मुंबई : (Bengal Election Violence) पश्चिम बंगालमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी मतदान झाले. याचदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हिंसा आणि इव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याच्या घटना समोर आल्या. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर शहरातील फल्टा विधानसभा मतदारसंघातून एक व्हिडिओ समार आलाय; जिथे बूथ क्रमांक १४४ वरील इव्हिएम मध्ये भाजपाच्या बटणावर टेप चिकटवण्यात आल्याचे दिसून आले. याच विधानसभा क्षेत्रातून जहाँगीर खान हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत.
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमीत मालवीय यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत म्हटले, “ममता बॅनर्जी नेमकं याच गोष्टीचं समर्थन करत होत्या, जेव्हा त्यांनी डायमंड हार्बरच्या फल्टा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या गुन्हेगार जहाँगीर खानच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता. अमित मालवीय यांनी असा दावा केला की, अशा अनेक बूथवर भाजपच्या बटणावर टेप लावण्यात आली होत्या. त्यांनी या प्रकाराला तथाकथित “डायमंड हार्बर मॉडेल” असे संबोधत म्हटले. हे तेच मॉडेल आहे ज्यामुळे ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना लोकसभा जागा मिळवण्यात मदत झाली होती.(Bengal Election Violence)
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार यांनी संबंधित बूथवर फेरमतदान घेण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, बंगाल निवडणुकीत मतदान सुरू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कडक सूचना दिल्या होत्या की, कोणत्याही मतदान केंद्रात ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचे आढळल्यास तातडीने कारवाई केली जाईल. या सूचनांमध्ये विशेषतः ईव्हीएमवर टेप, गोंद किंवा परफ्यूम लावण्याचाही उल्लेख करण्यात आला होता.(Bengal Election Violence)
मतदानादरम्यान भवानीपूर या हॉट सीटवर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी घेरले, त्यानंतर तेथे हिंसक झटापट सुरू झाली. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना लाठीमार करावा लागला. या तणावपूर्ण परिस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, हे खरे मतदार नसून ‘बांगलादेशी मुस्लिम’ आहेत, ज्यांना निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी आणले गेले आहे. त्यांनी तातडीने घटनास्थळी अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दल (सीआरपीएफ) तैनात करण्याची मागणी केली. सुवेंदू अधिकारी यांनी आरोप केला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बनावट मतदारांच्या जोरावर सत्तेत टिकून राहू इच्छितायत.(Bengal Election Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक