लंडनमधील ‘हाईड पार्क’च्या धर्तीवर एक मुक्त संवादाचे व्यासपीठ असावे, अशा संकल्पनेतून चंद्रसेन टिळेकर यांनी मुंबईत कट्टा सुरू केला. तेव्हा त्याला निभड पत्रकार, लेखक, साहित्यिक व महाराष्ट्राच्या स्थापनेचे शिल्पकार आचार्य अत्रे यांचे नाव देण्यात आले. असे व्यासपीठ, जिथे कोणाला काही सांगायचे असेल, ते त्याने धाडसाने सांगावे आणि समोरच्यांनी ऐकावे, चर्चा करावी, अशी प्रथा पडली. मुंबईत बऱ्याच ठिकाणी असे कट्टे सुरू झाले; त्यातील अनेक कट्टे बंद पडले. मात्र, कांदिवलीचा ‘आचार्य अत्रे कट्टा’ अजूनही ऐन भरात आहे.
आनंदासाठी एकत्र येत गेली १६ वर्षे सुरू असलेला आचार्य अत्रे कट्टा! मराठी माणसांना एकत्र आणून काही सामाजिक, सांस्कृतिक, चळवळीचे व्यासपीठ सामान्यजनांना उपलब्ध असावे, या उद्देशाने १६ वर्षांपूर्वी अनिला फडणवीस, अनुजा पाटील, नितीन जाधव आणि बहुतुले यांनी अत्रे कट्ट्याची स्थापना केली. पुढे त्यांना सेवानिवृत्त चीफ जनरल मॅनेजर (आर. बी. आय.) रिझर्व्ह बँक हरिश्चंद्र राणे यांची साथ मिळाली. त्यांचा अफाट जनसंपर्क आणि सर्वांना जोडून ठेवायची कला यामुळे कट्टा बहरत गेला. मार्च २०१० साली लावलेलं हे कट्ट्याचं रोपटं आता अगदी विस्तृत रूपात कार्यरत आहे. अनेक कार्यकर्ते, अनेक मदतीचे हात जोडले गेले. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, सारेजण आपुलकी, आपलेपणा आणि कट्ट्याच्या भावबंधाने एकत्र येतात.
वैयक्तिक अडचणीच्या प्रसंगीही ही मंडळी परस्परांच्या मदतीला धावून जातात. विशेष म्हणजे, जिथे हा कट्टा भरतो, ते महानगरपालिकेचे रम्य उद्यान आहे. मोठमोठ्या झाडांच्या कुशीत आल्हाददायक परिसरात, मध्ये मोठ्या वाटोळ्या आकाराचे छत असलेला गोलाकार, परिसर मोहक आहे. सगळे ऋतू अंगावर झेलत इथे आनंद घेता येतो. ही सारी कट्टेकरी मंडळी रोज सकाळीही जमतात.‘ग्रीन-टी’चा आस्वाद घेतात. बहुतांशजण सेवानिवृत्त झालेले, अनुभवी. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या वेगळेपणाचा सन्मान आहे. यामध्ये ऋजू, प्रेमळ स्वभावाचे राणेकाका सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शकही. त्यांची दूरदृष्टी, आखणी, नियोजन, औदार्य सर्वांसाठी आदर्शवत असते. त्यांना पूर्णपणे साथ अशोक परब, योगिनी व भागवत जोशी, शरद पोखरकर, सुनील सावंत यांची आहे. साहित्यिक कार्यक्रम, काव्यवाचन, संगीत, कथाकथन, पुस्तक परिचय, परीक्षण, गझल, एकपात्री, आहार, विज्ञान, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, आध्यात्मिक, कीर्तन, प्रवचन, प्रवासवर्णन, कायदेविषयक ज्ञान, योग व्याख्याने, मुलाखती असे बहुरंगी, बहुढंगी, विविधतेने नटलेले कार्यक्रम यांचा आस्वाद रसिकतेने घेतला जातो. कार्यक्रम झाल्यावर त्यावर पूर्ण विस्तृतपणे आढावा लिहिला जातो. त्यामुळे लेखनातही बरेचजण तरबेज झालेले आहेत. त्याशिवाय, संमतीने युट्यूबवर कार्यक्रम प्रसारित केला जातो.
त्यामुळे काही कारणांनी अनुपस्थित राहिलेला रसिक त्याचा आस्वाद घेऊ शकतो. एखादा कलावंत भावला, त्याची कला आवडली, तर आरती दळवी नावाच्या शीघ्र कवयित्री कविता करून आढावा घेतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या अशा कवितांचे ‘काव्यारती’ हे पुस्तक अत्रे कट्ट्याने प्रकाशित केले. संस्थेच्या कार्यात आर्थिक व्यवहार हाही सार्वत्रिक कार्यक्रमात कळीचा मुद्दा असतो. मात्र ‘फूड कॉर्पोरेशन’मधून सेवानिवृत्त झालेले, अनिल अवर्सेकर आणि महानगरपालिकेतून निवृत्त अनंत चव्हाण सारे हिशोब चोख पाहतात. त्यामुळेच पारदर्शकता हेही एक वैशिष्ट्य आहे. आजवर अनेक मान्यवर, प्रतिष्ठित कलावंत आपली कला सादर करून गेले आहेत. ज्यात मधुमंगेश कर्णिक, शुभेच्छांचे सौदागर कवी प्रसाद कुलकर्णी, पत्रकार लेखक, वक्ते अंबरीश मिश्र, व्हॉईस गुरू दीपक वेलणकर, अर्थतज्ज्ञ, कलावंत चंद्रशेखर ठाकूर असे अनेकजण हजेरी लावून गेले आहेत. कट्ट्याच्या कलावंतांनीही इथे अनेक उत्तम सादरीकरणे केली आहेत. मंगळागौर, भोंडला यांचे खेळ, वारी पंढरीची, कवयित्री बहिणाबाई यांच्या साहित्यावर नाट्य, गीत, कविता अशा स्वरूपात स्वतःतील कलेला वृद्धिंगत केले आहे. अनेक कलावंतांच्या मुलाखती इथे रंगल्या आहेत. ज्यात ४० अनाथ मुलांचे पालकत्व मोठ्या कष्टाने सांभाळणारे ‘साई आधार’चे विशाल परुळेकर, संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर, दोन कार्यरत वैमानिक मंगेश राणे आणि राजाराम नाईक, महानगरपालिकेच्या संगीत विभागाच्या माजी प्राचार्या, गायिका, नृत्यांगनाकागल-घैसास, विमानाचे जाणकार राजन कुलकण, अभिनेत्री आशा शेलार, राणी वर्मा अशा अनेकांचा समावेश आहे. यातली प्रत्येक मुलाखत रंगली.
सामाजिक कार्यातही कट्ट्याचा सहभाग मोलाचा असतो. उपरोल्लेखित ‘साई आधार’ संस्थेला भरभरून आर्थिक पाठबळ तर दिलेच, परंतु मुलांना आंब्याच्या पेट्या, पावसाळी वस्तू, शैक्षणिक साहित्य, धान्य-कडधान्ये असेही सहकार्य वारंवार केले जाते. रसिक श्रोते कधीच आपला हात आखडता घेत नाहीत. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ‘नाम फाऊंडेशन’ला मदत, स्थानिक गरजूंसाठी आर्थिक पाठिंबा असे अनेक उपक्रम पूर्ण केले. ‘कोरोना’ काळात राजाभाऊ फडणवीस यांच्या आवाहनानुसार सर्व सभासद मंडळींनी हातात लेखणी उचलली. ज्यातून २०२४ साली ‘अविरत आनंदयात्रा’ पुस्तकाची निर्मिती झाली. असाच एक उपक्रम राणेकाकांच्या संकल्पनेतून साकार झाला. कट्टेकरी बहुतांश मंडळी ही मूळची कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली.
राणेकाका देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे. तसेच आणखीही काहींची जवळपासची गावं, शाळा. हिंदळे, मुणगे, पडवे, कोर्ले-धालवली, मिठबाव. इतर काही कट्टेकरी यांच्या शाळा. अशा पाच शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मी मुलांसाठी व्याख्याने दिली.
असा सिंधुदुर्ग दौऱ्याचे विशेष म्हणजे, कट्ट्याचे १५ सदस्य उपस्थित होते. यातील सहा सदस्य विमानाने पोहोचले. राणेकाकांचे चिरंजीव मंगेश राणे हे वैमानिक असल्याने त्यांनी कट्टेकरी मंडळींचे विमान चालवले, हा आनंदाचा योग होता. राणेकाकांनी त्यांच्या हिंदळे या गावी सर्वांची सोय केली होती. हा दौरा यशस्वी करण्यात काकांच्या अर्धांगिनी मीनाताई राणे यांचा सिंहाचा वाटा होता. या भेटीदरम्यान ‘बालश्री पुरस्कारावर’ मोहोर उमटवणाऱ्या प्रसाद घाडी यांच्या मातोश्रींची भेट झाली. यावेळी राणेकाकांनी तरुणांच्या भजनी मंडळाचे कीर्तनकाराचे कीर्तन आयोजित केले होते.
नुकताच कट्ट्याचा १६ वा वर्धापनदिन साजरा झाला. शांताबाई शेळके यांच्या जीवन व साहित्यावर आधारित संगीतमय मैफील! दत्ता मदन, गायत्री सिधये, निखील नेवाळकर आणि अदिती प्रभुदेसाई यांनी सादर केलेल्या गीतांना प्रसाद पंडित, रितेश बेणे, राजू घरत आणि मिलिंद परांजपे या वादकांनी अप्रतिम साथ केली. परेश यांनी उत्तम प्रकारे ध्वनिव्यवस्था केली. तीन तास रंगलेल्या या मैफिलीच्या सुरांनी श्रोते श्रवणानंदात न्हाऊन निघाले. नि वर्धापनदिन आगळ्या उंचीला पोहोचला. कार्यक्रम वेळेवर सुरू झाल्याने वेळेत संपला. कट्ट्यावरची पहिलीच मैफील आनंदाचे मोरपीस सर्वांच्या मनात खोवून गेली. सद्गुरू वामनराव पै असं म्हणायचे, “तुम्ही दुसऱ्याला आनंद दिलात की शतपटीने तो आनंद तुमच्याकडे बुमरैग होऊन परत येतो.” याचा प्रत्यय आचार्य अत्रे कट्ट्यावर सातत्याने येत राहतो.
शोभा नाखरे
9869787398