Govind Pansare's Book : १९७९ मधील पुस्तकावर आज वाद उकरणे म्हणजे असंवेदनशील कृत्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणीही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकत नाही

    28-Apr-2026   
Total Views |

Devendra Fadnavis,
 
सोलापूर : (Govind Pansare's Book) १९७९ मधील पुस्तकावर आज वाद उकरणे म्हणजे असंवेदनशील कृत्य असून कुणीही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
 
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखीत 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आ. संजय गायकवाड आणि पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यात सुरु असलेल्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या पुस्तकावरून निरर्थक वाद उभा झाला आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा कुणी अपमान करूच शकत नाही. त्यांचा मान इतका मोठा आहे की, कुणीही त्यांचा अपमान करणे शक्यच नाही. १९७९ ला हे पुस्तक लिहिले गेले असून त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भिडायचे हे शुद्ध असामाजिक आणि असंवेदनशील कृत्य आहे. या पुस्तकावर आक्षेप घेणाऱ्याने ते पुस्तक वाचले की, नाही, ते माहिती नाही. आंदोलन करणारे कशासाठी आंदोलन करतात, तेही त्यांना माहिती आहे की, नाही तेही माहिती नाही. केवळ कुठलातरी मुद्दा पकडून वाद उभा करणे आणि चर्चेत राहणे योग्य नाही."(Govind Pansare's Book)
 
"बार्शी येथील श्री भगवंत मंदिर अतिशय प्राचिन आहे. हा आपला इतिहास जपणे महत्वाचे आहे. ही जागा ऐतिहासिक असून या सांस्कृतिक ठेव्याला लोकांपुढे आणण्यासाठी मांडलेल्या आराखड्याला आम्ही समर्थन देतो. आपल्या ईश्वराला काही मागावे लागत नाही. त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक झाले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. ईश्वरीय शक्ती ही आपल्याला मानसिक बळ देणारी आहे. मानसिक बळ मिळाल्यास कितीही प्रश्न समोर आले तरी आपण त्यावर उत्तर शोधू शकतो," असेही ते म्हणाले.(Govind Pansare's Book)
 
राजेंद्र राऊत यांना भविष्य आहे
 
माजी आ. राजेंद्र राऊत यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या निवडणूकीचा निकाल म्हणजे जनेतेला मागच्या काळात केलेल्या चुकीची जाणीव होऊन राजेंद्र राऊत यांना मोठा आशीर्वाद दिला आहे. वर्षानुवर्षे त्यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य असून त्यात अनेक पदे मिळतील. भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्यांची कदर केली जाईल. विधानपरिषदेकरिता कुठली नावे आहेत, त्याचे काय होणार, याचा निर्णय मी घेत नाही. देशाचे पार्लमेंटरी बोर्ड हा निर्णय घेते. त्यामुळे तिथून जो निर्णय होईल त्यानुसारच सगळे निर्णय होतील. पण राजेंद्र राऊत यांना भविष्य आहे, एवढे सांगतो."(Govind Pansare's Book)
 
शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "आता आमची चर्चा सुरु आहे. युनियनसोबतही ही चर्चा सुरु असून चर्चेअंती यासंदर्भात निर्णय होईल."(Govind Pansare's Book)
 
ऊस आणि कांदा उत्पादकांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे जाणार
 
"महाराष्ट्र दरवर्षी ९९ टक्क्यांच्या वर एफआरपी साध्य करतो. अनेकदा सरकारनेही मदत केली आहे. यावर्षीही ऊस कारखानदारीसंदर्भात एक बैठक घेतली असून त्याबाबत सचिव समिती तयार केली आहे. त्यावेळीच्या हंगामापुढच्या अडचणींचा आढावा घेण्यास समितीला सांगितले आहे. त्यानंतर पुढच्या काळात ऊस आणि कांदा उत्पादकांचे एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वत: केंद्र सरकारकडे जाणार आहे. केंद्राकडून यात काय मदत मिळू शकते यासंदर्भातील निर्णय आम्ही करू," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Govind Pansare's Book)
 
आ. संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा
 
'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे मंगळवारी आ. संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन पुस्तकाचे वाचन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना रोखले. तसेच आ. संजय गायकवाड यांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली. (Govind Pansare's Book)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....