आरतीसम्राज्ञी...

    29-Apr-2026
Total Views |
 
Smita Apte
 
आपल्या सर्जनशील लेखणीतून आरत्या रचणाऱ्या, नाशिकच्या पहिल्या महिला पुरोहित स्मिता विलास आपटे यांचा जीवनप्रवास...
 
विविधता आणि सर्वसमावेशकता ही भारतीय ज्ञानपरंपरेची महत्त्वाची वैशिष्ट्ये. पश्चिमेकडील राष्ट्रं ज्यावेळी आपला सभोवताल चाचपडत होती, त्या काळात भारतामध्ये व्यक्तीच्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी येथील ज्ञानवंतांनी पिढ्या खर्च केल्या. मात्र, परकीय आक्रमकांच्या सत्तेमुळे ही उज्ज्वल परंपरा झाकोळली गेली. इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणि तद्नंतर दिशाभूल झालेल्या काही भारतीयांमुळे आपल्याच ज्ञानाचे संचित समाजापासून दूर गेले. कालौघात खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्माचा जागर या मातीतील नेतृत्वाने केला आणि चित्र पालटले. भारतीय ज्ञानपरंपरेची साधना करणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. लौकिकाची, स्तुतिसुमनांची अपेक्षा न बाळगता, अव्याहतपणे कार्यरत राहणाऱ्या लोकांमुळे धर्मविचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला. धर्मकार्य आणि राष्ट्रकार्याचा विचार समाजात रुजवणारं महाराष्ट्रभूमीतलं असंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे स्मिता आपटे.
 
नाशिकच्या पहिल्या महिला पुरोहित म्हणून स्मिता आपटे यांचा नावलौकिक. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे सातत्य, निष्ठा आणि कर्तव्य यांचा एक उत्तम वस्तुपाठ. स्मिता यांचे बालपण डोंबिवलीत गेले. पहिली ते चौथीपर्यंत घुले बाईंच्या शाळेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. दरवर्ीष सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत, त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न केले. मॅट्रिकपर्यंत स. वा. जोशी विद्यालय येथे त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. गीतापाठांतराच्या स्पर्धेत भाग घेणे, ‘काव्य रसिक मंडळा‌’समोर कविता सादर करणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी स्वतःला घडवले. लहानपणापासून ‌‘राष्ट्र सेविका समिति‌’मध्ये सेविका म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी दोन वर्षे वर्ग केले होते. त्याचबरोबर ‌‘सांघिक गीत प्रमुख‌’ म्हणूनही त्यांच्याकडे दायित्व होते. वयाच्या अवघ्या २०व्या वष डोंबिवली येथील ‌‘घोष प्रमुख‌’ म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विलास आपटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला व गणेश मंदिराजवळील आपटे घराण्यातील मोठी सून म्हणून आपटे वाड्यात त्यांनी प्रवेश केला. संघकार्याशी त्यांचा परिचय होताच. आईची शिकवण व घरातील सगळ्यांच्या प्रेमामुळे जबाबदाऱ्या अगदी सहज पार पडल्या. लग्नानंतर सुरुवातीची दहा वर्षे त्यांचे वास्तव्य डोंबिवलीतच होते. मात्र, काळाच्या ओघात त्यांच्या मुलाची (योगेश) मुंज झाल्यानंतर, नोकरीतील बदलीनिमित्ताने नाशिक येथे जाण्याचा निर्णय झाला. राहतं घर सोडून, नव्या नगरीमध्ये प्रवेश करताना मनात काहीशी धाकधूक होतीच. मात्र, प्रचंड मेहनत करून त्यांनी त्यांच्या संसाराचा नव्या जोमाने श्रीगणेशा केला. एक मुलगा आणि मुलगी अशा दोन्ही अपत्ये संस्कारांच्या छायेत लहानाची मोठी झाली.
 
