
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी जनरल नरवणे यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. असे असले तरी, 2020 मध्ये चीनसमवेत पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षाच्या वेळी भारताने आपला कोणताही भूभाग गमवला नसल्याचा पुनरुच्चार, माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी पुन्हा केला आहे. माजी लष्करप्रमुखांची सार्वजनिक विधाने आणि त्यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकूर यांमध्ये विसंगती असल्याचे सांगून, विरोधकांनी संसदेत त्यांच्यावर टीका केली होती.
2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात जो संघर्ष झाला होता, त्यावेळी भारताने आपला कोणताही भूभाग गमवला नाही, असे जनरल नरवणे यांनी ठामपणे सांगितले आहे. आपण कोणताही भूभाग गमवला नसल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते. आपल्या त्या वक्तव्यावर आपण आजही ठाम आहोत, असे माजी लष्करप्रमुख म्हणाले.
भारत आणि चीन यांच्यात 2020 मध्ये झालेला संघर्ष, तो अलीकडच्या दशकांमधील अत्यंत गंभीर संघर्ष होता. त्यावेळी गलवान खोऱ्यात उभय सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झडल्या होत्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, या अप्रकाशित पुस्तकातील उतारे वाचून दाखवत वादाला तोंड फोडले होते. या संघर्षाच्या वेळी भारताने आपला भूभाग गमविला असल्याच्या शंकादेखील, काँग्रेसच्या नेत्यांकडून उपस्थित केल्या गेल्या होत्या. पण अप्रकाशित पुस्तकातील निवडक मजकूर दाखवून, अपरिपक्व निष्कर्ष काढण्यात आल्याचेच माजी लष्करप्रमुखांनी त्यावेळीही सूचित केले होते. तसेच राजकीय नेतृत्वाने सदर परिस्थिती स्वतंत्रपणे हाताळण्याचे लष्करावर सोपविले होते, हा आरोपही जनरल नरवणे यांनी फेटाळून लावला. लष्करी मोहिमा या अत्यंत सूत्रबद्ध अशा संस्थात्मक चौकटीत आखल्या जातात. तसेच अत्यंत महत्त्वाचे निर्णय हे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीकडून घेतले जातात असे सांगत जनरल नरवणे म्हणाले की, लष्करी कामकाजात राजकीय नेतृत्व कधीही थेट हस्तक्षेप करीत नाही. हा दृष्टिकोन लष्करी नेतृत्वावरच्या विश्वासाचाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.
माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. या पुस्तकास सरकारची अनुमती मिळायची आहे. जनरल नरवणे यांच्या 40 वर्षांच्या कारकिदतील घडामोडींचा विशेषतः 2020 मध्ये लडाखमध्ये झालेल्या संघर्षाचा समावेश या पुस्तकात असणार, असे गृहीत धरूनच या पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या अप्रकाशित पुस्तकावरून विरोधी नेते राहुल गांधी यांनी घातलेला गोंधळ कसा निरर्थक होता, तेही यानिमित्ताने जनतेच्या लक्षात येईल!
गुजरातमध्ये ४०-५० वर्षे
माजी क्रिकेटपटू आणि ममता बॅनर्जी यांच्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे, तृणमूल काँग्रेसचा खासदार झालेल्या युसुफ पठाण याच्या तोंडून एक सत्य बाहेर पडले! ते म्हणजे गुजरात राज्यात पुढील ४०-५० वर्षे भाजपच सत्तेवर राहण्याची शक्यता आहे हे! युसुफ पठाण हा गुजरातचा. त्याला ममता बॅनर्जी यांनी खासदार केले, ते प. बंगालमधून. पण, मूळचा गुजरातचा असलेला युसुफ पठाण याने, ममता बॅनर्जी काय म्हणतील याचा विचार न करता जे सत्य आहे ते प्रकटपणे मांडले. भाजपला जनतेचा सातत्याने मिळत असलेला पाठिंबा आणि विकासास प्राधान्य देऊन अवलंबिले जात असलेले सुशासन प्रारूप, यांमुळेच हे शक्य आहे असे युसुफ पठाण म्हणाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युसुफ पठाण याने वडोदरा येथे, आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने हे भाष्य केले.
