माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

    27-Apr-2026
Total Views |

दरवर्षी दि. 27 एप्रिल रोजी जगभरात ‌‘आंतरराष्ट्रीय तरस दिन‌’ साजरा केला जातो. हा दिवस प्रामुख्याने ‌‘तरस‌’ या प्राण्याबद्दल लोकांमध्ये असलेली भीती आणि गैरसमज दूर करून त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने साजरा होतो. महाराष्ट्रामध्ये गवताळ प्रदेशातील छोट्या टेकड्या आणि पठारी प्रदेशांमध्ये पट्टेरी तरसाचा अधिवास आहे. या पट्टेरी तरसाचा आणि त्याच्या अधिवासाचा आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...

पट्टेरी तरसाविषयी...

तरसाचा समावेश ‌‘हायनिडे‌’ या कुळात होतो. असे असले, तरी तो अनुवांशिकरित्या मांजर व उंदमाजर कुळाच्या आणि स्वभाव व शारीरिकदृष्ट्या श्वान कुळाच्या जवळपास जातो. पट्टेरी तरस प्रामुख्याने उत्तर आणि पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि भारतीय उपखंडात आढळते. विदर्भात या प्राण्याला ‌‘तडस‌’ म्हटले जाते. भारतात आढळणारा पट्टेरी तरस हा 15 ते 20 वर्षे जगत असून त्याचे वजन 35 ते 40 किलोपर्यंत असते. त्याच्या मानेपासून ते शेपटीपर्यंत लांब केसांची एक रांग (आयाळ) असते. जेव्हा या प्राण्याला धोका वाटतो, तेव्हा तो हे केस ताठ करतो, ज्यामुळे तो मूळ आकारापेक्षा 38 टक्के मोठा आणि अधिक भीतीदायक वाटतो. त्यांच्या अंगावर करड्या किंवा पिवळसर-तपकिरी रंगाचे केस असतात. ज्यावर काळ्या रंगाचे उभे पट्टे असतात. उन्हाळ्यात हे पट्टे जास्त गडद दिसतात. प्रत्येक तरसाच्या शरीरावरील या पट्टेरी रचना वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख पटवता येऊ शकते.

नाममात्र शिकारी

कुजलेले मांस खाऊन गवताळ प्रदेशाची स्वच्छता करणारा स्वच्छतादूत म्हणून तरस हा ओळखला जातो. त्याच्या शरीराची रचना ही इतर प्राण्यांनी शिकार केलेल्या शिकारीवर अवलंबून राहण्यासाठीच तयार झाली आहे. तो छोट्या प्राण्यांची शिकार करत असला, तरी शिकारीवेळी तो आपल्या पंजाचा वापर करत नाही. दातांचा वापर करून तो शिकार करतो. कारण, त्याच जबडा मजबूत असतो. खास करून काही वेळा तो कुत्र्यांची शिकार करतो. इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीमधील हाडे खाण्यासाठी त्याचा हा मजबूत जबडा विकसित झाला आहे. प्रामुख्याने तो मांसभक्षी असला, तरी काही नोंदीनुसार त्याने शेतांमध्ये शिरून कंदमुळेदेखील उकरून खाल्ली आहेत.

तरसाच्या चार प्रजाती

1. ठिपकेवाला तरस (Spotted Hyena) : ही तरसाची सर्वांत मोठी आणि प्रसिद्ध प्रजाती आहे. हे प्राणी कळपाने राहतात आणि कुशल शिकारी मानले जातात. हे प्रामुख्याने आफ्रिकेच्या सहारा उपखंडात आढळतात.

2. पट्टेरी तरस (Striped Hyena) : भारतात प्रामुख्याने हीच प्रजाती आढळते. यांच्या अंगावर काळे पट्टे असतात आणि ते लाजाळू व रात्री वावरणारे असतात. हे प्रामुख्याने कोरड्या, खडकाळ आणि झुडपी जंगलात राहतात.

3. तपकिरी तरस (Brown Hyena) : ही जगातील सर्वांत दुमळ प्रजातींपैकी एक आहे. हे प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील वाळवंटी भागात आढळतात. यांच्या अंगावर लांब तपकिरी केस असतात.

4. आर्डवुल्फ (Aardwolf) : हे आकाराने सर्वांत लहान असतात. इतर तरसांच्या तुलनेत हे मांस खाण्याऐवजी प्रामुख्याने वाळवी (Termites) खाऊन जगतात.

