सध्या जगभर चर्चा आणि चिंता आहे ती अमेरिका विरुद्ध इराणच्या आखाती युद्धाची. सध्या युद्धविराम असला तरी, ५० दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या संघर्षाची ठिणगी अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. या पार्श्वभूमीवर संघर्षाचे रुपांतर द्वेषात होऊ न देण्याची प्राणिजगतातील शिकवण मानवासाठीही तितकीच महत्त्वाची. कारण, निसर्ग आपल्याला संघर्ष टाळण्याचा नाही, तर त्याची मर्यादा ओळखण्याचा धडा देतो. त्याविषयीचे हे विवेचन...
सृष्टीच्या महावास्तवात संघर्ष हा कोणताही विसंगत सूर नाही, तर तो निसर्गचक्र चालवणारा एक अपरिहार्य ताल आहे. अरण्यात, समुद्रात आणि आकाशात सर्वत्र जीव जगण्यासाठी, अन्नासाठी आणि प्रदेशासाठी झुंज देतात. हरीण शिंगे अडकवून भिडतात, लांडगे आपल्या कळपाच्या सीमांचे रक्षण करतात. परंतु, या साऱ्या वास्तवाच्या पलीकडे एक गहन सत्य दडलेले आहे, प्राणी लढतात, पण ते द्वेष बाळगत नाहीत! ही सूक्ष्म, परंतु अर्थपूर्ण भिन्नता मानवजातीसमोर एक आरसा उभा करते. संघर्ष हा चराचरांत भरलेला आहे; मात्र त्याला द्वेषाचे विषारी स्वरूप देण्याचे कसब केवळ मानवाकडेच आहे.
उद्देशपूर्ण संघर्ष विरुद्ध
मानसिक रचना
प्राणिजगतातील संघर्ष उद्देशपूर्ण असतो. तो तत्काळ गरजांमधून निर्माण होतो, अन्न, प्रदेश, प्रजनन. गरज संपली की संघर्षही संपतो. त्यात दीर्घकालीन कटुता नसते, अपमानाची कथा नसते की सूडाची भावना नसते. पराभूत प्राणी मागे हटतो, विजेता अतिरेकाने पाठलाग करत नाही.
याउलट, मानवी संघर्ष बहुतांश वेळा त्या घटनेपुरता मर्यादित राहात नाही. महाभारत याचे उत्तम उदाहरण. तो स्मृतीत आणि सामूहिक चेतनेत रूजतो. युद्ध केवळ रणांगणावर लढले जात नाही; ते कथा, इतिहास आणि पिढ्यान्पिढ्यांच्या भावनांमध्ये जिवंत राहते. प्राण्यांमध्ये एक जाणीवपूर्वक ‘थांबण्याची मर्यादा’ असते. लांडग्यांच्या कळपात (The Wolf Peace Protocol) जेव्हा एखादा लांडगा आपली मान झुकवून शरणागती पत्करतो, तेव्हा समोरचा विजेता तत्काळ हल्ला थांबवतो. मानवी संघर्षात मात्र अहंकार आणि विचारसरणीचा गुंता असल्याने, प्रतिस्पर्ध्याचा पराभव पुरेसा नसतो; त्याला सातत्याने अपमानित करणे ही प्रवृत्ती निर्माण होते. आजकालच्या राजकारणात हे उघडउघड दिसून येते.
बबून क्रांती : संघर्षाच्या
पलीकडचा समाज
निसर्ग आपल्याला आणखी एक महत्त्वाचा धडा देतो, पुनर्स्थापनाचा (Restoration). ‘फॉरेस्ट ट्रूप’ या बबूनच्या कळपावरील रॉबर्ट सॅपोलस्की यांचा अभ्यास प्रसिद्ध आहे. जेव्हा त्या कळपातील आक्रमक ‘अल्फा’ नरांचा अंत झाला, तेव्हा उरलेल्या माद्या आणि शांत स्वभावाच्या नरांनी पूर्णपणे नवीन, सहकार्य करणारी संस्कृती निर्माण केली. शिकाऱ्यापासून बचावलेले हरीण दिवसेंदिवस त्या प्रसंगात अडकून राहात नाही. प्रखर भीती किंवा धोक्याच्या क्षणानंतर प्राणी लवकरच संतुलनात परत येतात. आपली सीमा रक्षण केलेला कळप सतत तणावात राहात नाही. शरीर आणि मन पुन्हा स्थिर होते.
मानव मात्र अनेकदा युद्ध संपल्यानंतरही त्यातून बाहेर पडू शकत नाही. मज्जासंस्था सतत जागृत राहते, मन त्या प्रसंगांची पुनरावृत्ती करत राहते आणि भावनिक ठसे टिकून राहतात. आघात (trauma) दीर्घकालीन बनतो. कथा, भीती आणि अविश्वास यांच्या रूपाने पिढ्यान्पिढ्या पुढे जातो. आक्रमकता ही अपरिहार्य नाही. जर प्राण्यांचा समूह आपली संस्कृती बदलू शकतो, तर प्रगत मानवाला ते का जमू नये?
