Kalewadi Case: प्रार्थनेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार; पास्टरसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून कथितपणे अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर?
27-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Kalewadi Case) पुण्यातल्या काळेवाडी परिसरातील जीजस इज लॉर्ड चर्चमध्ये प्रार्थनेच्या माध्यमातून असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत अंधश्रद्धा पसरवल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणी तक्रारदार अंधश्रद्धा मुक्ती मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष सिद्धांत चव्हाण यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पास्टर केनेथ सिल्वे आणि त्याच्या अन्स सात ते आठ सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवरील kennethsilwayministries या आयडीवरून प्रसारित करण्यात आलेल्या एका रिल्समध्ये 'फक्त प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे होतात' असा दावा करण्यात आला होता. या रिल्सच्या आधारे तक्रारदाराने २६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान राजवाडेनगर, परमवीर कॉलनी, काळेवाडी, पुणे येथील जीजस इज लॉर्ड चर्च येथे भेट दिली. तेथे मोठ्या हॉलमध्ये ४०० ते ५०० स्त्री-पुरुष उपस्थित होते. भिंतीवर मोठी स्क्रीन, खुर्च्यांची व्यवस्था आणि संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधने लावण्यात आली होती. स्टेजवर पास्टर केनेथ सिल्वे माईकसह उपस्थित होता.
कार्यक्रमादरम्यान एका महिलेला स्टेजवर बोलावण्यात आले. एका महिलेने माईकवर सांगितले की, संबंधित महिला मागील एक वर्षापासून डाव्या हाताच्या गंभीर आजाराने त्रस्त होती आणि डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिला होता. मात्र मागील रविवारी चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर तिचे सर्व मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आल्याचा दावा करण्यात आला. 'आज चमत्कार का दिन है, आज आशीष का दिन है, आज चंगाई का दिन है'; असे सांगत उपस्थितांमध्ये धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.(Kalewadi Case)
तक्रारदारांनी या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले असता पास्टर केनेथ सिल्वे यांच्या ते लक्षात आले. त्यानंतर लगेच लाईट बंद करून काही लोकांना तक्रारदाराजवळ पाठवण्यात आले. यानंतर ७ ते ८ जणांनी मिळून तक्रारदाराला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि चर्चबाहेर हाकलून दिले. चर्चच्या बाहेरही मारहाण सुरूच राहिली. तक्रारदाराला वाचवण्यासाठी मध्ये पडलेले प्रतिक खराडे आणि वैभव सावंत यांनाही मारहाण करण्यात आली.
काळेवाडी पोलीस ठाण्यात नमूद केलेल्या तक्रारीनुसार, पास्टर केनेथ सिल्वे यांनी कोणतीही वैद्यकीय किंवा कायदेशीर परवानगी नसताना लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र जमवून समाजात अंधश्रद्धा पसरवली. तसेच तक्रारदाराने याचे चित्रीकरण केल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना चिथावणी दिली. या प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा धर्माच्या आड अंधश्रद्धा, चमत्कार आणि उपचारांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल होत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला.( (Kalewadi Case))
सदर प्रकरणी पास्टर केथेन सिल्वे व अन्य ७ ते ८ जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अन्वये कलम ३(२) अंतर्गत त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ११५(२), १८९(२), २२३, ३५२, ४९, १३५, ३७(१), ३७(३) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काळेवाडी पोलिसांद्वारे सध्या पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.(religious issue)
तक्रारदाराच्या आरोपानुसार भोंदू पास्टर केथेन सिल्वेकडे कोणताही अन्न व औषध साठवण्याचा परवाना नसून त्याने ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडिज अॅक्ट व मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्टचा भंग केला आहे. तसेच त्याने सोशल मिडियाचा वापर करून आयटी अॅक्ट ६६ कायद्याचा भंग देखील केला आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कारवाई व्हावी, असे तक्ररदाराने पुरवणी जबाबात नोंदवीले आहे.((Kalewadi Case))