खरा दागिना : आरोग्यातून व्यक्तिमत्त्व विकास

    28-Apr-2026
Total Views |
Child Health Development
 
धार्मिक संस्कार जसे लहानपणापासून मुलांना दिले, तर त्याचे परिणाम मोठेपणी दिसून येतात, तीच बाब आरोग्य संस्कारांच्या बाबतीतही लागू पडते. त्यामुळे आरोग्यातून व्यक्तिमत्त्व विकास हाच खरा दागिना...
 
लहान मुले असो वा मोठी माणसे, सगळ्यांनाच गोष्ट ऐकायला आवडते, हो ना? खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. आम्हाला शाळेमध्ये मराठीच्या पुस्तकांमध्ये ही गोष्ट होती. एका शाळेमध्ये घडलेली गोष्ट. वर्गात साधारण ३० मुलं होती. त्यामध्ये सदू नावाचा जो मुलगा होता, तो खूप गरीब होता. पण, त्याची आई खूप कष्टाळू होती. तो खूप लांबून शाळेमध्ये चालत येत असे. जवळजवळ चार ते पाच किमी त्याला दररोज चालावे लागे. शाळेत येण्यासाठी आणि तेवढेच अंतर तो चालत जात असे. तो वर्गामध्ये जेव्हा येई, तेव्हा केसांचा छान भांग पाडलेला असे. धुतलेला पांढरा शर्ट; इस्त्री नाही, पण व्यवस्थित घडी घातलेला शर्ट नीटनेटका.
 
पांढरे शुभ्र दात आणि व्यायामाने आणि चालल्यामुळे लहान वयातच कमावलेले शरीर आणि त्याच्या वर्गामध्ये पांडुरंग नावाचा मुलगा होता. खूप श्रीमंत घरातला. दररोज गाडीने शाळेत यायचा. अंगावर भरजरी कपडे, डोक्यावर जरीची टोपी बारिक शरीरयष्टी, दात किडलेले, नाक वाहातंय, डोळ्यांना खाज येतेय... म्हणजे त्याच्याकडे बघितलं की जाणवे, हा मुलगा आजारी आहे. त्यामुळे वर्गामध्ये वारंवार सुट्ट्या घेणे...
 
एक दिवस बाईंनी त्याला वर्गामध्ये पुढे बोलावलं आणि सदूलापण पुढे बोलावलं. त्यांनी सांगितलं की, “आपल्या वर्गामध्ये शिस्त पाळणे, खूप गरजेचे आहे. तू शाळेचा गणवेश घालत नाहीस; एवढे दागदागिने घालून शाळेत येतोस. पण, खरा दागिना म्हणजे तुमचं आरोग्य आहे आणि या लहान वयामध्ये आरोग्य मिळवणं, आरोग्य टिकवणं खूप गरजेचं आहे.”
 
लहान मुलांचे आरोग्य अगदी नखशिखांत सांभाळणे खरेच गरजेचे असते. लहानपणापासून त्यांच्या आरोग्याची घेतलेली काळजी त्यांना आयुष्यभर साथ देणार असते. जसे एखाद्या इमारतीचा ढाँचा हा मजबूत असेल, तरच ती इमारत पुढे कित्येक वर्षे चांगली टिकते. तसेच, आताही अगदी डोक्यापासूनच सुरुवात करूया.
 
शाळेत जाणाऱ्या मुलींनी त्यांच्या केसांची काळजी, निगा अगदी नीट ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी केस व्यवस्थित विंचरणं आवश्यक आहे. केस विंचरतानासुद्धा काळजीपूर्वक विंचरणे गरजेचे. केसांचा मधोमध भांग पाडावा. ते सगळ्या दिशांनी विंचरावेत. खालून वरती वरून खालती. असे केल्याने काय होतं, डोक्याकडे रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे केस गळणे कमी होते. केसात कोंडा कमी होतो. केस चांगल्या प्रकारे वाढायला लागतात. आपला मेंदू तल्लख होतो. म्हणजे आपल्याला वाटतं केसांची काय काळजी घ्यायची? पण, त्याने इतके फायदे होतात. मुली शाळेत जातात, तेव्हा त्यांची डोकी एकमेकींना चिकटलेली असतात. त्यामुळे अगदी सहजपणे एकमेकींच्या डोक्यामध्ये यांचा ‌‘प्रसाद‌’ दिला जातो. ते स्वच्छ विंचरले, शिकाकाईने धुतले की उवा-लिखा यासुद्धा पूर्णपणे निघून जातात. मुलींच्या प्रमाणात मुलांनीसुद्धा केस विंचरणे, केस स्वच्छ धुऊन साफ करणे गरजेचे आहे. शाळेतून घरी आल्यावर ओल्या टॉवेलने केस पुसावेत. त्यामुळे केसांमधील धूळ जंतू हे दूर होतात.
 
त्यानंतर आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे. त्यांची काळजी तर अतिशय गरजेची आहे. हल्ली आपण बघतो की, अगदी दुसऱ्या-तिसऱ्या वषसुद्धा मुलांना चष्मे लागतात. याचं कारण बघायला गेलं, तर त्यांच्या हातातले मोबाईल. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तरी मुलांना मोबाईल वापरायला देऊ नयेत. डोळे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवावेत.
 