वाढती स्पर्धा

गवताळ प्रदेशामध्ये आता बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या वावराचा परिणाम या परिसंस्थेतील लांडगा, खोकड या प्राण्यांवर झालेला दिसतो. भटक्या कुत्र्यांसोबत होणाऱ्या प्रजननामुळे लांडग्याच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे, तर खोकडदेखील बिबट्याच्या भीतीने आणि शिकारीमुळे नामशेष होत आहे. अशात तरस मात्र बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांना पुरून उरत असल्याचे निरीक्षण ‌‘दि ग्रासलॅण्ड ट्रस्ट‌’च्या संशोधकांनी नोंदवले आहे. शिकारीवर आलेल्या बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांना तरस हुसकावून लावताना दिसत
असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

तरसाच्या गुहा

गवताळ प्रदेशातील तरसांच्या गुहा या पाहण्याजोग्या असतात. टेकड्यांवर माती उकरून ते छोट्या गुहा तयार करतात. सकाळी या गुहांवर धनगरांच्या मेढ्या आणि गुरांचा वावर असला, तरी रात्री त्यावर राज्य असते, ते तरसाचेच. या गुहा एकमाग वाटत असल्या, तरी जमिनीत त्यांचे जाळे पसरलेले असते. शिवाय, त्या वेगवेगळ्या ठिकाणांहूनदेखील उघडतात. महत्त्वाचे म्हणजे, काही वेळा या गुहांमध्ये साळिंदर, वटवाघुळ हे सस्तन प्राणीदेखील राहतात. मात्र दरवेळीच, खास करून गुहेत पिल्लं असतील, तेव्हा तरस या गुहांमध्ये इतर प्राण्यांना शिरकाव करण्यास मज्जाव करतो. तरसाविषयी असणाऱ्या गैरसमजुतीमुळे माणसांकडून या गुहा बंद केल्या जातात. परिणामी, गुहेत अडकल्याने तरसांचा मृत्यू होतो.

तरसाचे प्रजनन

पट्टेरी तरसामध्ये विणीचा कोणताही ठरावीक हंगाम नसतो, तरीही अनेकदा हिवाळ्यात त्यांचे मिलन होते. पट्टेरी तरसाच्या मादीचा गर्भधारणेचा कालावधी हा साधारण 90 ते 92 दिवसांचा असतो. त्यानंतर छोट्या गुहेमध्ये ती एक ते सहा या संख्येत शावकांना जन्म देते. काही आठवडे शावक या गुहेमध्येच राहतात. जन्मतः ती आंधळी असतात आणि सात ते आठ दिवसांनी त्यांचे डोळे उघडतात. जन्मानंतर साधारण तीन आठवड्यांनी पिल्लांचे दात विकसित होऊ लागतात. पट्टेरी तरसामध्ये नर आणि मादी हे दोघेही मिळून पिल्लांची काळजी घेतात, जे इतर तरसांच्या प्रजातींच्या तुलनेत वेगळे वैशिष्ट्य आहे. तरसांमध्ये मादी ही प्रमुख असते. त्यामुळे नर शावक मोठे झाल्यावर गटापासून वेगळे होतात.

माणदेशी परिसंस्थेचा ‌‘आरोग्यदूत‌’

माणदेशाच्या रखरखीत, कोरड्या आणि काटेरी माळरान परिसंस्थेत पट्टेरी तरस हा अत्यंत कळीचा घटक आहे. तरस हा प्रामुख्याने मृतोपजीवी (Scavenger) प्राणी आहे. तो जंगलातील, माळरानातील मृत प्राणी, उरलेले मांस आणि हाडे खाऊन निसर्गाचे संतुलन राखतो. या त्याच्या नैसर्गिक सवयीमुळे तो आजूबाजूचा, गाव-शिवारातील परिसर स्वच्छ ठेवतो आणि मृतदेहांमुळे पसरू शकणाऱ्या रोगराईवर नियंत्रण मिळवतो. त्यामुळेच परिसंस्थेची अन्नसाखळी अबाधित राखण्यासाठी तरसाची भूमिका एक ‌‘स्वच्छतादूत‌’ आणि ‌‘आरोग्यदूत‌’ (Health Ambassador) म्हणून अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

