मुंबई : (Mumbai Ahmedabad bullet train update) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक असलेल्या अहमदाबाद येथील साबरमती नदीवरील पुलाचे बांधकाम वेगाने प्रगतीपथावर आहे. सुमारे ३६ मीटर उंचीचा म्हणजेच सुमारे १२ मजली इमारतीइतका हा पूल ४८० मीटर लांबीचा असून, तो पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गाच्या समांतर उभारला जात आहे.
या पुलाचे स्थान साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान आहे. हा पूल साबरमती बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर, तर अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. पुलासाठी आवश्यक असलेले सर्व आठ गोलाकार खांबांची उभारणी पूर्ण करण्यात आली असून, त्यांचा व्यास ६ ते ६.५ मीटर दरम्यान आहे. यापैकी चार खांब नदीपात्रात, दोन खांब नदीच्या काठावर (दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक) आणि उर्वरित दोन खांब नदीकाठाबाहेर उभारण्यात आले आहेत. या खांबांची उंची ३१ ते ३४ मीटर दरम्यान आहे. नदीच्या प्रवाहावर कमीत कमी परिणाम होईल याची दक्षता घेत पियर्सचे नियोजन करण्यात आले आहे.(Mumbai Ahmedabad bullet train update)
हा पूल ७६ मीटर लांबीचे पाच स्पॅन आणि ५० मीटर लांबीचे दोन स्पॅन अशा रचनेचा असून, प्रत्येक स्पॅनचे बांधकाम २३ सेगमेंट्सच्या साहाय्याने साइटवरच (इन-सिटू) केले जात आहे. पुलाच्या बांधकामासाठी बॅलन्स्ड कँटिलिव्हर ही आधुनिक पद्धत वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानात पुलाखाली तात्पुरता आधार न वापरता, प्रत्येक खांबापासून दोन्ही बाजूंना संतुलन राखत सेगमेंट्स क्रमाने जोडले जातात. पोस्ट-टेंशनिंग प्रक्रियेद्वारे हे सेगमेंट्स जोडून एकसंध व मजबूत ब्रिज तयार केला जातो. (Mumbai Ahmedabad bullet train update)
सध्या या पुलाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली असून, पाया आणि सबस्ट्रक्चरशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ७६ मीटर लांबीचे तीन स्पॅन पूर्ण झाले आहेत. तसेच सुपरस्टक्चर अंतर्गत पियर हेड बांधकाम आणि सेगमेंट कास्टिंगची कामे सुरू आहेत. बांधकामादरम्यान साबरमती नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.(Mumbai Ahmedabad bullet train update)