त्राटक हा डोळ्यांचा व्यायाम मुलांना खूप फायदेशीर ठरतो. आपल्या अभ्यासाच्या टेबलावर समोर भिंतीवरती डोळ्यांच्या रेषेमध्ये पांढऱ्याशुभ्र कागदावरती एक मोठी लाल बिंदी चिकटवावी व त्याच्याकडे अर्धा ते एक मिनिट डोळ्यांच्या पापण्या न लवता एकटक बघावे. डोळ्यांतून पाणी यायला लागलं की थांबावे. त्यानंतर डोळे बंद करावेत. असे केल्याने त्या मुलाची एकाग्रता वाढीस लागते. नजर स्थिर होते. अभ्यासात लक्ष चांगले लागते. त्यानंतर साधारणपणे दहा फुटांवरती असलेल्या एखाद्या गोष्टीवर नजर स्थिर करावी. डोळ्यांतून पाणी यायला लागलं की डोळे बंद करावेत. असे दिवसातून दोन-तीनदा करावे. याने डोळ्यांची शक्ती वाढते. याला ‌‘समीप त्राटक‌’ व ‌‘सुदूर त्राटक‌’ असे म्हणतात. डोळा हा शरीरातील सर्वांत नाजूक, महत्त्वाचा अवयव असतो. डोळ्याला अति गरम पाण्याचा वापर करू नये. तसेच अति थंड पाणीसुद्धा लावू नये.
 
शाळेत जाणाऱ्या मुलांना जर फळ्यावरचे नीट दिसत नसेल, तर त्यांच्या पालकांनी वेळीच त्यांना नेत्ररोगतज्ज्ञांकडे नेणं गरजेचं असतं. आपल्याला धुरकट दिसत आहे किंवा लांबचे दिसत नाही, हे आपल्या आई-बाबांना सांगणे, हेसुद्धा मुलांचे काम आहे. त्यामुळे सतत मोबाईल बघणं, टीव्ही बघणं, लॅपटॉपचा स्क्रीन बघणं या गोष्टी काही मर्यादेमध्ये ठेवल्या, तर मुलांच्या डोळ्यांची काळजी नक्कीच घेतली जाते.
 
नंतर महत्त्वाचा अवयव म्हणजे कान.
पूवच्या काळी कानामध्ये तेल घालत असत. त्यामुळे व्यक्ती अगदी म्हातारा झाला, तरी त्यांना कानाने व्यवस्थित ऐकू येत असे. आता कानात तेल नाही, चेहऱ्याला तेल नाही, अंगाला तेल लावणे बंद, त्यामुळे अगदी लहान वयातच बहिरेपणाच्या समस्या आढळताना दिसतात. कानात मळ आला असल्यास तो व्यवस्थित काढणे खूप गरजेचे असते; पण त्यासाठी पिना वापरू नयेत; नाहीतर लहान मुलांच्या कानांचा पडदा फाटण्याची भीती असते.
 
आमच्या लहानपणी शाळेमध्ये काही चूक झाली किंवा शिक्षकांचे ऐकले नाही, तर आम्हाला कान पकडून वर्गाच्या बाहेर उभे राहायला सांगत असत. ती शिक्षा बहुतेक सगळ्यांनी भोगली असेल. हल्ली याच्यावरती खूप संशोधन झाले आहे. आपल्या कानांवरती ॲक्युप्रेशरचे खूप पॉईंट्स असतात व ते पॉईंट्स दाबल्यामुळे आपली बुद्धी तल्लख होते. यालाच ‌‘सुपर ब्रेन योग‌’ असे म्हणतात.
 
आपल्या कानांची पाळी खाली खेचणे, बाजूला खेचणे, कानाचा वरचा भाग वरच्या बाजूला खेचणे, बाजूला खेचणे, असे सगळे व्यायाम याच्यात येतात. त्यामुळे मुलांची बुद्धी खरंच तल्लख व्हायला मदत होते. याचा प्रयोग नक्की आपल्या मुलांच्या बाबतीत करून बघा. त्यानंतर महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक. यासाठीसुद्धा घरी आल्यावर नाकाला अजून पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे असते. कारण, नाकात बाहेरची धूळ वगैरे अडकलेली असेल, सतत तुम्ही प्रदूषित वातावरणात राहात असाल, तर मुलांना सद, खोकला, दमा असे आजार होऊ शकतात. त्यामुळे नाकाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे.
 
यानंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या दातांची काळजी घेणे. मुलांना हे अगदी लहानपणापासून शिकवणे गरजेचे आहे की काहीही खाल्यानंतर खळखळून चुळा भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दातांच्या फटीमध्ये अन्नाचे कण अडकून राहात नाहीत. त्यामुळे दातांचं आरोग्य सुधारायला मदत होते. दात किडत नाहीत. दिवसातून किमान दोन वेळा दात घासणे, अगदी आवश्यक असते. सकाळी व रात्री झोपताना नक्कीच दात घासावेत. दात घासण्यासाठी सॉफ्ट ब्रशचा वापर करावा. ब्रश हा किमान तीन महिन्यांनी बदलावा. विचार करा, आपण किती महिन्यांनी बदलतो ते.सकाळच्या वेळी दात घासताना जीभ घासणेही तितकेच आवश्यक ठरते. त्यामुळे आपल्या जिभेवरच्या ‌‘टेस्ट बड्स‌’ या चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. भूक चांगली लागते, अन्नपचन चांगले होते.
 
