Ghatkopar Crime Case : दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने घाटकोपर हादरले!
आरोपी फिरोज शेख अटकेत; नातेवाईकांनाही ताब्यात घेतल्याने सोमय्यांचा ठिय्या
28-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Ghatkopar Crime Case) घाटकोपरच्या नित्यानंद नगर परिसरात ५ ते ६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणाने मोठे राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण केले. फिरोज शेख ऊर्फ सन्नी या आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण केल्याने दुसरे प्रकरणही समोर आले. या संपूर्ण प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तब्बल १२ तास आंदोलन करत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.(Ghatkopar Crime Case)
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ एप्रिलच्या रात्री सुमारे ८:३० वाजता नित्यानंद नगर विभागात दोन अल्पवयीन मुलींवर फिरोज शेख ऊर्फ सन्नी याने कथित लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत असताना संतप्त जमावाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांनाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपी फिरोज शेखविरोधात आणि आरोपीला मारहाण करताना पोलिसांनाही मारहाण केल्याच्या आरोपावरून असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.(Ghatkopar Crime Case)
या प्रकरणात पोलिसांनी फिरोज शेखसह पीडित मुलींचे काही नातेवाईक आणि स्थानिक नागरिक अशा चार जणांना अटक केली. यावेळी पीडित मुलीच्या आईच्या जबाबात “आरोपीला अटक करताना लोकांनी पोलिसांनाही मारहाण केली” असा उल्लेख असल्याचे समोर आले. हे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः पीडित मुलीच्या आईशी चर्चा केली. मात्र पीडित मुलीच्या आईने आपण असा जबाब नोंदविला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सोमय्या यांनी पीडित कुटुंबासह घाटकोपरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. मात्र पोलिसांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी प्रथम घाटकोपर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आणि नंतर पोलीस ठाण्यातील कारागृहाबाहेर आंदोलन सुरू केले. जबाब नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.(Ghatkopar Crime Case)
आंदोलन इतके तीव्र झाले की किरीट सोमय्या यांनी रात्री पोलीस ठाण्यातच मुक्काम केला. अखेर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांनी हे संपूर्ण प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर तब्बल १२ तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. या घटनेमुळे घाटकोपर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि त्यानंतरच्या पोलिस कारवाईवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांकडून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.(Ghatkopar Crime Case)
किरीट सोमय्यांची मागणी मान्य केली असून त्यानुसार गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यासोबतच या तपासात कुचकामीपणा करणाऱ्या लोकांवरही कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
महापौर रितू तावडे यांनी पोलिसांच्या त्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामध्ये कुटुंबाने अटकेदरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याचे म्हटले होते. तावडे यांनी सांगितले की, त्यांनी पाहिलेल्या व्हिडिओमध्ये असा कोणताही हल्ला दिसत नाही. इतक्या वेदनादायक घटनेनंतर कुटुंबाची प्रतिक्रिया स्वाभाविक असते, मात्र सहानुभूती दाखवण्याऐवजी पोलिसांनी त्यांनाच तुरुंगात टाकले, असे त्यांनी म्हटले. घटनेनंतर घाटकोपर पश्चिम परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकही न्यायाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.
सदर प्रकरणी किरीट सोमय्यांनी केलेल्या मागण्या...
पीडित कुटुंबाची बिनशर्त सुटका करण्यात यावी
प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी
आरोपीला कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळाले का, याची सखोल चौकशी करण्यात यावी