Tourism Development : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या विकासासाठी ६८१ कोटींची तरतूद

श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक संपन्न

    28-Apr-2026   
Total Views |
Devendra Fadanvis
 
मुंबई : (Tourism Development) चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत स्मारक परिसरात भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चोंडी येथील जतन, संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Tourism Development)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चोंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी. स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करावे."(Tourism Development)
 
हेही वाचा :  Legislative Council : महाविकास आघाडीत तीन तिघाडा,विधान परिषदेत मतफुटीची शक्यता - नवनाथ बन
 
खासगी भागीदारी आणण्याबाबत सकारात्मक विचार
 
"बुडीत बंधाऱ्यांऐवजी ‘बॅरेज’ उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे. प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल) आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम व दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित करता येणार आहे," असेही त्यांनी सांगितले. (Tourism Development)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....