यानंतरचा आपला महत्त्वाचा अवयव म्हणजे आपली त्वचा. त्याची काळजी अगदी लहानपणापासून घेणे खूप गरजेचे. त्यासाठी तुमच्या मुलांच्या अंगाला तेल लावणे खूप गरजेचे आहे. त्याला आयुर्वेदशास्त्रात ‌‘अभ्यंग करणे‌’ असे म्हणतात. त्यामुळे शरीर दृढ होते, मजबूत होते. म्हातारपण लवकर येत नाही. डोळ्यांला चष्मा लागत नाही. शरीर काटक बनते. छोट्या मुलांना रात्री झोपताना पायाला तेल लावल्याने दिवसभराचा थकवा कमी होतो. मुलं शांत झोपतात.
 
मुलांच्या हाता-पायांची काळजी कशी घ्यावी?
 
हात-पाय मजबूत राहण्यासाठी त्यांना हाताचे व पायाचे सूक्ष्म व्यायाम शिकवावेत. पायाच्या टाचांवरती चालण्यास सांगावे. हात वर करणे, बाजूला करणे, गोलाकार फिरवणे, या सगळ्यामुळे हात मजबूत होतात. पाय वर-खाली करणे, सायकल चालवल्यासारखे पाय जमिनीवर फिरवणे. या सगळ्यांनी त्यांच्या शरीराला उत्तम व्यायाम होतो.
 
अगदी सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे नखशिखांत काळजी म्हणजे नखांची काळजीसुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. नखे व्यवस्थित कापणे खूप गरजेचे असते. नखांमध्ये जर माती अडकली असेल, घरी आल्यावर जर हात-पाय स्वच्छ धुतले नाहीत, नखातील माती मुलांच्या पोटात जाते व जंत होतात. आपल्या नकळत आपण मोठ्या आजाराला आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे मुलांना भूक लागत नाही, अन्न पचत नाही, चिडचिड होते. मुलं रात्री गादी ओली करतात. म्हणजे बघा, आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणं किती गरजेचं आहे. अभ्यास करताना मान खाली घातली जाते, त्यामुळे मुलांना लहान वयात मानदुखी, पाठदुखीसुद्धा होऊ शकते. अशा वेळी थोडेसे ‌’backward straching' व्यायाम सांगितले, आसनं सांगितली, तर ती फायदेशीर ठरतात.
 
आता त्यांच्या आहारावरसुद्धा लक्ष देणं खूप गरजेचे आहे. या जाहिरातींच्या युगात जे नवीन दिसेल, ती गोष्ट, खाणं ती मुलं मागत असतात. पिझ्झा, बर्गर, वडापाव हे तर ते आवडीने खातात आणि अशा जंक फूड खाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. हे त्यांना लहानपणी कळत नाही, पण त्यांच्या घरामध्ये आईने यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपल्या मुलांच्या डब्यात जेवण देताना ते ‌‘पूर्ण अन्न‌’ कसं होईल, हे बघणं, खूप गरजेचे आहे. पोळी-भाजी देताना त्याच्याबरोबर एखादा डाळीचा पदार्थ देणे, थोडंसं पनीर किंवा चीज 15 दिवसांतून एकदा देणं (घरी बनवलेलं) खूप गरजेचं ठरतं. त्यांच्या आहारामध्ये घरचं साजूक तूप हे नक्कीच जाणं गरजेचं आहे, किमान दोन चमचे. त्यामुळे त्यांची स्मृती, आरोग्य, त्वचा हे उत्तम टिकून राहतं व त्यांचं सगळं आयुष्य निरोगी राहतं.
अजून एक महत्त्वाचं, शाळेत सकाळी लवकर जाताना त्यांचा सकाळचा कॉल हा वेळेत होतोय ना, त्यांना मलप्रवृत्ती साफ होते ना, हे बघणं आणि त्यानुसार सवय लावणं, खूप खूप गरजेचे आहे. नाहीतर पुढे त्यांना आरोग्याच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे योग्य फळांचे सेवन करणे, ऋतुनुसार फळे खाणे हे खूप गरजेचं आहे. अशा रितीने आपल्या मुलांची जर काळजी घेतली गेली, तर त्यांना वेगळ्या दागदागिन्यांनी सजवायची गरज नाही पडणार. निरोगी आयुष्याचा लख्ख दागिना घेऊन त्यांचं पुढचं सगळं आयुष्य झळाळून उठेल. करणार ना मग आपल्या मुलांसाठी एवढं?
 
डॉ. अरुणा टिळक  
(लेखिका बीएएमएस, एमए योगशास्त्र आहेत.)
(‌‘आरोग्य भारती‌’द्वारा प्रकाशित)
9821478884