द्वेषाचा अभाव : एक मानसिक शिस्त
प्राणिजगतातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आक्रमकता असते, पण द्वेष नसतो. द्वेषासाठी स्मरणशक्ती आवश्यक असते. प्राणी वर्तमानात जगतात; मानव स्मृतीच्या अखंड प्रवाहात जगतो. प्राचीन तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीता याच दिशेने मार्गदर्शन करते, द्वेषाशिवाय कर्म करा. युद्ध टाळलेले नाही, पण अंतर्मनाची अवस्था महत्त्वाची मानली आहे. कर्तव्य म्हणून आवश्यक असेल, तर अर्जुनासारखे स्वधर्म म्हणून लढलेच पाहिजे. लढा, पण सूडभावनेशिवाय!
ही शिकवण निष्क्रियतेची नाही; ती सजगतेची आहे. प्राण्यांमध्ये ही कृती अचूक आणि भावनिक अतिरेकाविना असते. मानवाला मात्र ही अवस्था साध्य करावी लागते. द्वेषाशिवाय कृती करणे, म्हणजे संघर्षाने आपल्या अंतःकरणाला ग्रासू न देणे. आवश्यक कृती करताना मानसिक बंधन निर्माण होऊ न देणे, हेच तत्त्व प्राणिजगतातही दिसते, कृती मर्यादित, अचूक आणि भावनिक अतिरेकाविना!
प्राणी वर्तमानात जगतात; मानव स्मृतीच्या अखंड प्रवाहात जगतो.आपण केवळ जगण्यासाठी लढत नाही; आपण विचारांसाठी, ओळखीसाठी आणि कथांसाठी लढतो आणि जेव्हा संघर्ष ओळख बनतो, तेव्हा तो सोडणे कठीण होते.आजच्या ध्रुवीकरणाने भरलेल्या जगात, आपल्याला प्राण्यांच्या तत्त्वांचा स्वीकार करण्याची गरज आहे. गरज असेल तेव्हाच कृती करणे; संघर्षाचा उद्देश संपला की त्याला समाप्त करणे आणि शरणागती ओळखणे.
प्राचीन तत्त्वज्ञानही याच दिशेने मार्गदर्शन करते. भगवद्गीतेमध्ये द्वेषाशिवाय कर्म करण्याचा संदेश दिला आहे. युद्ध टाळलेले नाही, पण अंतर्मनाची अवस्था महत्त्वाची मानली आहे. कर्तव्य म्हणून आवश्यक असेल, तर युद्ध करा, पण द्वेषाने नव्हे, मलीनतेशिवाय, सूडभावनेशिवाय!
ज्यांना आपण ‘कमी विकसित’ समजतो, ते प्राणी भावनांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करतात. त्यांची आक्रमकता कार्यक्षम असते; आपली अस्तित्ववादी बनते. त्यांची युद्धे संपतात; आपली अंतर्मनात सुरूच राहतात.
निसर्ग आपल्याला संघर्ष टाळण्याचा नाही, तर त्याची मर्यादा ओळखण्याचा धडा देतो. संघर्षाला स्थान आहे, पण त्यालाही एक सीमा आहे. त्या सीमेनंतर पुनर्स्थापन असते, प्रतिशोध नव्हे. मानवी समाज मात्र अनेकदा ही सीमा ओलांडतो. संघर्ष गरजेपलीकडे जाऊन वर्चस्व, सूड आणि अखंड तणावात परिवर्तित होतो.
मानवाला द्वेषाशिवाय संघर्ष करणे शक्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर प्राण्यांची नुसती नक्कल करण्यात नाही, तर त्यांनी जपलेल्या तत्त्वांच्या आकलनात आहे,
गरज असेल, तेव्हाच कृती करा; अनावश्यकपणे प्रतिक्रिया देऊ नका.
संघर्षाचा उद्देश पूर्ण झाला की त्याला समाप्त करा.
त्या क्षणानंतर त्याचे भावनिक अवशेष मनात साठवून ठेवू नका.
शरणागती ओळखा आणि संघर्षाला सन्मानपूर्वक पूर्णविराम द्या.
आणि पुन्हा संतुलनात परत या.
युद्ध संपत नाही; ते मनःस्थिती बनते. म्हणून निसर्गाकडून शिकणे, म्हणजे त्याचे केवळ स्तुतिगान करणे नव्हे, तर स्वतःला अधिक परिष्कृत करणे. संघर्ष अपरिहार्य असू शकतो, पण द्वेष नाही, ही जाणीवच कदाचित खरी शांततेची सुरुवात ठरू शकते.