भारत सध्या एका नव्या आरोग्य समस्येच्या उंबरठ्यावर उभा असून, आजारांचा चेहरामोहराच झपाट्याने बदलत आहे. बाह्यतः निरोगी भासणाऱ्या समाजात अंतर्गत पातळीवर आरोग्याच्या समस्या मात्र झपाट्याने वाढताना दिसतात. वेगवान जीवनशैली, तंत्रज्ञानावर वाढते अवलंबित्व आणि बदललेल्या दैनंदिन सवयी यांचा मानवी शरीरावरही खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. यातूनच अनेक मूक आजारांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर या आजारांचा आणि त्यावरील प्रभावी उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
भारताच्या आरोग्य व्यवस्थेने गेल्या काही दशकांत संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवले असले, तरी आज देशासमोर एक वेगळेच आणि अधिक गुंतागुंतीचे आव्हान उभे ठाकले आहे. हे आव्हान म्हणजे, असंसर्गजन्य आजारांचे वाढते संकट. हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, स्थूलता यांसारखे आजार पूव प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये दिसत असत; परंतु आता ते तरुण वयोगटातही झपाट्याने वाढत आहेत. या आजारांचे विशेष म्हणजे, त्यांची लक्षणे प्रारंभीच्या अवस्थांमध्ये फार क्वचितच आढळतात. यामुळेच अशा आजारांना ‘मूक आजार’ म्हटले जाते. अलीकडील एका अहवालानुसार, भारतातील दर तीन तरुणांपैकी दोनजणांना अशा मूक आजारांचा धोका आहे. ही आकडेवारी म्हणजे, भविष्यातील आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या गंभीर संकटांची चाहूल आहे.
या आजारांची सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, शरीरात होणारी त्यांची मूक प्रगती. अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दिसताही यांचे शरीरात सूक्ष्म पातळीवर जैवरासायनिक बदल सुरूच असतात. प्री-डायबेटिस, उच्च कोलेस्टेरॉल, वाढता रक्तदाब, ‘फॅटी लिव्हर’ यांसारखे आजार सध्या तरुणांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळत आहेत. विशेष म्हणजे, अनेक वेळा नियमित रक्ततपासणीतही हे विकार स्पष्टपणे दिसून येत नाहीत. उदाहरणार्थ, ‘फॅटी लिव्हर’ असलेल्या मोठ्या प्रमाणातील रुग्णांमध्ये ‘लिव्हर एन्झाईम्स’ सामान्यच असलेले दिसतात. यामुळे सर्व काही ठीक असल्याचा भ्रामक निष्कर्ष काढला जातो आणि आजाराचे निदान होण्यास विलंब होते. हाच विलंब पुढील गंभीर गुंतागुंत निर्माण करण्यास कारणीभूत ठरताना दिसतो.
या समस्येची मुळे आधुनिक जीवनशैलीत खोलवर रुजलेली आहेत. शहरीकरण, तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि बसून काम करण्याची पद्धत यांमुळे तरुणांची शारीरिक हालचाल लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यातच प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड, चायनीज, साखर व चरबीयुक्त पदार्थांच्या वाढत्या सेवनामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियांवरही विपरीत परिणाम होतो. झोपेचा अभाव, वाढता मानसिक ताण आणि स्पर्धात्मक जीवनशैली हे घटकही तितकेच घातक ठरताना दिसतात. परिणामी, शरीरात ‘मेटाबोलिक सिंड्रोम’ विकसित होण्याचे प्रमाण वाढत असून, जे पुढे हृदयरोग आणि मधुमेहाचे मूळ ठरत आहे.
पोषणाच्या दृष्टीनेही परिस्थिती चिंताजनकच आहे. ‘व्हिटॅमिन-डी’ आणि ‘बी-12’ यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळत असून, ती हाडांच्या आरोग्याबरोबरच मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करते. ही स्थिती मूक आजारांना खतपाणी घालणारी ठरते. त्यामुळे केवळ अन्नाचे प्रमाणच नव्हे, तर त्याची गुणवत्ता हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
या वाढत्या संकटाचा परिणाम केवळ वैयक्तिक आरोग्यावर मर्यादित राहात नाही, तर तो देशाच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेलाही बाधित करतो. तरुण पिढी ही देशाची उत्पादक शक्ती मानली जाते. मात्र, हाच वर्ग जर दीर्घकालीन आजारांच्या विळख्यात अडकला, तर उत्पादकता कमी होणे, आरोग्यसेवेवरील खर्च वाढणे आणि कुटुंबांवर आर्थिक ताण येणे अपरिहार्य ठरते.
या समस्येवर उपाय शोधताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विचार केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे. नियमित आरोग्य तपासण्या करणे आवश्यक असून, त्यात रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, शरीर-वजन निर्देशांक यांचा सातत्याने आढावा घेतला पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रगत तपासण्या करून घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे आजाराची लवकर ओळख होणे सुलभ होईल. जीवनशैलीत बदल करणे, हाच यावरचा सर्वांत प्रभावी उपाय असून नियमित व्यायाम, संतुलित आणि पोषक आहार, साखर व प्रक्रिया केलेल्या अन्नाचे मर्यादित सेवन, तसेच पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप या सवयी अंगीकारणे अत्यावश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पातळीवरही व्यापक धोरणात्मक बदलांची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रगत तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देणे, हीदेखील काळाची गरज. असंसर्गजन्य आजार हे मूक असले, तरी त्यांचे परिणाम अत्यंत व्यापक आणि दीर्घकालीन असतात. या संकटाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. योग्य वेळी निदान, प्रतिबंधात्मक उपाय आणि जागरूक जीवनशैली यांचा संगम साधला, तरच या वाढत्या धोक्यावर नियंत्रण मिळवता येईल. अन्यथा, आजचे हे मूक आजार भविष्यासाठी टाळता न येणारे संकट ठरू शकतात.
(प्रतिनिधी)