माणदेशात वन्यजीव आणि मानवी संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. माण तालुक्यातील जांभुळणी येथील डोंगरावरील श्री भोजलिंग मंदिर परिसराशी तरसाचे घट्ट सांस्कृतिक नाते आहे. हा डोंगर तरसांचा महत्त्वाचा अधिवास आहे. यात्रेच्या काळात आणि इतर धार्मिक उत्सवांदरम्यान या भागात मटण, कोंबडी आणि इतर अन्नपदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उरलेले मांस निर्माण होते. पट्टेरी तरस हे सर्व फस्त करतो. अशा प्रकारे, तो नैसर्गिकरित्या मांसाहारी कचऱ्याचे व्यवस्थापन करून संपूर्ण परिसर दुर्गंधीमुक्त व स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतो. माण भागात असे बघण्यात आले आहे की, ‌‘पोल्ट्री‌’तून मेलेल्या कोंबड्या तरसांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे त्यांचे दर्शन स्थानिक शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना सर्रास होते. ‌‘पोल्ट्री वेस्ट मॅनेजमेंट‌’वर माण तालुक्यात वनविभाग आणि ‌‘पोल्ट्री मॅनेजर‌’बरोबर उपाययोजना करणे खूप महत्त्वाचे झाले आहे.

संवर्धनाचे प्रयत्न सुरू असले, तरी तरसांच्या अधिवासाला मानवी हस्तक्षेपाचा मोठा फटका बसत आहे. ग्रामीण भागाचे वाढते शहरीकरण, शेतीचा विस्तार, रस्ते, पवनचक्की, मोठे सौरऊर्जा प्रकल्प, स्टोन क्रशर आणि वाळू उपसा यांसारख्या विकासकामांमुळे तरसांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग आणि अधिवास नष्ट होत आहेत. याशिवाय, मोकाट कुत्र्यांमुळे त्यांना संसाधनांसाठी स्पर्धा करावी लागत असून जीवघेण्या ‌‘व्हायरस‌’सारख्या आजारांची लागण होण्याचाही दुहेरी धोका निर्माण झाला आहे. तरसांचे अस्तित्व सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या सक्रिय प्रजनन गुहा (Breeding dens) शोधून त्यांचे नकाशांकन करणे आणि रक्षण करणे यावर संशोधकांचा भर आहे. यासाठी ‌‘किरकसाल मॉडेल‌’ने ‌‘लोकसहभागातून संवर्धन‌’ हे तत्त्व अवलंबले आहे. ग्रामस्थांनी स्वतःहून ‌‘त्रिसूत्री‌’ (कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी, वणवाबंदी) लागू केली आहे. या धोरणांतर्गत स्थानिक तरुण, धनगर मेंढपाळ, ग्रामपंचायत आणि वनविभाग या सर्व घटकांना एकत्र आणून मानवी संघर्ष टाळण्यासाठी उत्कृष्ट उपाययोजना केल्या जात आहेत. तरसांबद्दल ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती केली जात आहे.

माण तालुक्यात जांभुळणी येथील भोजलिंग डोंगरावर ‌‘जागतिक तरस दिन‌’ (World Hyena Day) साजरा करून भाविक व ग्रामस्थांना पर्यावरण स्वच्छतेबाबत प्रशिक्षित करण्यात आले. याव्यतिरिक्त शाळांमधून ‌‘तरस दिन‌’सारख्या उपक्रमांतून शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण केली जात आहे. या सातत्यपूर्ण प्रबोधनामुळेच, एके काळी शिकार करणारे ग्रामस्थ आता तरस आणि इतर वन्यजीवांचे रक्षक बनले आहेत.

तरस गणना

राज्यात वाघ आणि बिबट्यांची गणना नेहमी होते; परंतु पट्टेरी तरसांची शास्त्रीय पद्धतीने गणना करणारे ‌‘किरकसाल‌’ हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया (WWF-India)च्या सहकार्याने प्रकल्प आहवाल प्रकाशित झाला. त्यात ही गणना कशी पार पडली, याची सविस्तर माहिती आहे. गावाच्या परिसरात 12 कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले होते, ज्यांत तरसांची 53 छायाचित्रे टिपली गेली. तरसांना त्यांच्या अंगावरील पट्ट्यांच्या विशिष्ट रचनेवरून (Flank-stripe patterns) ओळखले जाते. या गणनेत पाच प्रौढ तरस आणि दोन पिल्ले आढळून आली असून, ‌‘किरकसाल परिसर‌’ हे तरसांचे महत्त्वाचे प्रजनन केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे.

- चिन्मय सावंत
(लेखक माणदेशमध्ये गवताळ परिसंस्थेचे संशोधक आहेत.)
9702001437