गुजरातमध्ये भाजपची स्थिती भक्कम आहे, ही वस्तुस्थिती आहे. भाजप जनतेसाठी कार्य करीत आहे आणि त्यामुळेच हा पक्ष पुढेही सत्तेवर राहायला हवा, असे लोकांना वाटत असल्याचे युसुफ पठाण म्हणाला. प्रत्यक्ष केलेले कार्य आणि जनतेचा विश्वास यांवरच, निवडणुकीतील यश अंतिमतः अवलंबून असते. गुजरातमधील मतदारांचा विचार करता, त्यांच्या दृष्टीने विकास हा निर्णायक घटक राहिला आहे. येथील जनतेला भाजप आवडला आहे. भाजपचा विकास कार्यक्रम पाहूनच, ते मतदान करीत आले आहेत. त्यामुळेच हा पक्ष सत्तेवर आहे. गुजरातमधून पुढील ४०-५० वर्षे तरी भाजपस सत्तेवरून दूर केले जाऊ शकत नाही, असे युसुफ पठाण म्हणाला. पण त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचीही त्याने भलामण केली. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस राजकीयदृष्ट्या प्रभावी आहे. लोकांचा आवाज उठविणारा आणि लोकांची कामे करणारा पक्ष म्हणून, तृणमूल काँग्रेसकडे पहिले जाते हे सांगण्यास तो विसरला नाही. असे असले तरी, तृणमूल काँग्रेसचा खासदार असलेल्या युसुफ पठाण याने जे सत्य आहे, ते जाहीरपणे मांडले, हे काय कमी आहे!
‘कॉर्पोरेट जिहाद’चे मलेशियापर्यंत धागेदोरे!
नाशिकमधील ‘टीसीएस’ या ‘टाटा समूहा’च्या उद्योगामध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’ने जो नंगानाच घातला आहे, त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्या समूहात कार्य करीत असलेल्या काही महिला कर्मचारी वर्गावर दबाब आणून, त्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करून, त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करून, त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्य काही प्रमुख उद्योगांमध्येही असे प्रकार चालत असल्याची चर्चा सुरू झाली. अधिक तपास करता, या ‘कॉर्पोरेट जिहाद’ची पाळेमुळे केवळ आपल्या देशामध्येच रुजलेली नाहीत, तर मलेशियासारख्या मुस्लीम देशांपर्यंतही त्याचे धागेदोरे पोहोचले आहेत.
या ‘जिहाद’ला बळी पडलेल्या एका दलित महिलेने दि. २६ मार्च रोजी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आणि त्यातून या प्रसिद्ध उद्योगामध्ये किती भयानक प्रकार सुरू आहेत, याची माहिती जगासमोर आली. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी तिला मलेशियाला पाठविणार होते. विदेशात एक चांगली संधी मिळत असल्याचे त्या महिलेस भासवून, तिची मूळ कागदपत्रे काढून घेण्यात आली. त्यामध्ये पासपोर्ट, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील, शैक्षणिक प्रमाणपत्रे यांचा समावेश होता. या प्रक्रियेत त्याच कार्यालयातील अन्य १२ महिलांनाही जोडण्यात आले होते. या सर्व महिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘इम्रान’ या व्यक्तीशी जोडून देण्यात आले. अन्य काही महिला मलेशियात येऊन किती भरपूर पैसा कमवत आहेत; तसेच किती आरामात राहात आहेत, असे त्यांच्या मनात भरविण्याचा प्रयत्न या इम्रानने केला. हा प्रकार लक्षात आल्यावर, हा एखाद्या व्यापक मानवी तस्करीचा भाग तर नाही ना? अशा शंका उपस्थित होऊ लागल्या. तसेच ‘दानिश’ नावाचा जो आरोपी आहे, तो त्या महिलांवर भावनिक प्रभाव टाकत असल्याचेही उघडकीस आले. तुमच्या कुटुंबीयांना तुम्ही आवडत नाही, त्यांच्यासमवेत राहून स्वतःचे आयुष्य बरबाद करू नका. स्वतःचा आणि स्वतःच्या करिअरचा विचार करा. तुम्ही मोठे झालेले घरच्यांना बघवत नाही. त्यांना घाबरून राहिल्यास एक चांगली संधी तुम्ही गमावून बसाल, अशा प्रकारे त्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ केले जाई. या महिलांना त्यांच्या स्वतःच्या नावाने बँक खाते उघडण्यासही सांगण्यात आले. पण त्या खात्याशी जो मोबाईल नंबर जोडण्यात आला, तो आरोपीचा होता. तसे करून संपूर्ण बँकिंग व्यवहारावर आरोपी नियंत्रण करू शकत होता. त्याचप्रमाणे महिला कर्मचारी वर्गास हिंदू धर्म, त्या धर्मातील देवदेवता किती वाईट आहेत आणि अल्ला हाच कसा श्रेष्ठ आहे, हे पटवून दिले जात होते. या ‘ब्रेनवॉशिंग’मुळे महिला कर्मचाऱ्यांचा व्यवहार बदलला, वेशभुषेत बदल झाला. जी महिला आठवड्यातून दोन वेळा मंदिरात जायची, तिने मंदिरात जाणे बंद केले. सर्वच अत्यंत भयानक चालले होते. एका महिलेने तक्रार केल्यानंतर हा ‘कॉर्पोरेट जिहाद’चा प्रकार उघडकीस आला. असेच प्रकार अन्य ठिकाणीही सुरू असतील. नसत्या आमिषांना बळी न पडता, तेथे काम करणाऱ्या हिंदू महिलांनी पुढे येऊन अशा जिहादी धर्मांधांचा बुरखा टराटरा फाडायला हवा.
दत्ता पंचवाघ