही मोठा वर्ग विम्याच्या कक्षेबाहेर आहे आणि वृद्धावस्थेत विमा मिळवणे अधिक कठीण होत आहे. त्यामुळे तरुण वयातच विमा सुलभ आणि परवडणारा बनवणे, तसेच सार्वजनिक आणि खासगी विमा योजनांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे.
 
परंतु, या सर्व उपाययोजनांसोबत एक अत्यंत महत्त्वाचा घटक दुर्लक्षित करता येत नाही, तो म्हणजे जनजागृती. भारतात अजूनही आरोग्य विमा, ‌’Preventive healthcare' आणि नियमित तपासणी याबाबत पुरेशी जागरूकता नाही. विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये आरोग्य सुरक्षेबाबतची जाणीव कमी आहे. या पार्श्वभूमीवर सरकार, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्र यांनी एकत्रितपणे व्यापक जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. जसे बँकिंग क्षेत्रात ‌‘जनधन योजना‌’मुळे आर्थिक समावेशन वाढले, तसेच आरोग्य क्षेत्रातही ‌‘health inclusion' घडवून आणणे गरजेचे आहे.
 
असंघटित क्षेत्रातील कामगार, जसे की शेतमजूर, बांधकाम कामगार, छोटे व्यावसायिक हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहेत. त्यांच्यासाठी कमी प्रीमियमच्या ‌‘मायक्रो-इन्शुरन्स‌’ योजना, सहकारी संस्थांद्वारे सामूहिक विमा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सहज नोंदणी या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. उदाहरणार्थ, दररोज अगदी अल्प रक्कम (जसे १०-२० रुपये) बचत करून मोठ्या प्रमाणावर आरोग्य विमा कव्हरेज निर्माण करता येऊ शकते, जर योग्य रचना आणि विश्वासार्ह अंमलबजावणी असेल तरच. याला ‌‘हेल्थ क्रेडीट स्कीम‌’ असे म्हणतात. यासंदर्भात ‌‘नारायण हृदयालया‌’चे संस्थापक यांचे कार्य आणि त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रेरणादायी ठरतो. या रुग्णालय साखळीने ‌‘कमी खर्चात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा‌’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांनी पाच ते दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा अत्यंत कमी पैशांत उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून कुटुंबाची आरोग्य जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. तसेच त्यांच्या रुग्णालयात हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया ७५ हजार रुपयांत होतात.
 
भारतात आरोग्य सेवा महाग असण्याचे कारण तंत्रज्ञान नाही, तर व्यवस्थापन आणि स्केलचा अभाव आहे. ‌‘economies of scale‌’चा वापर करून हृदय शस्त्रक्रिया अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची कल्पना म्हणजे ‌’mass health insurance.' जर मोठ्या लोकसंख्येने अल्प प्रीमियम भरून विमा घेतला, तर संपूर्ण देशासाठी अत्याधुनिक आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ शकतात.
 
मोठ्या हॉस्पिटल चेनसमोरही काही स्पष्ट जबाबदाऱ्या उभ्या राहतात. केवळ महानगरांमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारण्यापेक्षा, ‌’टियर-2‌’ आणि ‌’टियर-3‌’ शहरांमध्ये विस्तार करणे ही काळाची गरज आहे. 'value-based healthcare' या संकल्पनेनुसार, कमी खर्चात दर्जेदार सेवा देणे, हे ध्येय असले पाहिजे. याशिवाय, वृद्धांसाठी विशेष 'geriatrics care', घरपोच आरोग्य सेवा आणि दीर्घकालीन उपचारांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणे आवश्यक ठरणार आहे.
 
या सर्व आव्हानांमध्येच भारतासाठी एक मोठी आर्थिक संधीही दडलेली आहे. वाढती ज्येष्ठांची लोकसंख्या, वाढणारी आरोग्य जाणीव आणि विम्याचा विस्तार यांमुळे आरोग्य क्षेत्र हे पुढील दशकात सर्वांत वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरणार आहे. हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, औषधनिर्मिती, वैद्यकीय उपकरणे, होम हेल्थकेअर आणि वृद्ध सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होणार आहेत.
 
आजच्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, फार्मसी, हेल्थटेक, बायोटेक्नोलॉजी आणि हेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये करिअरच्या असंख्य वाटा खुल्या होत आहेत. तसेच, स्टार्टअप्सच्या माध्यमातून डिजिटल हेल्थ, ‌’remote diagnostics' आणि ‌’elderly care' यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची मोठी संधी आहे. लवकरच रुग्णांना ‌‘आयसीयू‌’मध्ये न ठेवता, घरच्या घरी, ‌’remote control medical surveillance monitoring' ही सुविधा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार देण्यास सक्षम होणार आहे. भारताच्या किफायतशीर आरोग्य सेवांचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी तरुण उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
 
शेवटी, भारताचे वैद्यकीय भविष्य अशा वळणावर उभे आहे की, हे आव्हान संधी म्हणून स्वीकारले, तर भारत जागतिक आरोग्य क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवू शकतो. आजच योग्य निर्णय घेतले, तर उद्याचा भारतीय ज्येष्ठ नागरिक सुरक्षिततेत, सन्मानाने आणि निरोगी आयुष्य जगेल. या निर्णयांमध्ये सरकार, उद्योगक्षेत्र आणि समाज जितके महत्त्वाचे आहेत, तितकाच महत्त्वाचा आहे, जागरूक, जबाबदार आणि दूरदृष्टी असलेला आजचा तरुण वर्ग...
 
दिपक दोडके
7028018835