Devendra Fadnavis's Statement on Corruption : ...तर चुकीला माफी नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

    29-Apr-2026   
Total Views |
Devendra Fadanvis speak on corruption
 
सोलापूर : ( Devendra Fadnavis's Statement on Corruption) कुठल्याही परिस्थितीत पारदर्शी, प्रामाणिकतेने काम झाले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. एखादे पद हातातून गेले तरी हरकत नाही. लोकांनी पारदर्शी, प्रामाणिकतेने काम करण्यासाठी आपल्याला निवडून दिले आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे. पण चुकलात तर, चुकीला माफी नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.( Devendra Fadnavis's Statement on Corruption)
 
सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.( Devendra Fadnavis's Statement on Corruption)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही सोलापूरकरांच्या कर्जात असून विकासाच्या माध्यमातून ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करू. ५ वर्षात प्रामाणिक प्रयत्नांतून इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. २०१७ ला सोलापूरमध्ये ४९ नगरसेवक निवडून आले होते. २०२६ मध्ये १०२ जागा लढवून आपले ८७ नगरसेवक निवडून आले आहेत. असा स्ट्राईक रेट कधीच कुठल्या पक्षाला मिळाला नाही. तर, जिल्हा परिषदेतही आपण १४ वरून ३८ वर उडी मारली. एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी देशातील संसदेत महिलांचे आरक्षण रोखले असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने ५६ टक्के बहिणींना निवडून आणण्याचे काम केले. त्यामुळेच आपल्याला प्रचंड मोठा विजय प्राप्त झाला असून हा विकासाचा विजय आहे."( Devendra Fadnavis's Statement on Corruption)
 
 
जनतेसोबतचा व्यवहार महत्वाचा
 
"अनेकदा आपण निवडून आल्यानंतर मी माझ्यामुळेच निवडून आलो, असे आपल्याला वाटते. त्यातून आपला व्यवहार बदलत जातो. पण लोक जसे तुम्ही केलेला विकास पाहतात तसाच तुमचा व्यवहार काय आहे, हेदेखील पाहतात. एकवेळ विकास कमी झाला तर चालतो पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्वाचे असते. भलेही एखादे काम होणार नाही पण भाजपच्या लोकप्रतिनिधीकडे गेल्यावर आम्हाला सन्मान मिळेल, आमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, अशी भावना जनतेत तयार झाली पाहिजे. त्यामुळे इथे मोदीजींनी काय काम केले यावरून भाजपची परीक्षा होणारच आहे, पण त्यासोबतच स्थानिक व्यवहार कसा आहे यावरूनही होणार आहे. लोकांशी तुमचा व्यवहार कसा आहे, याची काळजी तुम्ही घ्या, विकासाची काळजी माझ्यावर सोडून द्या," असेही ते म्हणाले.( Devendra Fadnavis's Statement on Corruption)
 
सोलापूरकरांचा विश्वास वाया जाणार नाही
 
"महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही समजवून दिली. त्यांच्या स्मारकासाठी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. पंढरपूरला कॉरीडॉर करतो आहोत. अनेकजण शंका घेत लोकांना घाबरवण्याचे काम करतात. पण, आपण प्रत्येकाला मुबलक मोबदला देतो आहोत. कुणालाही त्यांच्या धंद्यापासून वंचित करत नाही. एकदा कॉरीडॉर झाला की, त्यांचा धंदा दहापट वाढेल, अन्यथा माझे नाव तुम्ही बदला. नाशिक-सोलापूर-अक्कलकोट हा सहापदरी रस्ता मंजूर केला आहे. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचे काम आम्ही करणार आहोत. सोलापूरकरांचा विश्वास वाया जाणार नाही. तुमची प्रमाणिक सेवा निवडून आणलेले लोकप्रतिनिधी करतील," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.( Devendra Fadnavis's Statement on Corruption)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....