प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आयुष्यात उच्च ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या ॲड. नितीन साळुंखे यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
गावात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी थोडे-फार काम केले, तर पैसे तरी मिळतात, अशी मानसिकता तिथे अनेक बालकांमध्ये तयार होत होती. आठ-नऊ वर्षांचे नितीनसुद्धा याला अपवाद नव्हतेच. हे पाहून त्यांच्या पित्याच्या, म्हणजे सुरेश यांच्या मित्रांनी अंबादास फलमारी आणि बाळासाहेब गाढवे यांनी सुरेश यांना सांगितले की, “तू मुलांना आधी गावाबाहेर वसतिगृहात शिकायला पाठव. इथे राहिले, तर यात्रेकरूंची सरबराई करणे आणि चिल्लर पैसे मिळवणे, हेच त्यांचे ध्येय होईल. ते शिकणार कधी?” खूप वाद-चर्चा झाल्यानंतर त्या बालकाला, म्हणजे नितीनला धाराशिव जिल्ह्यातल्या वसतिगृहात शिकण्यास पाठवले. तिथे गेल्यावर कळले की, इयत्ता चौथीतल्या नितीन यांना बाराखडीही येत नव्हती. पण, त्यांनी सगळ्या प्रतिकुलतेवर मात केली. आज तेच नितीन ‘ॲड. नितीन साळुंखे’ म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहेत.
नितीन हे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ते तुळजापूरमधील कायद्याच्या क्षेत्रातले एक उदयोन्मुख व्यक्तिमत्त्व. ते ‘स्टॅण्डिंग काऊन्सिल युनियन ऑफ इंडिया’ अर्थात सरकारी वकील आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्चशिक्षण घेणे का गरजेचे आहे, याबद्दल ते समाजात जागृती करतात. कायद्याच्या परिभाषा जनमानसाच्या कल्याणासाठी राबवणे, हे एकमेव ध्येय असणारे ॲड. नितीन यांचा जीवनप्रवास पाहू.
तुळजापूरच्या सुरेश आणि सुवर्णा साळुंखे या दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यांपैकी एक नितीन. सुरेश आचाऱ्याचे काम करायचे, तर सुवर्णाबाई या गृहिणी. सुरेश हे दिलदार. हातात पैसे आले आणि जर कुणी मागितले, तर ते कसलीही पर्वा न करता, समोरच्याला ते पैसे वाटून टाकायचे. त्यामुळे घरी आर्थिक संघर्ष होताच. आर्थिक विवंचना, पण संस्कारांनी समृद्ध असे वातावरण मराठवाड्यातल्या बहुसंख्य मराठा समाजाचे, कुटुंबांचे, तेच वास्तव साळुंखे परिवाराचेही. पुढे नितीन धाराशिवच्या वसतिगृहात शिकायला गेले. तिथे वसतिगृहाचे मुख्याध्यापक सपाटे सर आणि शिक्षक हनुमंत मोरे यांच्यामुळे नितीन यांना अभ्यासाची गोडी लागली. वाचनाची आवड निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचून त्यांच्या मनात एकच विचार यायचा. या महापुरुषांनी किती प्रतिकुलतेतून समाज आणि देशासाठी इतिहास रचला! त्यांच्यापुढे आपली परिस्थिती काहीच नाही. आपणही प्रतिकुलतेवर मात करत उच्च शिक्षण घ्यायचे, तर पुढे बारावीनंतर ते गावी परतले. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते चहा बनवून विकण्याचा व्यवसाय करू लागले. या सगळ्या काळात तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे महंत तुकोजीबुवा, मित्र धर्मराज साळुंखे यांनी खूपच मानसिक आधार दिला. नितीन पदवीच्या शेवटच्या वष शिकत असताना सुरेश यांना पॅरालिसिसचा ॲटॅक आला. वडिलांचे आजारपण आणि उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव यात नितीन पूर्ण गुंतले. वडील बरे झाले, मात्र नितीन यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. चहाच्या व्यवसायात पुन्हा लक्ष घातले, तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल, या विचारांनी ते मोठ्या भावाकडे पुण्याला गेले. तिथे काम करून ते शिकू लागले.
२०१२-१३ साल होते ते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वत्र गाजत होते. त्यावेळी नितीन यांनाही समाजमाध्यमांतून नरेंद्र मोदी यांची माहिती मिळाली. इतके कर्तृत्ववान, धर्मशील व्यक्तिमत्त्व, नेतृत्व कसे निर्माण झाले, असा विचार त्यांच्या मनात आला. याचे उत्तर शोधताना त्यांना कळले की, मोदींचे व्यक्तिमत्त्व रा. स्व. संघाच्या मुशीतून घडले. संघाची निर्मिती, उद्देश आणि व्यक्तिनिर्माणाचे समाजहिताचे कार्य पाहून नितीन यांना संघाबद्दल अतीव उत्सुकता आणि आत्मीयता निर्माण झाली. पण, ते मनातच राहिले...
पुढे वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ते संभाजी नगरला आले. तिथे कुठे राहायचे, याबाबत काहीच नियोजन नव्हते आणि खिशात पैसेही नव्हते. पण, काहीही झाले, तरी शहर सोडायचे नाही, शिकायचेच, या जिद्दीने ते आणि त्यांचा मित्र शहरातील सगळ्यात गरीब वस्तीतील दहा बाय सहाच्या खोलीत राहिले. त्याच खोलीत बिहारहून आलेले मजूदरही राहायचे. शहरात आल्यानंतर दोन-तीन दिवसांतच एका शैक्षणिक कार्यक्रमात त्यांचा परिचय डॉ. रमेश पांडव यांच्याशी झाला. ना राहायची सोय, ना शिक्षणाच्या खर्चाची तरतूद! तरीही, पडेल ते काम करण्याची जिद्द ठेवत, हा युवक या शहरात शिकण्यासाठी आला, हे पाहून डॉ. पांडव यांनी नितीन यांचे जणू पालकत्वच स्वीकारले. पुढे नितीन यांची ओळख डॉ. प्रसन्न पाटील, ॲड. आशिष जाधववार, रामानंद काळे यांच्याशी झाली. आयुष्याचा प्रत्येक क्षण केवळ समाजहितासाठीच जगणारे हे सारे लोक पाहून नितीन यांना समाजहितासाठीची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच वकिली करताना त्यांनी समाजभान जपले आणि कायद्याच्या कक्षेतून सामाजिक कार्य सुरू केले. ते म्हणतात, “आई तुळजाभवानी नेहमी पाठीशी आहे. रा. स्व. संघाच्या विचारांच्या प्रेरणेने आयुष्याला कलाटणी मिळाली. मला वाटते की,
हम युवा हैं हम
करें मुश्किलों का सामना
मातृभूमि हित जगे हैं
हमारी कामना|”
हे पाहून वाटते की, ॲड. नितीन साळुंखे यांच्यासारखे तरुण म्हणजे देशाच्या विकासाचे आधार आहेत.
9594969638