अशातच, ‘राष्ट्र सेविका समिति‌’च्या ‌‘राणी भवन‌’ संस्थेमध्ये आदरणीय स. कृ. देवधर यांचे व्याख्यान होते. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही पौरोहित्याचा अधिकार वेदांनी बहाल केला आहे. वेद स्त्री-पुरुष हा भेद मानीत नाहीत. माणसाचे नऊ द्वारांचे शरीर हे भगवंताचे निवासस्थान आहे. ‘पुरे शयती इति पुरुषः‌’ अशी व्याख्या त्यांनी सांगितली. स्त्रियांनाही पुरुषांइतकाच मंत्रपठणाचा अधिकार आहे. देवधरांचे हे वक्तव्य स्मिता यांच्या मनाला भावले आणि त्यांनी पौरोहित्याचा अभ्यास सुरू केला.
 
१९९० साली ‌‘राणी भवन‌’ येथे वीणा मोडक यांनी महिला पौरोहित्य वर्गाची जबाबदारी घेतली व पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू झाला. हळूहळू १२० जणींनी प्रवेश घेतला व दर शनिवारी एक तास अभ्यास सुरू झाला. पहिल्या वर्षी वार्षिक तोंडी व लेखी परीक्षा स्मिता पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. दुसऱ्या वषपासून वीणाताईंनी वर्ग शिकवण्याची जबाबदारी स्मिता यांच्यावरच दिली. पहिली आठ वर्षे स्मिता ‌‘राणी भवन‌’ येथे पौरोहित्याचे वर्ग घेत होत्या. पुढे नाशिकमध्ये विविध ठिकाणी आठवड्याचे सर्व दिवस प्रत्येकी एक तास त्या वर्ग घेत असे. कलशपूजन, वास्तुशांती, उपनयन, गणेशपूजन अशा माध्यमांतून त्यांनी पौरोहित्य केले.
 
‌‘गंगालहरी‌’, ‌‘विष्णू सहस्रनाम‌’, ‌‘हरिपाठ‌’ अशा विविध विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. किंबहुना, आजही त्यांच्या व्याख्यानासाठी श्रोतृवर्ग उत्सुक असतो. दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी यांच्या अध्ययनातून आपल्या विचारांचे संचित त्या लोकांपर्यंत नित्यनेमाने पोहोचवत असतात. सततच्या मंत्रपठणातून अनेक स्वरचित आरत्यांचीसुद्धा त्यांनी रचना केली. त्यांच्या या अलौकिक कार्याचा गौरव करताना, डोंबिवलीच्या ‌‘चित्पावन ब्राह्मण संघा‌’ने त्यांना ‌‘आरतीसम्राज्ञी‌’ अशी उपाधीच बहाल केली आहे. त्याचबरोबर ‌‘आर्या रचनाकार‌’ म्हणून त्या दिग्गज कवी मोरोपंतांचा वारसा चालवीत आहेत, असे मतदेखील व्यक्त करण्यात आले.
‘कोविड‌’ महामारीच्या काळात, ज्यावेळी प्रत्येकजण आपापल्या घरात स्थानबद्ध होते, अशा वेळी लोकांशी संवाद साधण्यासाठी, धर्मविचारांचा पुरस्कार करण्यासाठी ‌‘स्मितचिंतनबोध‌’ नावाचे युट्यूब चॅनेल त्यांनी सुरू केले. विविध संतांचे चरित्र, त्यांच्या कार्याचे महत्त्व, सणांच्या, पौराणिक कथांमागचा विचार या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी त्यांच्या चॅनेलला भेट दिली आहे. स्मिता यांच्या मते, “आपला धर्म, त्यातील परंपरांचे महत्त्व याचे जर आपल्यापाशी ज्ञान असेल, तरच आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो. हिंदू म्हणून आपल्या समाजापुढे जी आव्हानं आहेत, त्यांना तोंड देण्यासाठी शिक्षणामध्ये परिवर्तन आणले पाहिजे. त्याचबरोबर मुला-मुलींना योग्यरित्या घडवण्याची, त्यांच्यावर सुयोग्य संस्कार करण्याची जबाबदारी, आई-वडील व शिक्षक या घटकांवर अधिक आहे,” असे त्या म्हणतात. धर्मविचाराच्या माध्यमातून राष्ट्रविकास करणाऱ्या स्मिता आपटे यांना दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या शुभेच्छा!
 
9967826983